ईश्वरचंद्र विद्यासागर 7
संस्कृत महाविद्यालयात प्रवेश व तेथील अभ्यास
संस्कृत महाविद्यालयात वयाच्या नवव्या वर्षी ईश्वरचंद्र यांचे नाव दाखल करण्यात आले. या संस्कृत महाविद्यालयातील सर्व प्रकारचा शिक्षणक्रम त्यांनी २१ व्या वर्षी पुरा केला. प्रत्येक शास्त्रात त्यांनी पांडित्य संपादन केले. प्रत्येक शास्त्रात ते पारंगत म्हणून समजले गेले. ‘आपण कधीही असा बुद्धिमान विद्यार्थी पाहिला नाही.’ असे उद्गार त्यांच्या सर्व शिक्षकांनी सदैव काढावे. संस्कृत व्याकरण म्हणजे किती कष्टाचे व घोटाळ्याचे! परंतु ११ व्या वर्षी हे शास्त्र त्यांनी संपविले. नंतर त्यांनी साहित्याकडे नजर फेकली. इतका लहान वयाचा मुलगा माझ्या वर्गात नको असे साहित्याचार्यांनी सांगितले. सुंदर व दुर्बोध असे संस्कृत साहित्य यास काय समजणार? मर्कटासमोर मोती दाखविण्याप्रमाणे ते आहे वगैरे ते म्हणाले. परंतु ईश्वरचंद्र याने थोडेच गप्प बसणार! ‘मी संस्कृत महाविद्यालयच सोडून चाललो; नाही तर मला त्या वर्गात बसण्यास परवानगी द्या’ असा विद्यासागराने हट्ट धरला. ‘माझी वाटेल तर परीक्षा घ्या. त्या परीक्षेत उत्तीर्ण झालो तरच मला तुमच्या वर्गात बसण्यास परवानगी द्या; नाही तर देऊ नका’ असे स्वाभिमानपूर्वक त्यांनी गुरूंस सांगितले. विद्यासागरांची ही सूचना मान्य करण्यात आली. कुमारसंभव व भट्टिकाव्य यांतील गहन व दुर्बोध श्लोकांचा अन्वयार्थ त्यांस विचारण्यात आला. विचारलेल्या प्रश्नांची त्यांनी अत्यंत समाधानकारक अशी उत्तरे दिली. परवानगी न देणारे आचार्य आश्चर्यमूढ झाले व त्यांनी मोठ्या आनंदाने विद्यासागरांस आपल्या वर्गात दाखल करून घेतले. १४ वर्षांचे होतात न होतात तोच त्यांनी साहित्यभाग संपविला. प्रत्येक वेळेस ते पहिले आले. प्रत्येक प्रश्नपत्रिकेतही ते पहिले. रघुवंश, कुमारसंभव, राघव-पांडवीय, भारवी व माघ यांची महाकाव्ये, मेघदूत, शाकुंतल, विक्रमोर्वशीयम्, उत्तररामचरित्र वगैरे सर्व प्रमुख साहित्यग्रंथी त्यांनी आत्मसात केले. संस्कृतमध्ये ते आता उत्कृष्ट कविताही लिहीत व त्या वाचून सर्वांस आनंद वाटत असे. मायभाषेप्रमाणे ते आता संस्कृत भाषेतही अस्खलित भाषण करीत व कोणाही पंडिताबरोबर या गीर्वाण भाषेत वाग्युद्ध करण्यास ते बद्धपरिकर असत. हे वाग्वैभव त्यांच्या वर्गबंधूंस थक्क करी; एवढेच नव्हे तर त्यांचे गुरुजनही विस्मयाने तोंडात बोटे घालीत. सतत परिश्रमाने व अभ्यासाने त्यांनी आपली स्मरणशक्ती इतकी वृद्धिंगत केली की, एकदा एखादी गोष्ट वाचली किंवा त्यांनी श्रवण केली की ताबडतोब ती विद्यासागर आपलीशी करीत आणि तोंडपाठ म्हणून दाखवीत.
विद्यासागर यांस शिष्यवृत्ती मिळत असे. आपल्या मनातील आकांक्षा पूर्ण करण्यास आपला पुत्र योग्य आहे हे दिसून येताच, ठाकुरदास यांनी ईश्वरचंद्राच्या त्या शिष्यवृत्तीतून आपल्या मूळ ग्रामी काही जमीन खरेदी करण्याचे ठरविले; कारण तेथे आपल्या मुलाने पाठशाळा उघडून ज्ञानसत्र घालावे अशी त्यांची महनीय इच्छा होती. त्या पाठशाळेत योग्य विद्यार्थ्यांना मोफत राहायला व जेवायला मिळावे अशी सोय व्हावी अशी ठाकुरदास यांची इच्छा होती. बंगालमध्ये अशा पुष्कळ पाठशाळा होत्या की, ज्या पाठशाळेत विद्यार्थ्यांस मोफत शिक्षण, मोफत भोजन व मोफत निवासस्थान दिले जाई. माझे एक मित्र आहेत ते सांगतात की, त्यांच्या आजोबांच्या वेळी त्यांच्याकडे जवळ जवळ १५ विद्यार्थी शिक्षण घेण्यास होते व ते त्यांच्याबरोबरच जेवणखाण सर्व काही करीत. घरातील मुलांप्रमाणे या विद्यार्थ्यांची काळजी घेण्यात येत असे व गृहपति त्यांस शिक्षण देत असे. अशीच पाठशाळा आपल्या पुत्राने चालवावी ही या ठाकुरदासमहाशयांची इच्छा होती. ईश्वरचंद्राने पित्याच्या म्हणण्यास आनंदाने रुकार दिला. खरोखरच वीरसिंह येथे काही जमीन खरेदी करण्यात आली. परंतु ही भावी योजना शेवटी सफळ झाली नाही. कारण खेडेगावात फक्त पाठशाळा चालविण्याचे या पंडितप्रवराच्या भालप्रदेशी लिहिलेले नव्हते. त्याच्या ललाटरेषेत यापेक्षा मोठ्या गोष्टी लिहिलेल्या होत्या. मोठ्या वातावरणात त्यांस वावरावयाचे होते. बंगालच्या जीवनात हालचाल त्यांस निर्माण करावयाची होती. समाजसुधारणा, शिक्षणसुधारणा, वाङमयसुधारणा त्यांस करावयाच्या होत्या. यामुळे पित्याची ही साधी इच्छा पुढे बाजूस राहिली. व्याकरण व संस्कृत वाङमय संपल्यावर वयाच्या पंधराव्या वर्षी ईश्वर अलंकरा वर्गात दाखल झाला. एका वर्षांतच साहित्यदर्पण, काव्यप्रकाश, रसगंगाधर व इतर साहित्यशास्त्रावरील ग्रंथ त्यांनी आलोचिले. वार्षिक परीक्षेत नेहमीप्रमाणे ते पहिले आले.