ईश्वरचंद्र विद्यासागर 34
सावकारांचा ससेमिरा लागलेला; वर्गणी तर मिळत नाही. संकटे दुर्लघ्य व दुस्तर दिसू लागली. आपल्या देशबांधवांचा विश्वासघातकीपणा पाहून विद्यासागर दुःखीकष्टी झाले, त्यांस पराकाष्ठेचे वाईट वाटले, मन व्यग्र झाले, हृदय जळू लागले. विधवाविवाहाच्या खर्चाची रक्कम तर सारखी फुगत चालली होती. तीस आळा घालता येत नव्हता. कारण असे विवाह जितके होतील, तितके विद्यासागर यांस पाहिजे होते. एक विधवाविवाह म्हणजे त्यांस मोक्षप्राप्तीचा आनंद होई. त्यांची ही पुनर्विवाहाची तळमळ इतकी तीव्र होती की, ते म्हणत, ‘मी मरून जावे व माझ्या पत्नीने पुनर्विवाह करून लोकांस उदाहरण घालून द्यावे.’ आपल्या ध्येयसिध्यर्थ स्वतःच्या जीवितावरही तिलांजली वाहू पाहणारा पुरुष थोर व धन्य नाही का? ग्रीस देशातील प्रख्यात कायदे करणारा लायकर्गस यानेसुद्धा आपले प्राण, कायदे सुरक्षित राहावेत, पाळले जावेत व देशसमृद्धी व्हावी, म्हणून दिले होते. त्याची आठवण आम्हांस या प्रसंगी होणे अपरिहार्य आहे. असो. विद्यासागरांनी अनेक मित्रांकडून कर्जाऊ रकमा घेतल्या होत्या. कर्ज वाढत चालले याची त्यांस फिकीर नव्हती. मनुष्य एखाद्या उदात्त तत्त्वाने वेडा झाला म्हणजे त्यास मग इतर गोष्टींचे भान राहत नाही. इतर गोष्टी त्यास ग्रासू शकत नाहीत. सर्व संकटे, कष्ट, दुःख, निराशा यांस बाजूस सारून तो ध्येयार्थ धडपडत असतो. ईश्वरचंद्र अशाच वेड्यापीरांपैकी होते. सर्व थोर लोक असेच वेडे असतात. All great men are mad with some idea.
कर्ज कसे वारावे याचा मार्ग दिसेना, उपाय सुचेना; अन्नपाणी रुचेना. सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांचे वडील ईश्वरचंद्रांचे मोठे मित्र. यांनी पण ईश्वरचंद्रास काही द्रव्य साहाय्य केले होते, परंतु त्यांस पैशाची फार निकड होती आणि म्हणून त्यांनी ईश्वरचंद्रांजवळ आपले पैसे तातडीने परत मागितले. विद्यासागर यांनी सुरेंद्रनाथ बॅनर्जीच्या वडिलांस जे पत्र लिहिले, त्यातील काही भागाचा मतितार्थ खाली देतो.
‘गेले काही दिवस कर्जमुक्त होण्यासाठी मी सतत धडपडत करतो आहे, परंतु काय, कोणताही उपाय दिसत नाही. सर्व प्रयत्न हरले; सर्व उपाय थकले. आपले पैसे परत करण्यासाठी मी जीवाचे रान केले, परंतु सर्व व्यर्थ.
आपणापासून मी पैसे घेतले, ते माझे स्वतःचे पोट जाळण्यासाठी, किंवा काही वैयक्तिक स्वार्थासाठी खास घेतले नव्हते. विधवापुनर्विवाहाचा जो निधी असतो, त्यासाठी जो खर्च होतो, त्यासाठी मी पैसे आपणापासून कर्जाऊ घेतले, तसेच अन्यत्रांपासूनही घेतले आहेत. जे पैसे मी उसनवार घेतले, ते पैसे, मला ज्या वर्गण्या देण्याचे कित्येकांनी वचन दिले, त्या वर्गण्या मिळाल्यावर मी फेडून टाकणार होतो. परंतु देऊ केलेल्या या वर्गण्या अद्याप हाती आल्या नाहीत. खर्च तर रोज वाढत आहे आणि उत्पन्न मात्र शून्य आहे.
आता माझा सर्वस्वी नाश झाला आहे. आपणसुद्धा इतरांप्रमाणे मासिक वर्गणी देण्याचे व एक भली मोठी देणगी देण्याचे कबूल केले होते, ते आपणास स्मरत असेलच. परंतु आपण वर्गणी देण्याचे तर बंदच केले आहे आणि जी देणगी देणार होता, त्यातील निम्मी मात्र दिलीत. आपल्या ऋणांतून मुक्त होण्यासाठी मी रात्रंदिवस काबाडकष्ट करीन; कोणाताही प्रयत्न बाकी ठेवणार नाही; ज्या वेळेस पैशाची आपणास अत्यंत निकड आहे, अशा प्रसंगी आपणास पैसे मला देता येत नाही याबद्दल मी असहाय्य आहे; मी दिलगीर आहे, दुःखीकष्टी आहे. माझे देशबांधव असे क्षुद्र मनाचे व विश्वासघातकी आहेत हे मला आधीच कळून येते तर असल्या खटाटोपात मी पडलोच नसतो. नसती जबाबदारी शिरावर घेतली नसती. पैशाची मदत तर दूरच राहिली, परंतु फुकाचे शब्दानेसुद्धा कोणी या चळवळीची हालहवाल विचारीत नाही; वास्तपुस्त घेत नाही.”