ईश्वरचंद्र विद्यासागर 31
या टीकेच्या समर्थनार्थ, परंपरागत मार्गाने चालणारे, रूढीचे गुलाम अशा लोकांजवळ, त्यांस कसकसे वादविवाद करावे लागले हे येथे सांगत बसण्यात अर्थ नाही. एवढे सांगितले म्हणजे पुरे की त्यांचे मुद्दे पूर्णपणे खात्री करून देणारे होते. त्यांनी केलेले पुनर्विवाहसमर्थन सशास्त्र होते. नीट शांतपणे पाहणार्यास त्यांनी तसे पटवूनही दिले, पुनर्विवाहास सशास्त्र संमती मिळावी एतदर्थ त्यांनी दोन पुस्तके लिहिली आणि त्यांत जेवढा म्हणून पुरावा आणावयास पाहिजे तेवढा त्यांनी आणला व प्रतिपक्षाची पुरेपूर खात्री करून दिली. जुन्या पंडितांनी या श्लोकांचा निराळ्या तर्हेने अर्थ लावण्याची लटपट केली. परंतु ती वायफळ, टाकाऊ व परिताज्य होती, हे विद्यासागर यांनी पूर्वापार संबंधदर्शनाने सर्वांस निर्मलमर्तींस पटवून दिले. ते श्लोक
असे -
नष्टे मृते प्रव्रजिते, क्लीबेच पतिते पतौ ।
पंचस्वापत्सु नारीणां पतिरन्यो विधीयते ।।
‘पती नाहीसा झाला असता, मरण पावला असता, व्राजक (संन्यासी) झाला असता, नपुंसक असता, किंवा समाजापासून भ्रष्ट झाला असता, या पाचही आपत्तीत स्त्रियांनी दुसरा भ्रतार करावा अशी शास्त्राची सांगी आहे.’
तिस्त्रः कोट्योर्धकोटीच यानी लोभानि मानवे ।
तावत्कालं वसेत्स्वर्ग भर्तारं यानुगछति ।।
‘पतिमरणानंतरही जी साध्वी ब्रह्मचारीव्रताने राहते, तिला इतर ब्रह्मचारी पुरुषांप्रमाणे स्वर्गप्राप्ती होईल. जी साध्वी पतीबरोबर सहगमन करते, ती शरीरावर असणार्या सर्व केसांगणिक वर्षे स्वर्गसुख अनुभवील.’
‘कलौ पाराशरस्मृतिः’ असे वचन आहे. कलियुगात पराशराची स्मृती प्रमुख मानिली जावी असा या वचनाचा स्वच्छ अर्थ आहे. या पराशर स्मृतीतच वरील दोन श्लोक आहेत. हे श्लोक ज्या मुलीचे लग्न जमले आहे, त्या मुलीस उद्देशून आहेत. एखाद्या मुलीचे लग्न जमले आणि मग ज्याबरोबर लग्न व्हावयाचे तो परिणेय वर जर लग्न होण्यापूर्वी नष्ट झाला, मृत झाला वगैरे... तर त्या मुलीचे लग्न अन्याबरोबर करावयास हरकत नाही, असा या श्लोकांचा अर्थ आहे असे जुने पंडित म्हणू लागले. प्रत्यक्ष लग्न झालेल्या स्त्रीस हे श्लोक सांगितले नाहीत, असा त्यांनी बुद्धिवाद केला. परंतु या बुद्धिवादाचे तेव्हाच तुकडे उडविणारी विद्यासागर यांची बुद्धी होती. त्यांनी या सर्व गोष्टींचा पूर्वीच विचार केला होता.
विद्यासागर म्हणाले, की पहिला श्लोक अशा अर्थाने जर घेतला तर खालील श्लोक नीट सुसंबद्ध दिसत नाही. खालील श्लोकात पतिनिधनोत्तर ब्रह्मचारी व्रताने राहणारी स्त्री आणि सहगमन करणारी स्त्री यांची प्रशंसा केलेली आहे. अर्थात तो श्लोक अद्याप अविवाहित अशा मुलींना उद्देशून खास नाही. मग हा श्लोक जर पतिमरणानंतर स्त्रियांनी काय करावे एतद्विषयी स्वच्छ दिसतो, तर त्याच्यावरील श्लोक मात्र अद्याप लग्न न झालेल्या मुलींस उद्देशून आहे असे म्हणणे अप्रयोजक दिसते. ज्या अर्थी दोन्ही श्लोक एके ठिकाणी आहेत, त्या अर्थी पतिमरणानंतर उत्तरोत्तर उत्तम असे मार्गच येथे सांगितलेले असले पाहिजेत. कनिष्ठ मार्ग म्हणजे पुनर्विवाह करावा; त्याच्याहून श्रेष्ठतर मार्ग म्हणजे ब्रह्मचारीव्रतस्थिति आणि त्याहूनही उत्कृष्ट मार्ग म्हटला म्हणजे सहगमन करणे. या श्रेष्ठ-कनिष्ठपणाबद्दल मुळीच भेद नाही. सहगमन करण्यास पतिनिष्ठा फारच सोज्ज्वळ असावी लागेल. ती नारी खरोखर त्रिभुवनवंद्य आहे. ब्रह्मचारीव्रताने राहून, व्रते-वैकल्ये-उपोषणे करून मन निर्मळ व पवित्र करू पाहणारी नारी पण धन्य होय. विषयांतून, वासनांच्या गर्तेतून मन काढून घेऊन, बाळकृष्णचरणी लावणार्या ललना कोणास वंदनीय वाटणार नाहीत! ज्या स्त्रीस अशा प्रकारचे खडतर वैराग्य नाही तिने पुनर्विवाहही करावा, असाच एकंदर पूर्वापार संबंध पाहिला म्हणजे, आपणास या श्लोकद्वयाचा अर्थ लावावा लागेल, याबद्दल विद्यासागरांनी सर्वांची खात्री पटविली. निदान त्यांचे स्वतःचे समाधान तरी झाले.