ईश्वरचंद्र विद्यासागर 66
विद्यासागर म्हणाले, “माझ्यासाठी म्हणून ही विशिष्ट कृपा मला नको. जर सर्वसाधारण लोकांस जोडे घालून जाता येत नसेल, तर मीपण जाणार नाही. माझ्या मोठेपणामुळे मला ही परवानगी मिळावयास नको आहे. नैसर्गिक स्वातंत्र्याने जाता येत असेल तर मी जातो. माझे इतर गरीब देशबांधव, त्यांतीलच मी. त्यांना जसा अपमान येथे सोसावा लागत असेल, तसा मलाही सोसू द्या. लाखो जणांचा अपमान होत असता, मी प्रतिष्ठितपणाने मिरवावे असे मला बिलकूल वाटत नाही. उलट त्या योगे मला बरे वाटेल.” व्यवस्थापकांनी पुष्कळ विनविले, परंतु विद्यासागर आत गेले नाहीत. युरोपियनांच्या पायांत बूट असला तरी चालतो. तोच युरोपीय बूट एतद्देशीय घालून गेला, तरी त्यास मज्जाव होत नाही. पातक जे केलेले आहे, ते फक्त देशी जोड्यांनी, देशी वाहणांनी. युरोपीय बूट हा जेत्यांचा बूट आहे. तो विजयी लोकांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेला आहे. तो युरोपात जन्मला आहे. युरोपात जे जन्मते, जे पिकते, युरोपात जो आचार आहे, जो विचार आहे, तो अपवित्र कसा असू शकेल? त्याची विटंबना, मानहानी, अप्रतिष्ठा कोण करणार? शेवटी हे प्रकरण व्यवस्थापकांनी नंतर गव्हर्नर जनरलकडे पाठविले. हा नियम बदलावयाचा का? असा प्रश्न हिंदुस्थान सरकारपुढे उपस्थित झाला. परंतु गव्हर्नर जनरलांनी कायदा बदलण्यास परवानगी दिली नाही. विद्यासागरांसारखे थोर गृहस्थ म्युझियम पाहण्यास गेले नाहीत तरी चालेल; परंतु युरोपिय बुटाची इभ्रत कमी करण्यात येणार नाही, असे सरकारने कळविले. ज्याप्रमाणे युरोपियांसाठी राखून ठेवलेल्या जागेत एतद्देशीय आदमी शिरू शकत नाही, त्याप्रमाणे जेथे बुटास जाण्यास अनुज्ञा आहे तेथेच जोडे-वाहणा, या एतद्देशीय पादत्राणांस कसा परवाना मिळणार? जेत्यांचा कुत्राही जितांच्या ऐरावतापेक्षा ऐपतवान असतो हे जगाने विसरून कसे चालेल? पूर्वी यंग साहेब आपल्या आसनावर स्थिर राहून ज्याप्रमाणे विद्यासागरांस चंबूगबाळे आटोपावे लागले, तसेच या वेळेसही हिंदी जोड्यांस युरोपिय बुटापुढे माघार घ्यावी लागली व तो पहिला कायदा तसाच राहिला.
पुढे एकदा या म्युझियमच्या पलीकडील दिवाणखान्यात एक सभा भरावयाची होती. या सभेत जावयाचे म्हणजे मार्ग म्युझियममधूनच असे. या सभेस विद्यासागर यांनी हजर राहावे अशी चालकांची इच्छा होती, परंतु ‘जोडे काढून ठेवा’ असा जेथे नियम आहे, त्या जागेतून मी केवळ विद्यासागर म्हणून जोडे घालून जाणे व मग या सभेस हजर राहणे हे त्यांस रुचले नाही. जोडा काढून जावे तरीही अपमानच. म्हणून ते या सभेस गेले नाहीत.
मोठमोठ्या गव्हर्नरांसमोरसुद्धा विद्यासागर निःस्पृहपणे वागत. एकदा गव्हर्नर साहेबांच्या कायदेमंडळात हिंदुधर्मासंबंधी काही प्रश्न निघाला व त्यावर बरीच चर्चा झाली. शेवटी वादाचा निकाल लागेना. विद्यासागरांस बोलावून आणून त्यांस सर्व उलगडा करावयास सांगावे असे ठरून विद्यासागरांकडे गव्हर्नर साहेबांनी गाडी पाठविली. विद्यासागर यांची आई नुकतीच निजधामास गेली होती त्यामुळे ते त्या वेळेस अशौच पाळीत होते. अंगात कपडे घालावयाचे नाहीत. फक्त एक पंचा नेसावयाचा असे त्यांचे व्रत होते. जर कोठे जावयाचे असेल तर कुशासन बरोबर घेऊन जावे व त्याच्यावर बसावे असा पूर्वापार अशौचासंबंधीचा तिकडे आचार होता. “मी हा आहे असा येईन. मी अंगात कपडे वगैरे घालणार नाही. असा उघडा बोडका आलो तर चालेल का? तुमचा सभ्याचार नाहीतर मोडला जाईल. म्हणून काय ते कळवावे.” असे विद्यासागरांनी गव्हर्नरांस कळविले. “कसेही या. आम्हांस तुम्ही वंद्य व पूज्यच आहात.” असे गव्हर्नरांचे उत्तर आले. विद्यासागर यांनी आपले कुशासन बरोबर घेतले व पादचारीच गव्हर्नर साहेबांच्या बंगल्यावर गेले. कुशासनावार बसून त्यांनी त्या धार्मिक प्रश्नांचा नीट समाधानपूर्वक उहापोह केला व सर्वांचे संशय फेडून टाकले; नंतर लगेच आपल्या घरी ते परत आले. ‘निःस्पृहस्य तृणं जगत्’ अशा प्रकारे विद्यासागरांच्या ठिकाणी भूतदया, साधेपणा, निरहंकारवृत्ती आणि स्वाभिमान यांचे सुंदर मिश्रण झाले होते. निरहंकारी असूनही मनुष्य स्वाभिमानी असू शकतो हे विद्यासागर यांनी दाखविले आहे. निरहंकारता म्हणजे दीनपणा व मवाळपणा नव्हे. स्वाभिमान म्हणजे दुस-यांस सदैव तुच्छ लेखणे हेपण नव्हे, असे विद्यासागरांनी आपल्या वागणुकीने जगास दर्शविले आहे.