ईश्वरचंद्र विद्यासागर 16
या ईश्वरचंद्रांच्या पत्रास गव्हर्नरांनी एक अगदी छोटे उत्तर पाठविले.
प्रिय पंडित महाशय,
तुमचा विचार ऐकून खरोखरच फार मनापासून वाईट वाटले. गुरुवारी येऊन मला भेटा; आणि हा विचार करण्याची कारणे खुलासेवार मला सांगा.
आपला,
एफ्. जे. हॅल्डे
या मुलाखतीचा परिणाम एवढाच झाला की, राजीनामा पाठविण्याचे जरा कालगतीवर पडले. परंतु गॉर्डन यंग व विद्यासागर यांचे संबंध जास्त विरोधाचे होऊ लागले. एकंदर प्रकरण चिघळत चालले. सामोपचाराने या गोष्टी सुधारता येणे शक्य नाही असे आता स्पष्ट दिसत होते. गव्हर्नरांच्या जरा भिडेखातर म्हणून विद्यासागर त्या जागेवर राहिले. जो जो यंगसाहेबाने त्यांस अशिष्टाचाराने वागवावे तो तो राजीनामा देण्याचा त्यांचा निश्चय बळावे. हॅल्डे हे त्यांचे मित्र, तेव्हा त्यांचेही मन मोडवेना, अशी विद्यासागरांस मोठी पंचाईत पडली होती. शेवटी विद्यासागर यांस यंगसाहेबांच्या अरेरावी संबंधांत राहणे अशक्य झाले. गव्हर्नर यांनी परोपरीने सांगून पाहिले. परंतु विद्यासागर यांचा निश्चय बदलला नाही. ‘आता नोकरी सोडणे हेच माझे कर्तव्य आहे; माझा स्वाभिमान मला राहू देत नाही. लोकसेवा पण मला करता येत नाही. तरी मी मोठा दिलगीर आहे.’ असे विद्यासागर यांनी गव्हर्नरांस कळविले. पैशाची भीती दाखवून गव्हर्नरांनी त्यांस परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. ‘तुम्ही किती तरी सामाजिक कार्ये अंगावर घेतली आहेत; अशा वेळी ५०० रुपयांच्या पगाराची जागा सोडून तुम्ही जाऊ नये; कारण तुम्हांस फार अडचणी येतील,’ असे गव्हर्नराने सांगितले. परंतु स्वाभिमान व सद्सद् विवेकबुद्धी यांच्यापेक्षा पैसा विद्यासागरांस प्रिय नव्हता. आणि पैशाची अडचण दाखवून, मला गव्हर्नर ठेवू पाहतात, परावृत्त करू पाहतात, याचे त्यांस वाईट वाटले आणि ही अडचण असली तरीसुद्धा नोकरी सोडून देण्याचा विचार जास्तच बळावला. जे आपण करणार त्याने आपल्या कुटुंबांतील मंडळींचे व आपले स्वतःचे काय होईल याचा या दरिद्री ब्राह्मणाने यत्किंचितही विचार केला नाही; केला असला तरी त्यास प्रबळ होऊ दिला नाही. खर्या विप्राला शोभेसे त्यांनी वर्तन केले. खर्या पुरुषाला साजेसे वर्तन त्यांनी केले. द्रव्य माझ्यासाठी, मनुष्यासाठी आहे; मनुष्य द्रव्यासाठी नाही, हे त्यांनी गव्हर्नरास, आपल्या देशबांधवांस दाखवून दिले. त्यांनी यंग यांस एक लांबलचक पत्र लिहिले; व आपण एकंदर या नोकरीमुळे फार त्रासलो आहोत आणि प्रकृती पण नादुरुस्त सबब आपण राजीनामा देतो असे त्यांनी त्यात लिहिले. यंग व गव्हर्नर यांची आपापसात पुष्कळ बोलणी झाली. गव्हर्नर यांच्या सांगितल्यावरून यंग यांनी तडजोड होते का असे दाखविण्याचा वरपांगी प्रयत्न केला. परंतु यंगचे कसे अंतरंग आहे हे विद्यासागर यांस कळून चुकले होते. कोळसा उगाळावा तेवढा काळाच, हे त्यांस माहीत होतेच. विषाची आणखी परीक्षा कशास पाहिजे असा मनात विचार करून ते अढळ राहिले. गव्हर्नरचे जेव्हा जास्त सलगीचे पत्र आले, तेव्हा मग जे उत्तर ईश्वरचंद्रांनी पाठविले, त्यांत त्यांनी सर्व साद्यंत हकीगत निवेदन केली. आपणांस कशा परिस्थितीत काम करावे लागले, आपला कसा उपमर्द होत असे, यंग आपणांवर कशी कुरघोडी करू पाहतो, हे सर्व त्यांनी मोठ्या हृदयविदारक तर्हेने लिहिले. परिस्थिती अशी असल्यामुळे एक मी तरी जाणे इष्ट आहे, किंवा यंग तरी दूर होणे जरूर आहे; परंतु मीच राजीनामा देतो; कारण माझी प्रकृती पण ठीक नाही; असे सांगून गव्हर्नरांची समज घालण्याचा ईश्वरचंद्रांनी प्रयत्न केला. ईश्वरचंद्र राजीनामा मागे घेत नाही असे पाहून शेवटी गव्हर्नर यांनी राजीनामा स्वीकारल्याचे पत्र डायरेक्टर यंग यास पाठविले. त्या पत्रात गव्हर्नर म्हणतात, ‘ईश्वरचंद्र विद्यासागर यांचा राजीनामा आम्ही स्वीकारतो. विद्यासागर यांनी अशा तर्हेने विशेष असंतोषास कारण नसता सोडून जाणे हे खेदजनक आहे. परंतु आपण विद्यासागर यांस कळवावे की, त्यांनी केलेल्या शिक्षणाविषयक कामगिरीबद्दल सरकार कृतज्ञ आहे; सरकारास या गोष्टीची पूर्ण जाणीव आहे.’ ६ ऑक्टोबर रोजी गव्हर्नरांनी लिहिल्याबद्दलचे त्यांस कळविण्यात आले. परंतु स्त्रीशिक्षणाच्या बाबतीत विद्यासागर यांनी जो खर्च केला, त्याबद्दलचे सरकारी बिल मंजूर होईपर्यंत शेवटला रामराम ठोकावयाचा नाही असे विद्यासागर यांच्या मनात होते. परंतु यंग यांस दम निघेना. तुमचे खर्चाचे बिल पास होईल याबद्दल निश्चिंत असा, असे पोकळ वचन ईश्वरचंद्र यांस देण्यात आले. शेवटी यंगच्या शब्दावर विश्वास ठेवून ईश्वरचंद्र या नोकरीच्या जाचातून मुक्त झाले.