इस्लामी संस्कृति 22
मुहंमदांचे पूर्वज
पांचव्या शतकांत कुसय हा काबाचा मुख्य होता. त्यानें मक्केचा कारभार व्यवस्थित केला. निरनिराळया कुरेशांची घरें कशीं तरी, कोठें तरी विस्कळित बांधलेलीं होतीं. काबाचें मंदिर अति पवित्र म्हणून त्याच्या आसपास घरें बांधित नसत. परंतु कुसयनें काबाच्याजवळ वस्ती करायला त्यांना सांगितले. काबाजवळ त्यानें जागा दिल्या. तेथें तटबंदी करून, मोहल्ले करून कुरेश राहूं लागले.
कुसयने स्वतःसाठी एक राजवाडा बांधला. त्याचा दरवाजा उघडतांच समोर मंदिरांचे सभागृह असे. या राजवाडयाला दारु-न्नदवा असें म्हणत, म्हणजे कौन्सिल हॉल म्हणाना. येथेंच कुसयच्या अध्यक्षतेखालीं सार्वजनिक प्रश्नांची चर्चा होई. चाळीसहून अधिक वयाचे लोकच या चर्चेत भाग घेत. कमी वय असणा-यांस त्या सभेंत जातां येत नसे. जेव्हां कधीं कोणाजवळ लढायी व्हायची असे तेव्हां कुसय एका भाल्याला पांढरा रुमाल बांधी व तें जणुं निशाण कुरेशांच्या हाती देई किंवा आपल्या मुलाच्या हस्तें कुरेश पुढा-यांकडे पाठवी. या निशाणाला 'लिवा' म्हणत. असें निशाण आणीबाणीच्या वेळीं उभारण्याची पध्दत अरब साम्राज्याच्या समाप्तीपर्यंत होती. याला अकद-उल्-लिवा असें म्हणत.
मक्केला जे गरीब यात्रेकरू येत त्यांच्यासाठीं म्हणून कुसयनें एक 'गरीबकर' बसविला होता. त्याला 'रिफादा' म्हणत. नदवा, लिवा, रिफादा या जणुं तीन संस्था होत्या. हे तिन्ही अधिकार कुसयकडे होते. नदवा म्हणजे कौन्सिल बोलवून अध्यक्ष होणें. लिवा म्हणजे लष्करी हुकमत. रिफादा म्हणजे कर बसविण्याचा हक्क. कुसयनें धार्मिक, नागरिक व राजकीय तिन्ही कर्में स्वतःठायीं एकवटलीं. तो काबाची व्यवस्था ठेवी. यात्रेकरूंच्या अन्नपाण्याची व्यवस्था पाही. काबा मंदिराच्या किल्ल्या त्याच्याजवळ असत. म्हणजे तो धार्मिक मुख्य होता. नदवाचा म्हणजे कौन्सिलचा अध्यक्ष तोच. युध्द करणें, कर घेणें याचीहि सत्ता त्याच्याकडे. कुरेशांचा तो नायक झाला. कुरेशांचें नांव त्याने उज्ज्वल केलें. त्याच्या वेळेपासून इस्माईलच्या वंशजांत कुरेशांना अधिक मान मिळूं लागला. कुसय म्हातारा होऊन इ.स. 480 मध्यें मरण पावला. तो मेल्यावर त्याचा मुलगा अब्दुददार हा मुख्य झाला. तो मेल्यावर पुढें भांडणें झाली. भावाभावांच्या मुलांत भांडणें झाली. शेवटी तडजोड झाली.
सिकाया (म्हणजे यात्रेकरूंच्या पाण्याची व्यवस्था), व रिफादा हीं खातीं अब्दुददारचा भाऊ अब्दुलमनाफ याच्या मुलांकडे देण्यांत आलीं.
हिजाब (म्हणजे काबाच्या मंदिराच्या किल्ल्या), नदवा व लिवा हीं खातीं अब्दुददारच्या मुलांकडे ठेवण्यांत आलीं.
अब्दुल मनाफच्या मुलाचें नांव अब्दुसशम्स असें होतें. तो गरीब होता. त्यांने आपलीं खातीं आपल्या भावाकडे दिलीं. या भावाचे नांव हाशिम. हाशिम सधन होता, वजनदार होता. हाशीमच्या हातांत रिफादा म्हणजे कर खातें होतें. तो येणा-या यात्रेकरूंस अन्न देई. त्यांची व्यवस्था ठेवी. इतर मक्के वाल्यांप्रमाणें हाशिम व्यापारहि करूं लागला. हिवाळयांत यमनला व उन्हाळयांत सीरियामध्यें नियमितपणें मक्केहून कारवान पाठविण्याची त्यानेंच पध्दत सुरू केली.