ईश्वरचंद्र विद्यासागर 37
विधवांचे अश्रू पुसावयास विद्यासागर यांनी जन्म घालिवला. हे करीत असता खडतर कष्ट, कटु अनुभव, मित्रांचे वियोग, भावांचे शिव्याशाप त्यांस सोसावे लागले. आजही विधवांच्या हालअपेष्टा संपल्या नाहीत. तीच परिस्थिती आजही आहे. भारतवर्ष इतके उदासीन कसे एवढेच फार तर आपण म्हणू. परंतु सज्जनांनी सोसलेले कष्ट, आपदा, या व्यर्थ ठरत नसतात. येशू ख्रिस्ताने जीव दिला आणि नंतर काही शतकांनी सर्व युरोप त्यास देव मानू लागले. सृष्टीचे व्यवहार चुटकीसरसे होत नाहीत. अनेक थोर पुरुषांना कष्टावे लागते, तेव्हा सृष्टिदेवता सुंदर फळ अर्पण करिते. म्हणून विद्यासागर यांचे प्रयत्न फुकटच गेले असे संकुचितदृष्टी मानवांनी तरी म्हणू नये.
विधवाविवाहाशिवाय अन्य सुधारणांशीही विद्यासागर यांचा संबंध होता. बहुविवाहास आळा घालण्याचा त्यांनी प्रयत्न केला. एका पुरुषाने अनेक बायका कराव्या हे तत्त्व त्यांस फार किळसवाणे व अन्याय्य वाटे. बंगालमधील फार उच्चवर्णीय ब्राह्मणांत ही चाल विशेष प्रचारात होती. या ब्राह्मणांस कुलीन असे म्हणत. एकेक कुलीन ब्राह्मण १२ ते ३० बायकाही करी. कधी कधी ही संख्या याच्या दुप्पटही होत असे. स्त्रियांस पुष्कळ वेळा स्वपितमुखावलोकन आयुष्यात एखाद्या वेळीच घडावे असा प्रसंग येई. एका १२ वर्षांच्या मुलास दोन बायका करून दिल्या; आणखी किती देतील याला सीमाच नसे. हे सर्व पाहून विद्यासागर यांचे पित्त खवळे. ‘बहुविवाह’ या आपल्या पुस्तकात त्यांनी या पद्धतीची नुसती रेवडी उडविली आहे. अत्यंत कठोर व सणसणीत टीका त्यांनी या चालीवर केली. ही चाल पडण्याचे कारण असे की, कुलीन ब्राह्मणांत जे पुनः ‘मेल’ असत, म्हणजे संघ असत, त्यांच्यातही एकमेकांत लग्न होत नसे. एका ‘मेलातील’ ब्राह्मणांनी त्याच मेलातील स्त्रियांशी विवाह केले पाहिजेत. या कुलीन ब्राह्मणांत त्या काळी मुलांपेक्षा मुलींची संख्या फार असे आणि त्यातच हे ‘मेल’ असत. त्यामुळे एकेका मुलास १०-१२ बायका कराव्या लागत. ईश्वरचंद्रांनी अगदी कमीत कमी उपाय सुचविला तो हा की, निदान सर्व कुलीनांनी तरी एक व्हावे आणि ही मेलबंधने नाहीशी करावी. परंतु ईश्वरचंद्रांचे सर्व प्रयत्न अनाठायी गेले. त्यांचा उपदेश उपड्या घड्यावर पाणी ओतण्याप्रमाणे व्यर्थ गेला. लोक ऐकत नाहीत तर कायद्याची कास धरून त्यांस वठणीवर आणावे असा विद्यासागर यांनी विचार केला. २१,००० लोकांच्या सह्या घेऊन हा बहुविवाह कायद्याने रद्द करावा अशी मागणी करणारा अर्ज त्यांनी सरकारास सादर केला. बंगालचे जे गव्हर्नर त्यांस सहानुभूती वाटत होती. परंतु त्यांस या प्रकरणात काही करता येत नव्हते. यापूर्वी विधवाविवाह कायदेशीर मानावा म्हणून एक कायदा झालाच होता. १८५७ सालच्या बंडास जी अनेक कारणे होती त्यात हा विधवाविवाह कायदासुद्धा कोणी अंतर्भूत करतात. १८५७ पासून सरकारने कानास खडा लावला की, अतःपर लोकांच्या धार्मिक आचारविचारांत आपण मुळीच हात घालावयाचा नाही. नुकतेच बंड होऊन गेलेले. यासाठी गव्हर्नर म्हणाले, “तुमच्या चळवळीबद्दल मला सहानुभूती वाटते, परंतु माफ करा, या बाबतीत सरकार हात घालू इच्छित नाही.” बंगला सरकारने असा कानांवर हात ठेवलेला पाहून ईश्वरचंद्र हतबुद्ध झाले. विलायतेस जावे आणि पार्लमेंटच्या सभासदांची सहानुभूती संपादून हा बहुविवाह रद्द करण्याचा कायदा पार्लमेंटमधून पास करावा असेही त्यांनी मनात योजिले होते. परंतु अशक्त होणारी प्रकृती, पैशाची टंचाई व आणखी पुष्कळशा इतर गोष्टींमुळे जाणे लांबणीवर पडत चालले व ते कायमचेच लांबले. एकंदरीत या बाबतीतही ईश्वरचंद्र यांस यश आले नाही.