ईश्वरचंद्र विद्यासागर 62
ईश्वरचंद्रांचा अभ्यास झाला आहे की नाही हे ते स्वतः पाहावयाचे. जरी त्यांस संस्कृतीची विशेष माहिती नसे, तरी त्यांस वाचता येत असे. आणि त्यामुळे विद्यासागरांस जो धडा असे, तो धडा ते तोंडपाठ करून घ्यावयाचे. विद्यासागर जर एक अक्षरही चुकले, तर त्याची कंबक्तीच भरावयाची. मुलास घरी फार काम असते याचा विचार ठाकुरदास करावयाचे नाहीत. कधी कधी ते विद्यासागर यास इतके मारीत की, त्याच्या घरची मालकीण ठाकुरदासांस सांगे, ‘अहो, तुम्ही ही जागा सोडून का जात नाही? ढोराप्रमाणे त्या लहान मुलास तुम्ही मारता; असे कसाब कसे तुम्ही?’ ही बाई जरा सदय अंतःकरणाची होती. विद्यासागरांस ठाकुरदास मारून रक्तबंबाळ करायचे. आजूबाजूचे लोक मग या गरीब मुलाची या दुष्ट बापाच्या हातून सुटका करीत. एक दिवस तर विद्यासागर घरातून पळून गेले; परंतु सायंकाळ झाल्यावर पुन्हा घरी आले. जाणार कोठे? किती मारले सवरले, तरी ते बापाकडेच येणार. त्या दिवशी अर्थात पळून जाण्याबद्दल विद्यासागरांस वडील रागावले नाही.
जेथे विद्यासागरांस स्वयंपाक करावयाचा असे, ते स्वयंपाकघर अत्यंत गलिच्छ असे. त्या काळी कलकत्त्यात मो-या वगैरे नीट सुधारल्या नव्हत्या. संडास, घाणेरडे पाणी, मो-या गलिच्छ असा कारभार. या विद्यासागरांच्या स्वयंपाकघरात किडे यायचे. जिवंतपणीचा नरकच तेथे होता. रात्रीच्या वेळी काय होई, विद्यासागरांचे भाऊ, वडील वगैरे बाहेरच्या खोलीत जेवावयास बसत. अर्थात वाढणारे विद्यासागरच असावयाचे. जेवणे झाल्याबरोबर बाहेरची मंडळी तेथेच उष्टी काढून लगेच आपल्या पथारी पसरून देत व झोपी जात. विद्यासागर कोठे जेवावयास बसतील याची त्यांस फिकीर नसे. त्या किड्यांच्या राज्यात विद्यासागर जेवावयास बसत. दोन-तीन पाण्याचे तांबे भरून ते घेत. किडा जवळ आला की, त्याच्या अंगावर जोराने पाणी उडवून त्यास ते दूर करीत. अशा त-हेने आजूबाजूस सर्व पाणी व्हावयाचे. या ओलट जमिनीवर त्यांचा व्यवहार चालावयाचा. परंतु विद्यासागर यांची प्रकृती जात्याच हूड व बळकट म्हणून या सर्व दिव्यातून ते सहीसलामत बाहेर पडले. नाही तर क्षय, मलेरिया, सांधे धरणे वगैरे नाना रोग त्यांस जडले असते.
अशा प्रकारची खडतर तपश्चर्या बालपणी करावी लागल्यामुळे विद्यासागर हे निरहंकारी राहिले, साधे राहिले यात विशेष आश्चर्य नसेल असे तुम्ही मानू नका. जे असे लहानपणी कष्ट सोसतात, त्यांस वैभव मिळाले म्हणजे लहानपणाच्या दुःखाचा केव्हा सूड घेऊ असे होते. व मग ते इतका भोगविलास वगैरे करतात की, जसे काय स्वर्गातील राजे. विद्यासागरांचे तसे काही नाही. पंडित झाले तरी बल्लवाचे काम ते आनंदाने करताहेत; महाविद्यालयाचे प्रिन्सिपॉल रुपये ५०० पगार झाला, तरी बाजार स्वतः करून खांद्यावर सामानाची जड झोळी घेऊन येत आहेतच. शेवटपर्यंत ते असे निरहंकारी राहिले. चैन हा शब्द त्यांस माहीत नसे. त्यांस एक चैन करावीशी वाटे, ती म्हणजे पुस्तकांच्या बाबतीत. सुंदर सोनेरी पुठ्ठ्याची सुरेख बांधणीची पुस्तके त्यांना आवडायची. नवीन पुस्तक दिसले की, ते घ्यावयाचे. एवढी एक चैन त्यांस असे. परंतु त्यास दुसरी कसली हौस नसे. त्यांचे कपडे अगदी साधे, जाडेभरडे असत. ते दुस-यास सुंदर गिरणीचे कापड घेऊन देत, परंतु स्वतः हातमागावरील जाडे कापड वापरीत. विद्यासागर लहानपणी संस्कृत महाविद्यालयात शिकत असता त्यांस जी शिष्यवृत्ती मिळे, त्यातून ते आपल्या गरीब सहाध्यायांस सुदंर कपडे करून देत; परंतु त्यांचा स्वतःचा कपडा अगदी साधा जाडाभरडा असे. मुलाने या बाबतीत, दुस-या मुलांस देण्याच्या बाबतीत किती पैसा खर्च केला तरी त्याचे वडील ठाकुरदास त्यास बोलत नसत. उलट मुलामधील ही उपजत दानबुद्धी, परोपकारबुद्धी कशी वृद्धिंगत होईल हेच ठाकुरदास पाहत. अभ्यासात जरा चुकले तर पाठीचे धिरडे करणारे ठाकुरदास अशा समयी मुलाची पाठ थोपटीत व ‘चांगले केले बेटा, असेच करावे बरे.’ असे उत्तेजन देत. मोठ्या मोठ्या अधिका-यांजवळ विद्यासागर यांची दोस्ती. परंतु राजाची भेट घेणे असो वा रंकाच्या चंद्रमौळी झोपडीत जावयाचे असो, विद्यासागराच्या वेषरचनेत काही फरक म्हणून कधी होत नसे. मोठमोठ्या अधिका-यांच्या, लेफ्टनंट गव्हर्नराच्या मोटारीतही ते त्यांच्या बरोबर बसून जात. परंतु विद्यासागर यांस आपल्या साध्या पोषाखाने जाण्यास कधी लाज वाटली नाही.