ईश्वरचंद्र विद्यासागर 47
ज्या दीनबंधू मित्राचे हे नीलदर्पण नाटक, त्यांनीसुद्धा आपले ‘द्वादश कविता’ हे पुस्तक विद्यासागरांस अर्पण केले आहे. त्या अर्पणपत्रिकेत दीनबंधू लिहितात, ‘आपण बंगाली वाङ्मयाचे जनक आहात, बंगाली भाषा आपली कन्या आहे.’ (आपणार तनया) दीनबंधू हे पोस्टमास्तर होते. त्यांचा पगार अगदी थोडा असे. त्यांस इतर स्थावर मिळकत, जमीनजुमला काही एक नव्हते. दीनबंधू अकस्मात एके दिवशी निवर्तले. त्यांचे कुटुंब मोठे होते. या कुटुंबास दुसरा आधार नाही. परंतु विद्यासागर होते ना! विद्यासागर यांनी आपल्या मित्राच्या कुटुंबास कित्येक दिवस सर्वतोपरी सांभाळिले. नवीनचंद्रसेन हे प्रख्यात बंगाली कवी. यांससुद्धा ईश्वरचंद्रांनी वाढविले. नवीनचंद्र अगदी गरीब होते. दारिद्र्याने गारठून जाणारे हे सुंदर कमळ होते. विद्यासागरांनी हे कमळ, हे सुंदर फूल, टवटवीत व सुंदर ठेविले. नवीनचंद्रास शिकण्यास सर्वतोपरी मदत विद्यासागरांची. कृतज्ञताबुद्धीने नवीनचंद्रांनी आपले अभिनव ‘पलाशिर युद्ध,’ ‘प्लासीची लढाई’ हे महाकाव्य ईश्वरचंद्रांच्या चरणी वाहिले. त्या अर्पणपत्रिकेत ते लिहितात, ‘देवा, मी अफाट सागरात गटांगळ्या खात होतो. परंतु आज परतीरास येऊन लागलो आहे. आपले वात्सल्य व प्रेम यांचे हे कार्य आहे. मी पूर्वी आपले चरण माझ्या कढत अश्रूंनी भिजविण्यासाठी आपणाकडे आलो होतो. आपण सदय झालात. दयेच्या एका बिंदूने माझी सिंधूप्रमाणे अफाट आपदा आपण हरण केलीत. आज मी पुन्हा आपल्या चरणांजवळ आलो आहे. चिंतादावानलाने दग्ध झालोली माझी मनोवल्लरी आज पुनरपि टवटवीत आहे. आज माझे तोंड अश्रूंनी डवरलेले नाही; चिंतेने काळवंडलेले नाही; हृदय आनंदाने पूर्ण आहे; मुखमंडल प्रफुल्ल आहे. देवा, माझ्या मनोवल्लीचे एक कुसुम आपल्या चरणांवर वाहण्यास मी आलो आहे. त्याचा प्रेमाने व कौतुकाने स्वीकार करा.’
मायकेल मधुसूदन दत्त यांनी एका चतुर्दश पद्यावलीत विद्यासागरांचा गौरव केला आहे. नाटककार, कवी हे जसे विद्यासागरांचे मित्र व त्यांस देवाप्रमाणे मानणारे, त्याप्रमाणे इतरही मोठेमोठे गृहस्थ होते. गुरुदास बॅनर्जी हे कलकत्ता विद्यापीठाचे पहिले हिंदी व्हाईस चॅन्सलर, कर्झनने नेमलेल्या शिक्षणचौकशीमंडळात ते नेमले गेले होते. हे फार विद्वान, साधे व सरळ. यांची आई निवर्तल्यावर, आईच्या सर्व प्रेतसंस्कारांनंतर, त्यांना काही तरी आईच्या नावे धर्मादाय करावयाचा होता. त्यांनी एक सुंदर सोन्याचे जडावाचे पानपात्र तयार केले; आणि मग ते विद्यासागर यांस अर्पण करावयाचे असे ठरविले. विद्यासागरांपेक्षा जास्त पवित्र कोण ब्राह्मण मिळणार? परंतु विद्यासागर या गोष्टीस कबूल होईनात. शेवटी गुरुदास मोठ्या प्रेमाने म्हणाले, “माझ्या आईसाठी हे मी देतो आहे ना?” झाले. ‘आई’ या दोन अक्षरी मंत्राचा नेहमीप्रमाणे परिणाम झाला. आई या शब्दाने ईश्वरचंद्र वश व्हावयाचेच. मला आई नाही असे कोणी म्हटले की, विद्यासागर त्याच्यासाठी रडावयाचे. आई हे त्यांचे जीवन होते. आई हे अनुपम प्रेमाचे, भक्तीचे, सर्वस्वाचे त्यांना स्थान होते. त्रिभुवनातील सौंदर्य ‘आई’ या दोन स्वरांत साठविले होते. सर्व पावित्र्य, सर्व चांगुलपणा, सर्व प्रेम यांचे ठिकाण, एकमेव निवासस्थान म्हणजे हे दोन स्वर.
विद्यासागर यांनी ते पानपात्र घेतले. गुरुदासांसारखा मातृभक्त दाता व विद्यासागरांसारखा परम मातृभक्त या दानाचा परिग्रह करणारा. याहून मोठा योगायोग कोठे जुळून येणार? या करंडकावर खालील अनुष्टुप् वृत्तातील श्लोक गुरुदासांनी कोरविला होता.
पानपात्रमिदं दत्तं विद्यासागरशर्मणे ।।
स्वर्गभावतया मातुर्गुरुदासेन श्रद्धया ।। १ ।।
कैलासचंद्र बसु म्हणून दुसरे एक बडे गृहस्थ विद्यासागरांचे मित्र होते. यांनी विद्यासागरांचा एक मोठा फोटो त्यांच्याकडून स्वतःसाठी मागून घेतला. आपल्या घरी आणून त्याच्याखाली खालील श्लोक त्यांनी मोठ्या प्रेमाने लिहिलाः
श्रीमानीश्वरचंद्रो यं विद्यासागरसंज्ञकः
भूदेवकुलसंभूतो मूर्तिमद्दैवतं भुवि ।।