ईश्वरचंद्र विद्यासागर 45
चोरांनी सर्व मिळेल ते लांबविले. परंतु सर्व मंडळींचे प्राण तर वाचले. ‘शीर सलामत तर पगडी पचास’ अशी म्हण आहे. पुढे विद्यासागर कलकत्त्यास आले. तेथे गव्हर्नरसाहेबांनी विद्यासागरांस म्हटले, “काय शेवटी भागुबाईप्रमाणे पळूनच गेलात ना? भित्रे तुम्ही. तुमच्या बाता ऐकाव्या मात्र.” विद्यासागर म्हणाले, “जगात मनुष्यास संतुष्ट करणे फार कठीण आहे. समजा, मी चोरांजवळ लढाई केली असती व त्यांत जिवानिशी मारला जातो तर ‘काय अविचारी; एवढ्या चोरांजवळ का हुज्जत घालावयाची व झुंज खेळायची’ असे तुम्ही म्हटले असते; आणि आता निघून आलो तर कसे पळून आले म्हणून म्हणावयास तयार. एकंदरीत लोक हे दुराराध्य आहेत.” गव्हर्नर हसले. विद्यासागरांमध्ये हा विनोदाचा गुण लहानपणापासून होता. एकदा त्यांचे एक शिक्षक जयगोपाळ तर्कालंकार यांनी मुलांस समस्यापूरणार्थ काही श्लोकचरण दिले. त्यातील एक चरण असा होता, ‘गोपालाय नमोस्तुते.’ विद्यासागर म्हणाले, ‘गुरुजी, हा गोपाल कोणता? तो तीनचार हजार वर्षांपूर्वी होऊन गेलेला जुनापुराणा तो की आमच्या समोर उभे आहेत ते?” गुरुजींस कौतुक वाटले व विद्यार्थ्यांमध्ये हशा पिकला.
एकदा रामकृष्ण बॅनर्जी (ज्यांस संस्कृत शिकता यावे म्हणून उपक्रमणिका विद्यासागरांनी लिहिली होती) यांच्याकडे प्रख्यात न्यायाधीश द्वारकानाथ मित्र, कृष्णदास पाल, विद्यासागर हे सर्व जमले होते. यांच्या गप्पागोष्टी चालल्या होत्या, त्या वेळेस खिडकीतून एक खेडवळ मनुष्य सारखा डोकावून पाहत होता. विद्यासागरांनी त्यास आत बोलावून घेतले. “काय रे, सारखे खिडकीतून काय डोकावतो आहेस?” असे विद्यासागरांनी त्यास विचारले.
तो घाबरला व उत्तर देईना. “सांग ना, घाबरावयास काय झाले?” असे विद्यासागरांनी म्हणताच तो खेडवळ म्हणाला, “द्वारकानाथ मित्र न्यायाधीश मला पाहावयाचे होते. येथे आले आहेत असे ऐकले म्हणून येथे आलो.”
विद्यासागर म्हणाले, “हे जे सुंदर गृहस्थ आहेत त्यांचे नाव कृष्णदास पाल व पलीकडे जे यांच्यापेक्षा सुंदर गृहस्थ आहेत ते द्वारकादास मित्र. आता ओळख बरे कोणते ते?” गंमत अशी होती की, कृष्णदास पाल हे अगदी कुरूप होते; त्यांच्यापेक्षाही द्वारकानाथ हे कुरूप होते. विद्यासागरांनी केलेल्या थट्टेमुळे तो खेडवळ चपापला व हे सर्व खो खो करून हसू लागले.
या कलकत्त्यातील बड्या लोकांनी एक खाना क्लब (अल्पाहार मंडळ) काढले होते. एकदा या खाबू मंडळाची खाण्याच्या कार्यासाठी सभा भरली होती. विद्यासागर या सभांस हजर राहत; परंतु त्या सभेत प्रत्यक्ष कार्यात हात न घालता ते स्वस्थ गंमत करीत व गप्पा मारीत. आज जी सभा भरली होती त्या सभेत खाण्याची अगदी चंगळ होती. एक खाबूनंदन इतके पोटात कोंबता झाला की, तो शेवटी अस्वस्थ झाला. त्याच्या पोटात कळा उठल्याने तो गडबडा लोळू लागला. झाले. डॉक्टरांस निमंत्रणे गेली. नळ्या लावल्या, ठाकठोक झाले. वांतीचे औषध देण्यात आले व स्वारी नीट शुद्धीवर आली. नंतर सभेचा जीव जेव्हा खाली पडला, तेव्हा सभेत एका गृहस्थाने असा ठराव मांडला की, ‘सदरहू इसम यास खाबूमंडळाचा सभासद करून घेऊ नये. त्याचे नाव कमी करावे. या मंडळाची जबाबदारी त्यास नीट पार पाडता येत नाही. तो कार्य व्यवस्थित करीत नाही.’ या ठरावास विद्यासागर यांनी जोराचा विरोध केला. ते म्हणाले, “हा अकृतज्ञपणा आहे. जो सभासद मंडळासाठी प्राण देण्यास तयार झाला, प्राण गेले तरी बेहत्तर परंतु या मंडळाचे काम कसोशीने करीन, असे ज्याने प्रत्यक्ष कृतीने दाखविले, त्याचे तुम्ही नाव कमी करता, याहून अनुदारपणाचे दुसरे कोणते कृत्य असू शकेल? या सद्गृहस्थाचे नाव कमी तर करू नयेच; उलट त्याच्या गुणगौरवपर ठराव आपण सर्वांनी एकमताने उभे राहून मंजूर करू या.” या एकंदर भाषणाने फारच गंमत झाली.