इस्लामी संस्कृति 3
इस्लामची जन्मभूमी
तें पहा अरबस्थान. ईजिप्त व असीरिया यांच्यामधला हा प्रदेश. एक चमत्कृतिमय प्रदेश. कोणालाहि शरण न जाणारा व कोणासहि फारसा माहीत नसलेला प्रदेश. सीझर व खुश्रू यांच्या फौजा जात-येत, तेव्हांच थोडासा परिचय या देशाचा होई. इराण, ईजिप्त, रोम, बायझंटाईन सर्वांनीं हा प्रदेश जिंकण्यासाठी प्रयत्न केले. परंतु प्रयत्न अपेशी ठरले. अलेक्झांडरहि आपलीं स्वप्ने मूर्त करण्यासाठीं जगता तर त्यालाहि ये देशांत जीवनांतील पराजयाचा पहिला धडा कदाचित् शिकावा लागला असता ! प्राचीन काळचीं हीं सारीं राज्यें, साम्राज्यें गडगडतांना अरब पहात होता. तो स्पर्धाक्षेत्रांत कधीं शिरला नाहीं, युध्दक्षेत्रांत उतरला नाहीं. खुश्रू व सीझरची सैन्यं येत-जात, लढत परंतु कोणाचीहि बाजू घेऊन अरबानें आपला हात उचलला नाहीं.
असा हा शांत, स्वस्थ अरेबिया, आपल्या मुक्या निःस्तब्ध गूढतेंतून आतां प्रकट होणारा होता. एक हजार वर्षेंपर्यंत परकीयांच्या द्दष्टीला द्दष्टी न देणारा हा विजनवासी, एकांन्तप्रिय अरब सा-या जगाचे डोळे स्वतःकडे ओढून घेणार होता. स्वतःच्या प्रेरणेनं अरबस्थान स्वतःच्या जीवनावरील पडदा फाडून देणार होतें. हे शांत स्तब्ध लोक सा-या जगांतील राज्यें, साम्राज्यें स्वतःच्या पायांपाशीं आणावयास उभे राहिले. आपल्या किल्ल्यांतून ते बाहेर पडले.
साराच अरेबिया अज्ञात होता असें नाही. नकाशांत जरा पहा. आशियाच्या उजव्या कानांतील हा सुंदर लोलक जरा पहा. दक्षिणेस हिंदी महासागर, पूर्वेस इराणचें आखात, पश्चिमेस तांबडा समुद्र व उत्तरेस सीरियाचा वैराण भाग. अरबस्थानाचे सामान्यतः दोन भाग पाडतां येतील. मधला भाग मध्य अरबस्थान. हा केवळ वालुकामय प्रदेश आहे. आणि या वालुकामय प्रदेशाभोंवतीं समुद्राच्या तिन्ही बाजूंनीं असणारा भाग हा दुसरा भाग. तसे इतर पुष्कळ भाग आहेत. हवा, पाणी, सुपीकपणा लोकांच्या चालीरीती, एवढेंच नव्हे तर तोंडवळे यांतहि फरक आहेत. अरबस्थानच्या उत्तरेचा डोंगराळ मुलूख यांत अलहीरा हा भाग येतो. याला गस्सान असेंहि म्हणत. या भागाला रोम व इराण यांचे प्रभुत्व बहुधा आलटूनपालटून पत्करावेंच लागे. पश्चिमेकडचा भाग हा सर्वांत महत्त्वाचा आहे. या भागाला हिजाज असें नांव आहे. या भागांतच मदिना हे प्रसिध्द व पवित्र शहर आहे. त्याचें इस्लामपूर्व नांव यसरिब असें होतें. मक्का शहर याच भागांत. मक्केची यात्रा करणारे हाजी लोक ज्या बंदरांत उतररात तें जिद्दा बंदरहि याच भागांत. मक्का, मदिना हीं शहरें समुद्रापासून आंत आहेत. तांबडया समुद्राच्या पूर्व किना-याकडे पाहा. लाल दगडाचे सुळके रागानें जणुं समुद्रांत घुसत आहेत असें येथें दिसेल. परंतु लाल लाटांच्या मा-याला भिऊन हे पहाड मागें मागें जात आहेत. चला त्यांच्या पाठोपाठ. किना-याकडून या पहा एका पाठीमागून एक अशा डोंगरांच्या, टेकडयांच्या रांगा आहेत. आणि या टेकडयांच्या अधूनमधून एखादी हिरवळीची दरी आहे. त्या हिरवळीच्या जागीं अरबांची एखादी वसाहत असायची. तेथें अरब आपल्या शेळयामेंढयांना पाणी पाजत आहेत असें दिसे. पावसाच्या पाण्यानें बनणारे प्रवाह तेथें टिकत नसत. तप्त भूमींत लगेच शोषले जात. परंतु वाळूंत घुसलेल्या या पाण्यांतून मध्येंच एखादा झरा अखंड व अनंत असा वाहतांना आढळे. वाळवंटांतील भटके लोक अशा वनस्थलीस जीव कीं प्राण मानीत. आजूबाजूस उजाड, भगभगीत, रखरखीत भाग आणि मध्येंच परमेश्वराची ही वहाती करुणा झुळझुळ करीत असे. अशा या मधल्या जागा बघत, टेकडया चढा व उतरा. सर्वत्र एकच प्रकार दिसेल. आणि येतां येतां शेवटच्या सर्वात उंच अशा रांगेवर तुम्ही याल. तेथून पूर्वेकडे पहा. काय बरें दिसतें? तुम्हांला अनंत निःस्तब्ध असें वाळवंट दिसेल. अरबांशिवाय तेथें कोण राहील? कोण जगेल? एकीकडे टेकडया व एकीकडे अनंत वाळवंट. यांच्या मधल्या या भागाला हेज, हिजाज असें म्हणतात. या शब्दाचा अर्थ मधली जागा असा आहे. इस्लामची जन्मभूमी ती ही. इस्लामी धर्माचें बाळ येथें पाळण्यांत घातलें गेलें. या वाळवंटांतून पुढें गेलें कीं नज्दचे डोंगरपठार येतें. हिजाज व नज्द या भागांतील अरब जातीच मुहंमदांच पहिल्या प्रथम अनुयायी झाल्या. या भागास सोडून नैॠत्येकडे चला. त्या भागास यमन म्हणतात. यमनच्या पूर्वेस हद्रामूत हा भाग आहे. पूर्व किना-यापर्यंत हा भाग गेला आहे. पूर्वेस आर्म्सच्या आखाताजवळ आर्म्स भाग. पश्चिमेकडे अगदीं दक्षिणेकडे यमन आहे, तसाच पूर्वेकडे अगदीं दक्षिणेस अम्मान हा भाग आहे. पूर्व व पश्चिम यांच्यामधील भागांत एके ठिकाणी अल्-हज नांवाचे वाळवंट आहे व तें थेट पुढें बहरैनपर्यंत पसरलेलें आहे. या वाळवंटांतूनहि मधूनमधून सुपीक भाग आहेत. वाळवंटांतील हीं आधारस्थानें, निवासस्थानें!