ईश्वरचंद्र विद्यासागर 64
मी काही अन्नार्थी-पोटार्थी येथे आलो नाही; अन्नासाठी मी सुजलो नाही.” गोष्ट निकरावरच आली तेव्हा विद्यासागर म्हणाले, “अहो, मला तर तुम्ही सकाळपासून पाहत आहात. मीच हो तो विद्यासागर. असे रागावू नका. मनात म्हटले तुम्हांस जरा विश्रांती वगैरे मिळाली म्हणजे मग सांगू एकमेकांस.” विद्यासागरांचे हे शब्द ऐकून तो गृहस्थ ओशाळला. जो पुरुष आपली एवढी बडदास्त स्वतः अंगे ठेवीत होता, तो पुरुष म्हणजेच विद्यासागर! खरे असेल का? अशी क्षणभर शंका त्या गृहस्थास आली. परंतु क्षणभरच. नंतर त्या गृहस्थाने आपला पूर्व अनुभव विद्यासागरांस सांगितला व म्हणाला, “मला आज एक थोर पुरुष सापडला. आपण मात्र खरोखर थोर म्हणून घेण्यास पात्र आहात. आपली महती खरी व यथार्थ आहे. मोठेपणा ख-या विनयाने शोभतो.” विद्यासागरांस आत्मश्लाघा आवडत नसे. ते केवळ गप्प बसले होते. ते गृहस्थ दोन दिवस पाहुणचार घेऊन आपल्या घरी निघून गेले.
कोणीही परका गृहस्थ भेटला तर त्यास आधी ‘आपले जेवण झाले का?’ असे विद्यासागर विचारावयाचे. स्वर्माटाड येथील बंगल्यावर विद्यासागर राहत असता एक गृहस्थ काही कामासाठी त्यांच्याकडे आला. त्यास विद्यासागरांनी विचारले, “आपले जेवण झाले आहे का?” हा प्रश्न ऐकून तो गृहस्थ रडू लागला. त्याचे डोळे पाण्याने भरून आले. “अहो रडता का? काय पाहिजे ते सांगा.” असे आश्वासनपर विद्यासागर त्यास म्हणाले. “आजपर्यंत मी अनेक ठिकाणी गेलो; मी मुशाफिर आहे. परंतु असला प्रश्न तुम्हीच केलात म्हणून आपले मन पाहून मी आनंदित झालो. तुमच्यावर या संताळ्यांचे प्रेम का आहे ते मला आता उमजले म्हणून माझे डोळे आनंदाश्रू ढाळीत आहेत. मी आपणाकडे अन्य कामासाठी आलो आहे. देवकृपेने जेवणाची वगैरे मला ददात नाही”, असे त्या गृहस्थाने त्यांस सांगितले.
विद्यासागर जरी इतके साधे व विनम्र होते तरी ते स्वाभिमानी पण होते. अपमान त्यांस सहन होत नसे. जेथे आपली मानखंडना होते, तेथे ते क्षणभरही राहावयाचे नाही. स्वाभिमान राखता येईना म्हणून त्यांनी बड्या पगाराच्या नोकरीवर कशी लाथ मारली, घरी पंचाईत होती तरी तिळभर विचार कसा केला नाही, हे मागे सांगितलेच आहे. घरी दारिद्र्य, समोर मोठ्या पगाराची नोकरी अशा वेळी असा स्वाभिमान किती लोक दाखवू शकतील?
जे स्वतःस मोठे प्रतिष्ठित समजून दुस-यांस तुच्छतेने लेखतात, त्यांस धडा घालून द्यावयाचा हे विद्यासागरांचे ब्रीद होते. एकदा हिंदू कॉलेजचे प्रिन्सिपॉल कारसाहेब यांस विद्यासागर भेटावयास गेले होते. परंतु कारसाहेबांनी ‘या बसा’ वगैरे एक शब्दही उच्चारिला नाही. विद्यासागरांकडे त्यांनी ढुंकूनही पाहिले नाही. विद्यासागर मनात सर्व उमजले. ही गो-या गृहस्थाची गुर्मी आहे; हे मदोद्धत आहेत. आपण पडलो काळे एतद्देशीय. बरे आहे. पाहून घेऊ. वगैरे मनात विचार करीत विद्यासागर घरी निघून गेले.