ईश्वरचंद्र विद्यासागर 13
ईश्वरचंद्र यांस जादा रुपये २०० पगारावर काही जिल्ह्यांतील शाळांची देखरेख व तपासणी करण्याचा अधिकार १८५५ मध्ये देण्यात आला. कलकत्त्यात एक शिक्षकांस शिक्षण देणारे विद्यालय स्थापन झाले. या विद्यालयाचे पहिले मुख्य शिक्षक अक्षयदत्त हे होते. अक्षयदत्त हे त्या वेळेचे नामांकित गद्यलेखक होते. त्यांनी अनेक विषयांवर उपयुक्त निबंध लिहिले आहेत. वाङमय, काव्य, इतिहासशास्त्र कशातही त्यांची बुद्धी अप्रतिहत चाले. ही चळवळ चालू असता विद्यासागरांचे अत्यंत मोठे स्नेही ‘बेथूनसाहेब’ हे मरण पावले. विद्यासागर यांस परमावधीचे दुःख झाले. परंतु दुःखातच चूर होणारे ते नव्हते. पुनः काही काळाने ते रीतसर कार्यात मग्न होऊन राहिले.
या वेळेस डॉ. मोयेट हे मोठ्या रजेवर इंग्लंडात गेले. त्या वेळेस बंगालचे जे सूत्राधिकारी होते, त्यांचे नाव हॅल्डे असे होते. हॅल्डे यांनी शिक्षणाच्या बाबतीत काही फार मोठे फरक केले. डायरेक्टर ऑफ पब्लिक इन्स्ट्रक्शन ही एक नवीनच जागा त्यांनी निर्माण केली. या जागेवर यंग नावाचा एक अगदी अननुभवी तरुण मनुष्य हॅल्डे यांनी नेमला. विद्यासागर यांस ही गोष्ट रुचली नाही. ते लेफ्टनंट गव्हर्नर यांस म्हणाले, “या जागेवर कोणी तरी अनुभवी शिक्षणाग्रणी नेमावा. कारण ही जागा फार जबाबदारीची आहे.” लेफ्टनंट गव्हर्नर म्हणाले, “यंग हे काही सर्वसत्ताधीश नाहीत. प्रत्यक्ष मी त्यांच्या कामावर देखरेख ठेवणार आहे. आणि तुम्ही पण सर्व सूचनांनी, सल्ला वगैरे देऊन त्यांस मदत करावी.”
१८५४ मध्ये एतद्देशीयांच्या शिक्षणासाठी म्हणून विलायतेत असणार्या डायरेक्टरांनी काही लाख रुपये मंजूर केले. या पैशांचा विनियोग करण्याचे काम त्या वर्षी विद्यासागर यांस देण्यात आले होते. विद्यासागर यांनी अनेक जिल्ह्यांत काही शाळा स्थापन केल्या. परंतु १८५५ मध्ये अननुभवी व तरुण यंग हे अधिकारी झाले होते. त्यांनी विद्यासागर यांच्या धोरणास हरकत घेतली. यंग यांस दुसर्या दोन दुय्यम युरोपियन इन्स्पेक्टरांचे सहाय्य व सल्ला हे होतेच. १८५४ मध्ये जो ठराव झाला व ज्या ठरावाच्या अंमलबजावणीसाठी हे पैसे विद्यासागरांच्या स्वाधीन करण्यात आले, त्या ठरावाच्या मतितार्थाबद्दलच या दोघांमध्ये भांडण सुरू झाले. विद्यासागर यांस स्वतःचे करणे योग्य वाटले व यंग याचा हुकूम न जुमानता त्यांनी जास्त प्राथमिक शाळा उघडण्याचा सपाटा चालू केला. यंग रागावले व त्यांनी सर्व प्रकरण लेफ्टनंट गव्हर्नरांकडे नेले. ‘इंग्लंडमधील डायरेक्टरांच्या मनात काय अर्थ होता हे मी विलायतेहून मागवून घेतो, तोपर्यंत तुम्ही आपले धोरण बंद ठेवा.’ असे गव्हर्नर यांनी विद्यासागर यांस दोघांचे म्हणणे ऐकून घेतल्यावर सांगितले. शेवटी युरोपामधून उत्तर आले व विद्यासागर यांनी ठरावाचा जो अर्थ केला तोच योग्य असे डायरेक्टर यांनी मत दिले. अधिकारलोलुप व सत्तामत्त यंगसाहेब यामुळे हतदर्प झाले; परंतु या प्रकरणामुळे त्यांनी विद्यासागर यांच्यावर दात ठेवला. ज्या ज्या वेळेस विद्यासागरांचे वाकडे करण्याची वेळ आली, ती त्यांनी वाया दवडली नाही. हा द्वेष व मत्सर यंग यांनी मनात नेहमी जागृत व प्रज्वलित ठेविला. खुनशीपणा त्यांनी पोटात बाळगला.
विद्यासागर यांनी आता मुलींच्या शाळा स्थापन करण्यास सुरुवात केली. लेफ्टनंट गव्हर्नर यांनी तोंडी परवानगी विद्यासागरांस दिली होती. परंतु आता इंग्लंडमधील प्रधानमंडळात फरक झाला. यामुळे हिंदुस्थानातील शिक्षणाचे धोरणही बदलणे प्राप्त झाले. विद्यासागर यांनी ज्या कन्याशाळा ठिकठिकाणी स्थापिल्या होत्या, त्या शाळांच्या खर्चास लागणार्या पैशास यंग यांनी आता मंजुरी देण्याचे नाकारले. विद्यासागर यांस अडचणीत आणून त्यांचा उपमर्द व अपमान करण्यास ही योग्य संधी सापडली, असे जाणून ते मनात भेसूर व सैतानी संतोष मानिते झाले. विद्यासागर यांस स्वतःच्या पदरच्या पैशाने सर्व खर्च भागवावा लागला.