ईश्वरचंद्र विद्यासागर 40
विद्यासागर यांचे लग्न १४ वर्षे संपून पंधरावे लागले, त्या वेळेस झाले. त्यांच्या पत्नीचे नाव दीनमयी. त्यांच्या लग्नातील गोष्ट आहे. नवरानवरी ज्या वेळेस लहान असतात, त्या वेळेस बायका नाना प्रकारच्या चेष्टा करतात. त्यांना ‘एकी का बेकी’ खेळ खेळावयास लावतात. आणखी कित्येक गोष्टी करतात. बंगालमध्येसुद्धा अशीच चाल आहे. विद्यासागर लहान म्हणजे पंधरा वर्षांचे होते. लग्न झाल्यावर बायकांनी काय केले, पुष्कळ मुली जमविल्या. त्यांत काही फारच खट्याळ व व्रात्य होत्या. ‘जमलेल्या मुलींतून आपली बायको शोधून काढा’ असे स्त्रियांनी ईश्वरचंद्रांस फर्माविले. थोड्या वेळापूर्वी लग्न झालेले आणि त्या वेळेस त्यांनी बायकोच्या तोंडाकडेसुद्धा पाहिले नव्हते. कारण, आताप्रमाणे त्या वेळेस परिस्थिती नव्हती. त्या जमलेल्या मुलींपैकी एक जरा फार बोलत होती. व ‘सांगा ना लवकर, काढा ना हुडकून’ वगैरे बोलून चिडवीत होती. ती दिसावयास सुद्धा सुंदर, गोरीगोमटी होती. विद्यासागरांनी तिचा हात जाऊन घट्ट धरला व म्हटले, ‘हीच माझी बायको.’ आता काय करावयाचे? इतर मुली म्हणाल्या, ‘अहो, ही तुमची बायको नव्हे; तिला सोडा.’ तरी विद्यासागर हात सोडीनात. विद्यासागर शरीराने धष्टपुष्ट होते. झाले. त्या मुलीच्या डोळ्यांतून गंगा-यमुना घळघळा वाहू लागल्या तरी विद्यासागर हात सोडीनात. ते म्हणाले, ‘तर मग माझी बायको मला दाखवा म्हणजे माझी खात्री पटेल की, ही माझी बायको नव्हे.’ शेवटी त्यांची बायको जेव्हा त्यांस आणून दाखविण्यात आली, तेव्हा त्या मुलीचा हात त्यांनी सोडला. असे ते हट्टी व करारी होते.
विद्यासागर मोठे पगारदार झाले तरी आपली पत्नी ते कलकत्त्यास नेहमी ठेवीत नसत. मधून मधून तिला ते कलकत्त्यास आणीत. नाही तर आईची शुश्रूषा करावयास ते पत्नी तिकडेच ठेवीत. विद्यासागरांची आई म्हणजे एक रत्न होते. ती जरी शिकली-सवरलेली नसली, तरी फार बहुश्रुत, चाणाक्ष व विचारी होती. तिची बुद्धी तीव्र व गंभीर विषयांतही चाले.
विद्यासागर यांचे एक हॅरिसनसाहेब म्हणून युरोपियन मित्र होते. हे इन्कमटॅक्स ऑफिसर होते. हे आपल्या दौर्यावर असता विद्यासागरांच्या गावी आले. विद्यासागरांच्या आईच्या मनातून हॅरिसन साहेबांस जेवावयास बोलवावयाचे होते. तिने आपल्या मुलाकडून हॅरिसन साहेबांस पत्र लिहविले की, ‘महाशय, आपला मुक्काम येथून लवकरच हालणार आहे. तरी आपण एकदा आमच्याकडे भोजनास येऊन आम्हास आनंदित कराल अशी आशा आहे.’ विद्यासागर सुद्धा कलकत्त्याहून या समारंभास आले. हॅरिसन साहेब विजार नेसून खुरमांडी घालून जेवावयास बसले. भगवतीचे चारी मुलगे बाजूला उभे होते. माता भगवती वाढीत होती, गप्पा-गोष्टी चालल्या होत्या. साहेब इंग्रजीत बोलत व ते भगवतीस बंगालीत विद्यासागर सांगत व आईचे म्हणणे साहेबांस इंग्रजी करून सांगत. मध्येच साहेबांनी भगवतीस विचारले, “आपण इतक्या उदार आहात तर आपल्या जवळ संपत्ती तरी किती आहे?”
भगवती म्हणाली, “आहेत चार रांजण द्रव्याने भरलेले.”
“मला ते आपण दाखवाल का?” असे हॅरिसननी विचारले.
“हो, न दाखवावयास काय झाले?” असे म्हणून भगवतीने आपल्या सोन्यासारख्या चार मुलांकडे बोट केले व म्हणाली, “हा माझा जामदारखाना, ही माझी जिवंत संपत्ती.” भगवतीच्या भाषणाने हॅरिसन संतुष्ट झाले. जाताना ते भगवतीस म्हणाले, “आपण जर चार उपदेशाच्या गोष्टी मला सांगाल तर त्याप्रमाणे वागण्याचा मी निश्चय करीन.”
भगवती म्हणाली, “मी जास्त काय सांगणार? मी बाई माणूस. परंतु आज तुमच्या हातात सत्ता आहे; अधिकार आहे. अधिकाराबरोबर त्याचा सदुपयोग करण्याची जबाबदारी आपणावर येते हे विसरून चालणार नाही. कोणाचेही नुकसान करू नका; कोणाचा तळतळाट माथी घेऊ नका. आपल्या मागे प्रजेने आपले नाव काढावे, आपणास दुवा द्यावा अशा तर्हेचे वर्तन ठेवणे तुमचे कर्तव्य आहे.” अशा प्रकारचा मोलाचा उपदेश या साध्वीने हॅरिसनसाहेबांस केला आणि या हॅरिसन साहेबाने पण कोणाचे कधी नुकसान केले नाही. ज्यांस हॅरिसन माहीत आहे, असे त्या गावातील लोक त्यांची अद्याप मोठ्या प्रेमाने आठवण काढतात.