ईश्वरचंद्र विद्यासागर 30
लहानपणी विधवांच्या स्थितीबद्दल अशी अनुकंपा दाखविणारा बाल ईश्वर, पुढे तीच वृत्ती बाळगिता झाला. विद्यासागर यांच्या पूर्वीही विधवाविवाहाबद्दल खटपटी झाल्या होत्या. परंतु विद्यासागर यांनी जे धैर्य, जो उत्साह, जी कळकळ दाखविली, ती मात्र आजपर्यंत अभूतपूर्व अशी होती. ते पिच्छा पुरवावयाचे, सारखे ध्येयाच्या मागे असावयाचे. अर्धवट कार्य सोडणे हा दांक्षिणात्यांचा स्वभाव त्यांस परिचित नव्हता.
ब्राह्मपंथीय लोक अनेक कारणांनी हिंदूसमाजापासून निराळे मानले गेले. विद्यासागर हे ब्राम्ही नव्हते. हिंदूसमाजातच राहून त्यांस जे काम करावयाचे होते, ते त्यांनी केले. यामुळे इतर सुधारणा करू पाहणार्यांस जे एक प्रकारचे संकुचितत्व प्राप्त होई, ते यांस नव्हते. हे आपल्यामधीलच आहेत असे समाजास वाटे.
हिंदू जातीवर जुन्या शास्त्रीमंडळींचा विलक्षण ताबा आहे, हे ईश्वरचंद्र यांस माहीत होते. तेव्हा या शास्त्रीमंडळींस आधी आपण कुंठित केले पाहिजे, असा विद्यासागर यांनी विचार केला. जुने हिंदूधर्मशास्त्रज्ञ विधवाविवाह मानतात की नाही? विधवाविवाह सशास्त्र आहे का अशास्त्र आहे, हे त्यांस एकदा नीट शोधून काढावयाचे होते.
त्या वेळेस ईश्वरचंद्र संस्कृत महाविद्यालयाचे सर्व कामकाज करून नंतर आपला उरलेला वेळ स्मृतीचे अध्ययन करण्यात दवडीत. असे सांगतात की, तिसर्या प्रहरापासून तो सर्व रात्रभर, दुसरा दिवस उजाडेपर्यंत ते संस्कृत महाविद्यालयातील जुन्या ग्रंथांच्या राशीत वाचीत बसलेले असायचे, सायंकाळ झाली म्हणजे त्यांचा एक मित्र त्यांस अल्पोपहार करण्यास काही तरी आणून देत असे; किंवा कधी कधी ते स्वतः मित्राच्या घरी जाऊन, तेथे भोजन करून पुनः आपल्या ग्रंथालयात-महाविद्यालयात येत. महाविद्यालयातील ग्रंथालय हेच त्यांचे घर झाले होते. त्यांस जुन्या धर्मशास्त्राचे अवलोकन करून त्यात कोठे पुनर्विवाहास संमती आहे की नाही हे पाहावयाचे होते, हेच एक वेड त्यांस लागले. त्यांस अन्य काही सुचेना. जसजसे जास्त दिवस जात चालले, तसतसे ते अधीर होऊ लागले.
एक दिवस मोठ्या कष्टी अंतःकरणाने, जड मनाने मंद मंद पावले टाकीत ते आपल्या घराकडे येत होते; पुनर्विवाहासंबंधी असलेल्या काही श्लोकांचा त्यांस स्पष्ट अर्थ लागत नव्हता; त्या वचनांची नीट सांगती त्यांस लावता येत नव्हती. परंतु एकाएकी त्या श्लोकांची, त्या वचनांची संगती कशी लावता येईल याबद्दल त्यांच्या मनात प्रकाश पडला. ते घरी जात होते; परंतु पुनः परतले, महाविद्यालयात आले. ते श्लोक घेऊन त्यांच्यावर त्यांनी टीका लिहिली.
ही टीका लिहून संपली त्या वेळेस सूर्याचे सोनेरी किरण ग्रंथालयाच्या वातायनांतून आत डोकावू लागले होते. विद्यासागरांचे हृदय आनंदाने भरून आले. आपणास जे पाहिजे होते ते मिळाले, जे शोधीत होतो ते लाभले असे पाहून त्यासं सर्व श्रमांचा परिहार झाल्याप्रमाणे वाटले. त्यांचे विचार सूर्यकिरणांप्रमाणे सुंदर होते; त्याप्रमाणे त्यांच्या हृदयात आनंद होता; आशा खेळू लागली, दुःख दूर झाले; कष्ट कोठेच निघून गेले. आनंदभरात ‘शेवटी मला मिळाले, शेवटी मला सापडले’ असे ते कितीदा म्हणाले व टाळ्या पिटून नाचले. सत्त्वासाठी, एखाद्या ध्येयासाठी कष्ट करणार्यास त्या ध्येयप्राप्तीनंतर जो आनंद प्राप्त होतो त्याची खरी गोडी तेच जाणोत. इतरांस त्या आनंदाची कल्पना येणे शक्य नाही. ईश्वरचंद्रांचे मित्र या सुमारास त्यांच्या खोलीत जमा झाले होते. एवढा आनंद ईश्वरचंद्रांस का झाला, ईश्वरचंद्रांस काय मिळाले हे त्यांच्या लक्षात येईना. ‘काय, सापडले तरी काय आपणाला’ असे सकौतुक त्या मित्रमंडळीने त्यांस पुसले. सर्व हकीकत विद्यासागर यांनी त्या मित्रांस सांगितली. विद्यासागरांच्या श्रमांचे सार्थक झाले असे त्यांस वाटले.