Get it on Google Play
Download on the App Store

ईश्वरचंद्र विद्यासागर 48

विद्यासागरांचे अनेक फोटो, ज्यांच्या खाली ही कविता लिहिली आहे, असे बाजारात विकण्यात येऊ लागले. शेवटी एक दिवस हा फोटो विद्यासागरांच्या दृष्टीस पडला. त्यांस ही कविता फार आवडली. ते विनोदाने म्हणाले, ‘मी श्रीमान् म्हणजे सुंदर आहेच कारण माझे तोंड कुरूप झाले आहे! मी तर त्या ओरिसा ब्राह्मणांप्रमाणे दिसतो. (हे ओरिसा ब्राह्मण स्वयंपाकी म्हणून ठेवण्यात येत. त्यांच्या डोक्यावर शेंडीचा एक घेरा असे. विद्यासागर यांच्या डोक्यावर अशा प्रकारची शेंडी होती म्हणून हे साम्य.) ब्राह्मण कुळात जन्मलेला आहे! आणि मूर्तिमान् दैवत म्हणजे मूर्तिमान्-पूर्व जन्मांतली कर्मे-कर्मासारखे अन्य मोठे दैवत नाही. यामुळे तर हे सगळे माझे धिंडवडे चालले आहेत. नानाप्रकारचे दुःखोपभोग घेतो आहे.’ अशा प्रकारे कवितेचा अर्थ करून ते हसले. परंतु मग गंभीरपणे म्हणाले, “तुम्ही माझ्यावर प्रेम करता हे पुष्कळ आहे. याने मला आनंद आहे, कृतार्थता आहे, परंतु मला देवबीव करू नका, मी साधा तुमच्यासारखाच एक माणूस आहे झाले.”

शहरातील मोठे मोठे प्रतिष्ठित लोक ज्याप्रमाणे विद्यासागर यांस देव मानू लागले, तसे खेड्यातील जनतेचेही होते. विद्यासागरांची कीर्ती या लोकांच्या कानांवर केव्हाच गेली होती. ‘सुरतसे कीरत बडी, बिनपंख उड जाय’ या तुळसीदासजींच्या उक्तीप्रमाणे कुरूप विद्यासागरांची शुभ्र कीर्ती केव्हाच दशदिशांत पसरली होती. एकदा ते एका खेड्यात गेले. त्यांस पाहावयासाठी लोकांच्या झुंडी लोटल्या. वृद्ध, लहान, नारी-नर सर्वांचे घोळके जमले. त्या समूहात एक मोठी पोक्त बाई होती; ती फार उतावीळ झाली व म्हणू लागली, “आहेत तरी कोठे ते विद्यासागर? मला मेलीला अजून दिसतही नाहीत.” तेव्हा तिच्या जवळच्या एका इसमाने तिला विद्यासागर दाखविले. “इश्श, हेच का ते मोठे गाजलेले विद्यासागर; ढोपरपंचा नेसलेला आहे आणि दिसतो तर भुतासारखा; मुळीच पाहावेसे वाटत नाही यांना.” असे म्हणून ती बाई मोठ्या फणकार्‍याने निघून गेली. विद्यासागर यांचा पोषाख साधा असे. एक पंचा व अंगावर एक उपरणे म्हणजे झाले.

योग्य माणसास ईश्वरचंद्र नेहमी समाजात पुढे आणावयाचे. नाही तर समाजात ज्यांच्यात मोठी कर्तबगारी नाही, असे लोकही मोठ्या जागेवर आढळतात. कालीप्रसादसिंह हे एक श्रीमंत गृहस्थ होते. महाभारताचे सुंदर बंगाली भाषांतर यांनी करविले. हिंदू पेट्रियट हे वृत्तपत्र यांच्याच मालकीचे होते. याची व्यवस्था ठेवण्यास, कोण संपादक नेमावे वगैरे काम ते विद्यासागर यांस सांगत. हरिश्चंद्र मुकर्जी हे प्रथम या वृत्तपत्राचे संपादक होते. हे फार तरतरीत व हुशार होते. कर्तबगार असून लवकरच हे लोकांच्या शिरी शोभतील असे वाटत होते. परंतु दैववशात् ते लवकरच आपले कार्य सोडून देवाच्या घरी गेले. आता दुसरा संपादक कोण नेमावयाचा? विद्यासागर यांनी कृष्णदास पाल यांस ती जागा दिली. कृष्णदास हे मोठे मनुष्य होते. त्यांनी आपली जबाबदारी नीट पार पाडली.

एकदा कर्जमुक्त व्हावे म्हणून विद्यासागर यांनी आपल्या छापखान्यातील एक तृतियांश भाग विकला. त्यांच्याजवळ दोन छापखाने होते. एक स्वतःच्या मालकीचे संस्कृत यंत्र (प्रेस) नी दुसरे त्यांच्याकडे गहाण पडलेले यंत्र. स्वतःच्या छापखान्यातील एक तृतियांश भाग त्यांनी विकला. पुढे त्यांना असे दिसून आले की, हा जो गहाण छापखाना आहे, त्याची नीट व्यवस्था नाही. त्यांस स्वतः आता देखरेख करता येत नव्हती, यामुळे हे छापखाना पण विकून टाकावा असा विद्यासागर विचार करीत होते. वजेंद्रनाथ मुकर्जी म्हणून एक तरुण गृहस्थ होते. ते विद्यासागरांकडे आले आणि म्हणाले, ‘माझ्या ताब्यात जर हा ‘प्रेस’ छापखाना दिलात, तर जेणेकरून आपणास संतोष व समाधान होईल अशा प्रकारची व्यवस्था मी राखण्याची शक्य ती खटपट करीन.’ विद्यासागरांनी मोठ्या आनंदाने ही गोष्ट मान्य केली. आता तो छापखाना वजेंद्रनाथाच्या देखरेखीखाली आला. परंतु ईश्वरचंद्रांनी मनाने तो त्यांसच कायमचा देऊन टाकला. व्रजेंद्रनाथ मुकर्जी खर्चवेच जाता उरलेले पैस विद्यासागरांकडे घेऊन आले. विद्यासागर म्हणाले, “नको; मला त्यातील पैही नको; मी तो छापखाना तुला दिला आहे. त्याची जरी रु. २०,०००/- किंमत असली, तरी सुद्धा मी पै घेणार नाही. सर्व छापखाना मी तुला दिला आहे.” विद्यासागरांच्या उदारपणाला सीमाच नव्हती.

ईश्वरचंद्र विद्यासागर

पांडुरंग सदाशिव साने
Chapters
ईश्वरचंद्र विद्यासागर 1 ईश्वरचंद्र विद्यासागर 2 ईश्वरचंद्र विद्यासागर 3 ईश्वरचंद्र विद्यासागर 4 ईश्वरचंद्र विद्यासागर 5 ईश्वरचंद्र विद्यासागर 6 ईश्वरचंद्र विद्यासागर 7 ईश्वरचंद्र विद्यासागर 8 ईश्वरचंद्र विद्यासागर 9 ईश्वरचंद्र विद्यासागर 10 ईश्वरचंद्र विद्यासागर 11 ईश्वरचंद्र विद्यासागर 12 ईश्वरचंद्र विद्यासागर 13 ईश्वरचंद्र विद्यासागर 14 ईश्वरचंद्र विद्यासागर 15 ईश्वरचंद्र विद्यासागर 16 ईश्वरचंद्र विद्यासागर 17 ईश्वरचंद्र विद्यासागर 18 ईश्वरचंद्र विद्यासागर 19 ईश्वरचंद्र विद्यासागर 20 ईश्वरचंद्र विद्यासागर 21 ईश्वरचंद्र विद्यासागर 22 ईश्वरचंद्र विद्यासागर 23 ईश्वरचंद्र विद्यासागर 24 ईश्वरचंद्र विद्यासागर 25 ईश्वरचंद्र विद्यासागर 26 ईश्वरचंद्र विद्यासागर 27 ईश्वरचंद्र विद्यासागर 28 ईश्वरचंद्र विद्यासागर 29 ईश्वरचंद्र विद्यासागर 30 ईश्वरचंद्र विद्यासागर 31 ईश्वरचंद्र विद्यासागर 32 ईश्वरचंद्र विद्यासागर 33 ईश्वरचंद्र विद्यासागर 34 ईश्वरचंद्र विद्यासागर 35 ईश्वरचंद्र विद्यासागर 36 ईश्वरचंद्र विद्यासागर 37 ईश्वरचंद्र विद्यासागर 38 ईश्वरचंद्र विद्यासागर 39 ईश्वरचंद्र विद्यासागर 40 ईश्वरचंद्र विद्यासागर 41 ईश्वरचंद्र विद्यासागर 42 ईश्वरचंद्र विद्यासागर 43 ईश्वरचंद्र विद्यासागर 44 ईश्वरचंद्र विद्यासागर 45 ईश्वरचंद्र विद्यासागर 46 ईश्वरचंद्र विद्यासागर 47 ईश्वरचंद्र विद्यासागर 48 ईश्वरचंद्र विद्यासागर 49 ईश्वरचंद्र विद्यासागर 50 ईश्वरचंद्र विद्यासागर 51 ईश्वरचंद्र विद्यासागर 52 ईश्वरचंद्र विद्यासागर 53 ईश्वरचंद्र विद्यासागर 54 ईश्वरचंद्र विद्यासागर 55 ईश्वरचंद्र विद्यासागर 56 ईश्वरचंद्र विद्यासागर 57 ईश्वरचंद्र विद्यासागर 58 ईश्वरचंद्र विद्यासागर 59 ईश्वरचंद्र विद्यासागर 60 ईश्वरचंद्र विद्यासागर 61 ईश्वरचंद्र विद्यासागर 62 ईश्वरचंद्र विद्यासागर 63 ईश्वरचंद्र विद्यासागर 64 ईश्वरचंद्र विद्यासागर 65 ईश्वरचंद्र विद्यासागर 66 ईश्वरचंद्र विद्यासागर 67 ईश्वरचंद्र विद्यासागर 68 ईश्वरचंद्र विद्यासागर 69 ईश्वरचंद्र विद्यासागर 70