इस्लामी संस्कृति 38
राजानें त्यांना आश्रय दिला. कुरेशांचा वकील हात हालवीत माघारा गेला. अनुयायी गेले. परंतु मुहंमद तेथेंच निर्भयपणें होते. अपमान, निंदा, अत्याचार यांच्यामध्यें उभे होते. मधूनमधून मानसन्मानाचा, धनदौलतीचाहि मोह दाखविण्यांत येई. परंतु मुहंमदाचें तेंच तेजस्वी उत्तर.
दंभ कीर्ति मान । सुखें टाकितो थुंकुंन
जरे चाळवी बापुडीं । ज्यांना असे त्याची गोडी
हेंच त्याचें नि:स्पृह उत्तर. ते म्हणाले, 'धनाची, मानाची मला स्पृहा नाहीं. मला नको प्रतिष्ठा, नको राज्य, तुम्हांला शुभ संदेश देण्यासाठीं देवानें मला पाठविलें आहे. माझ्या ईश्वराचेच शब्द मी तुम्हांला देत असतों. त्याचीच वाणी मी तुम्हांला सांगतों. याद राखा. मी आणलेला संदेश स्वीकाराल तर इहपरलोकीं परमेश्वर तुमच्यावर कृपा करील. माझा संदेश तुम्ही नाकारलात तरीहि मी शांत राहीन. धीर धरीन. तुमच्यांत व माझ्यांत ईश्वरच न्याय देईल.'
मुहंमदांचे असे हे शब्द ऐकून ते थट्टा करीत, हंसत व निघून जात. मुहंमदांची श्रध्दा दिवसेंदिवस अधिकच दृढावत होती. कोणी त्यांना म्हणत, 'तूं खरोखर परमेश्वराचा प्रेषित असशील तर चमत्कार कर. रिकाम्या विहिरी वहायला लाव. स्वर्ग खालीं आण. पर्वत उचलून दाखव. सोन्याचें घर बांध. शिडीवरुन स्वर्गांत चढ.' ख्रिस्तालाहि त्याचे विरोधक असेंच म्हणायचे, 'दाखव आकाशांतला तुझा बाप, आण आकाशांतील अग्नि खालीं.' मुहंमदांचे खरे अनुयायी होते त्यांनी चमत्कारांची कधींहि मागणी केली नाहीं. ते जे पहिले अनुयायी झाले ते पंडित होते, व्यापारी होते, सैनिक वीर होते. त्यांनी मुहंमदांच्या शिकवणींतील नैतिक श्रेष्ठता पाहिली. आणि म्हणूनच एकाकी मुहंमदाभोंवती सर्वस्वाच्या तयारीनें ते उभे राहिले. त्यांना चमत्कारांचीं जरुरी नव्हती. मुहंमदांच्या भोवतीं मरण मिळो वा जीवन, ते उभे राहिले. सारे जग त्या काळांत चमत्कारांसाठीं हपापलेलें असे. परंतु या चमत्कारप्रेमी विरोधकांस मुहंमद म्हणाले, 'ईश्वरानें चमत्कार करण्यासाठीं मला पाठविलें नाहीं, तुम्हांला शिकविण्यासाठीं मला पाठविलें आहे. त्या माझ्या परमश्रेष्ठ प्रभूचा जयजयकार असो. तुम्हीं त्याचीं स्तुतिस्तोत्रें गा. मी पैगंबर असलों तरी माणसाहून का अधिक आहे ? देवदूत सहसा पृथ्वीवर येत नाहींत. नाहीतर ईश्वरानें प्रत्यक्ष देवदूतच येथें पाठवले असते व त्यांनीं उपदेश दिला असता. ईश्वरानें सारे खजिने माझ्या हातीं दिले आहेत असें मी कधींहि म्हटलें नाहीं. ईश्वराची कृपा असल्याशिवाय स्वत: माझी माझ्यावरहि श्रध्दा बसत नाहीं. मी मलाहि मदत करुं शकत नाहीं.'
स्वत:भोंवतीं दिव्य तेजोवलय निर्माण व्हावें असें मुहंमदांस कधीं वाटलें नाहीं. ते नेहमी सांगत, 'देवाच्या शब्दांचा मी संदेशवाहक. मी पाईक. तो मला बोलवतो, मी बोलतों. माझ्याद्वारां प्रभु आपला संदेश देत आहे.' मुहंमद मानवांच्या पूजेविरुध्द होता. ईश्वरासमोर अत्यंत नम्रपणें व सरळपणें ते उभे आहेत. अत्यंत साधेपणा त्यांच्या जीवनांत होता. अत्यंत भावनामय प्रसंगींहि अहंता त्यांना शिवत नसे. केवळ मधुर कृतज्ञता व नम्रता त्यांच्या हृदयांत भरलेली असे. मुहंमद एके ठिकाणीं म्हणतात :