Get it on Google Play
Download on the App Store

ईश्वरचंद्र विद्यासागर 18

वाङ्‌मयविषयक कामगिरी

हिंदुस्थानातील इतर भाषांतील वाङ्‌मयाप्रमाणे बंगाली गद्य वाङ्‌मय हे अर्वाचीन आहे. पूर्वकाळी विचार पुष्कळ वेळा काव्यरूपाने लिहिले जात; मग पुस्तक संस्कृत असो, प्राकृत असो. बंगाली भाषेत पहिली अभिजात गद्यरचना करणारा पुरुष म्हटला म्हणजे जगद् विख्यात राजा राममोहन रॉय. याबद्दल पुष्कळ वादविवाद व मतवैचित्र्य असले तरी, आता सर्वसामान्य मत असेच आहे की, बंगाली गद्यातही अभिनव विचार मांडता येतात. गंभीर विषयांवरील गहन विचार बंगाली भाषेत दाखविता येतात हे प्रथम राजांनीच बंगाली जनतेस शिकविले. राजा राममोहन रॉय यांची पुष्कळ स्तोत्रे, परमेश्वर प्रार्थना गद्यात असल्या तरी त्या रसाळ, मनोवेधक व आनंदकारी आहेत; त्या प्रेमळ व सहज आहेत. हृदयाची निर्मळता त्यांत स्पष्टपणे दृग्गोचर होते.

राजांची भाषा साधी व सुंदर असली तरी ते सौंदर्य अगदी सरळ होते; त्यांत प्रौढता नव्हती; तेथे लालित्य नव्हते; तेथे सागराचे गांभीर्य व गगनाचे गौरव नव्हते. बंगाली वाङ्‌मयास लालित्यपूर्ण बंकिमने बनविले. बंकिमचंद्र यांनी बंगाली भाषा भूषविली; तिला अलंकार चढविले. असा एकही लेखनप्रकार नव्हता की, जो बंकिमने आपल्या ओजस्वी भाषेत ओतला नाही. स्वभावचित्रे कशी रेखाटावी, टीका कशी करावी, निबंध, प्रबंध कसे लिहावे, हे सर्व त्यांनी दाखविले. परंतु बंकिमची यक्षिणीची कांडी फिरण्यापूर्वी आणखी एका पुरुषाने बंगालीस जीवनामृत दिले होते. राजा राममोहन रॉय नंतर बंगाली पंडितांच्या हाती गेली. तेथे ती अनेक संस्कृतप्रचुर शब्दरचनेने दुर्बोध होऊ लागली. तिचा जीव घाबरा होऊ लागला. उडू पाहणारा पक्षी पुनः ओढला जाऊ लागला. मुक्त होणार्‍यावर पुनः दडपण पडू लागले. संस्कृत भाषा बंगालीस फारच जाचू लागली. अशा वेळी विद्यासागर पुढे आले आणि त्यांनी बंगाली भाषेस या वरील पंडितप्रवरांच्या करपंजरांतून मुक्त केले. पहिले पुस्तक जे बंगालीत विद्यासागर यांनी लिहिले ते वेताळपंचविशी हे होय. हा ग्रंथ गंभीर विषयावर नसला तरी त्यातील सुंदर भाषा व भाषासरणी पाहून वाङ्‌मयकोशात नवीन तारा विहार करावयास आला, आपले तेज दाखवू लागला असे लोक बोलू लागले. हे पुस्तक क्रमिक पुस्तक म्हणून लावले जावे असे विद्यासागर यांनी शिक्षणाधिकार्‍यांस विनविले. रेव्ह. के. सी. बॅनर्जी या गृहस्थास सरकारने या पुस्तकाबद्दल मत विचारले. आश्चर्यांची गोष्ट ही की, या बॅनर्जींनी हे पुस्तक चांगले आहे, अशी शिफारस केली नाही. परंतु आजसुद्धा या पुस्तकाच्या कित्येक प्रति दरसाल खपतात, यावरून हे पुस्तक किती लोकप्रिय आहे हे दिसून येईल.

विद्यासागर निराश न होता श्रीरामपूर येथील मिशनरी लोकांकडे गेले. या मिशनरींचे मार्शमन नावाचे एक गृहस्थ पुढारी होते. आजपर्यंत प्रसिद्ध झालेल्या सर्व पुस्तकांत हे वेताळपंचविशी पुस्तक उत्कृष्ट आहे, असे या मार्शमनसाहेबांनी मत दिले. आणि या साहेबांनी पुरस्कार केल्याने ईश्वरचंद्र यांचे पहिले पुस्तक जगात जन्म पावले. हे पुस्तक या मिशनरींच्या छापखान्यातच छापले. मिशनरींनी पुरस्कार केल्यामुळे हे पुस्तक क्रमिक पुस्तक म्हणून लागले. या पुस्तकाच्या पहिल्या आवृत्तीत पुष्कळ मोठेमोठे संस्कृत शब्द, सामासिक शब्द होते. अशा समासप्रचुररचनेने भाषा सुंदर न दिसता बोजड व दुर्बोध होते, असे विद्यासागर यांच्या चटकन् ध्यानात आले. अशा ओझ्याने भाषा फोफावत नाही हे त्यांस दिसले. या कारणाने चतुर व व्यवहारपटू माणसाप्रमाणे विद्यासागर यांनी या सर्व अवजड गोष्टी आपल्या ग्रंथातून दूर केल्या.

ईश्वरचंद्र विद्यासागर

पांडुरंग सदाशिव साने
Chapters
ईश्वरचंद्र विद्यासागर 1 ईश्वरचंद्र विद्यासागर 2 ईश्वरचंद्र विद्यासागर 3 ईश्वरचंद्र विद्यासागर 4 ईश्वरचंद्र विद्यासागर 5 ईश्वरचंद्र विद्यासागर 6 ईश्वरचंद्र विद्यासागर 7 ईश्वरचंद्र विद्यासागर 8 ईश्वरचंद्र विद्यासागर 9 ईश्वरचंद्र विद्यासागर 10 ईश्वरचंद्र विद्यासागर 11 ईश्वरचंद्र विद्यासागर 12 ईश्वरचंद्र विद्यासागर 13 ईश्वरचंद्र विद्यासागर 14 ईश्वरचंद्र विद्यासागर 15 ईश्वरचंद्र विद्यासागर 16 ईश्वरचंद्र विद्यासागर 17 ईश्वरचंद्र विद्यासागर 18 ईश्वरचंद्र विद्यासागर 19 ईश्वरचंद्र विद्यासागर 20 ईश्वरचंद्र विद्यासागर 21 ईश्वरचंद्र विद्यासागर 22 ईश्वरचंद्र विद्यासागर 23 ईश्वरचंद्र विद्यासागर 24 ईश्वरचंद्र विद्यासागर 25 ईश्वरचंद्र विद्यासागर 26 ईश्वरचंद्र विद्यासागर 27 ईश्वरचंद्र विद्यासागर 28 ईश्वरचंद्र विद्यासागर 29 ईश्वरचंद्र विद्यासागर 30 ईश्वरचंद्र विद्यासागर 31 ईश्वरचंद्र विद्यासागर 32 ईश्वरचंद्र विद्यासागर 33 ईश्वरचंद्र विद्यासागर 34 ईश्वरचंद्र विद्यासागर 35 ईश्वरचंद्र विद्यासागर 36 ईश्वरचंद्र विद्यासागर 37 ईश्वरचंद्र विद्यासागर 38 ईश्वरचंद्र विद्यासागर 39 ईश्वरचंद्र विद्यासागर 40 ईश्वरचंद्र विद्यासागर 41 ईश्वरचंद्र विद्यासागर 42 ईश्वरचंद्र विद्यासागर 43 ईश्वरचंद्र विद्यासागर 44 ईश्वरचंद्र विद्यासागर 45 ईश्वरचंद्र विद्यासागर 46 ईश्वरचंद्र विद्यासागर 47 ईश्वरचंद्र विद्यासागर 48 ईश्वरचंद्र विद्यासागर 49 ईश्वरचंद्र विद्यासागर 50 ईश्वरचंद्र विद्यासागर 51 ईश्वरचंद्र विद्यासागर 52 ईश्वरचंद्र विद्यासागर 53 ईश्वरचंद्र विद्यासागर 54 ईश्वरचंद्र विद्यासागर 55 ईश्वरचंद्र विद्यासागर 56 ईश्वरचंद्र विद्यासागर 57 ईश्वरचंद्र विद्यासागर 58 ईश्वरचंद्र विद्यासागर 59 ईश्वरचंद्र विद्यासागर 60 ईश्वरचंद्र विद्यासागर 61 ईश्वरचंद्र विद्यासागर 62 ईश्वरचंद्र विद्यासागर 63 ईश्वरचंद्र विद्यासागर 64 ईश्वरचंद्र विद्यासागर 65 ईश्वरचंद्र विद्यासागर 66 ईश्वरचंद्र विद्यासागर 67 ईश्वरचंद्र विद्यासागर 68 ईश्वरचंद्र विद्यासागर 69 ईश्वरचंद्र विद्यासागर 70