ईश्वरचंद्र विद्यासागर 57
मायकेल बॅरिस्टर होऊन इंग्लडातून आता परत येणार होते. त्यांस उतरण्यास चांगली जागा पाहिजे म्हणून विद्यासागर यांनी व्यवस्था करून ठेविली होती. एक मोठा बंगला भाड्याने घेऊन तेथे सर्व इंग्रजी थाटमाट, टेबले, खुर्च्या सर्व काही विद्यासागर यांनी आणून ठेविले; परंतु काय? मायकेल हे विद्यासागरांनी ठरविलेल्या बंगल्यात न उतरता दुसरीकडेच कोठे जाऊन उतरले. विद्यासागर यांनी एवढा पैसा खर्च केला व श्रम घेतले, व्यवस्था केली, ती सर्व वाया गेली. मायकेल आता बॅरिस्टर होऊन आले तरी त्यांच्यांने बॅरिस्टरी थोडीच चालणार होती! ते पडले वृत्तीने कवी. इंग्रजी भाषेत काव्य करून मिल्टन व्हावे अशी मायकेलची महत्त्वाकांक्षा. बंगालीत लिहिलेल्या कविता ते फाडून टाकीत व म्हणत ‘बंगाली कोणी लिहावे?’ शेवटी बेथून यांनी मायकेल यांस सांगितले, ‘मित्रा, परकी भाषा कितीही करतलामलवत् झाली तरी त्यात महाकाव्य लिहिणे हे फार अशक्य आहे. या भानगडीत तू पडू नये. आपल्या मायभाषेत तू आपले विचार, आपले मन खुले करू शकशील.’ बेथून यांनी मायकेल यांस मार्गावर आणले. मायकेल बंगाली भाषेमधील एक उत्कृष्ट कवी आहेत. त्यांनी सुंदर नाटके लिहिली आहेत. वाङ्मयात त्यांचे तेज तळपू लागले, परंतु त्यांचे विकार बळावत चालले. वासनांचा पूर मायकेल यांस अडवता येत नसे. ते वासनांस बळी पडत. मद्यपानाचा सुमार त्यांस राहत नसे. ऐषआरामात, व्यसनात सर्व पैसे संपू लागले. वडिलांनी पूर्वी पैसे दिले नव्हते तरी मरायच्या वेळी सर्व इस्टेट पुत्रासच ठेवून दिली होती. कुबेरासारखी संपत्ती, परंतु सर्व गहाण पडली. विद्यासागरांचेच जवळजवळ रुपये ८,००० कर्ज त्यांस झाले होते. विद्यासागरांनी दुसऱ्याचे पैसे घेऊन मायकेलास दिलेले. शेवटी त्या सावकारांनी जेव्हा विद्यासागरांस तगादा लाविला, तेव्हा विद्यासागर यांनी मायकेलास आपले पैसे द्यावयास सांगितले. परंतु ते काही एक जमले नाही. मायकेलांची मालमत्ता पुढे गहाण पडली. सावकारांचे तगादे येऊ लागले. सावकारांच्या शब्दांचा मनावर काही परिणाम होऊ नये म्हणून मायकेल सुरापानात वाहू लागले. दुरून सावकार पाहिला की मायकेल बाटली तोंडास लावीत व तर्र होऊन पडत.
अशा प्रकारे मायकेलांची स्थिती फार दुःखद झाली. कर्ज चारी बाजूंनी फोफावले. सागर फुटल्यावर सिकतासेतूचे त्यापुढे काय चालणार? शेवटी काय झाले, ते आजारी पडले व एका दवाखान्यात जाऊन राहिले. तेथे अनाथापरी त्यांस मरण आले. असा या थोर पुरुषाचा दुःखद अंत झाला. मायकेलांचे मन फार मोठे होते; बुद्धी थोर होती; कल्पना लोकोत्तर होती; हृदय उदार व कोमल होते; परंतु एका दुर्व्यसनानेही मनुष्याचा कसा अधःपात होतो हे आपणास त्यांच्या चरित्रावरून दिसून येते. पंचपक्वान्नांत एक विषबिंदू पडला, दुधामध्ये एक मिठाचा खडा पडला तरी सर्वनाश होतो, तसेच येथे झाले.
मायकेल मेल्यावर सावकार कर्जासाठी विद्यासागर यांच्याकडे येत. विद्यासागर त्यांस म्हणत, “आता मी एक पैही मायकेलांसाठी खर्च करणार नाही. मायकेल जिवंत होता त्या वेळेस जर मला त्यास मुक्त करता आले नाही, तर आता मेलेल्या मायकेलला मुक्त करून मला काय समाधान मिळणार? तो जिवंत असता त्याला सावकारांच्या ससेमि-यामधून मला सोडविता आले नाही, आता तो गेल्यावर अन्य काही करून काय उपयोग?’ असे विद्यासागरांचे हृदय विशाल व कृपाळू होते.
एकदा विद्यासागर एका खेडेगावात गेले होते. तेथे एका गृहस्थाच्या घरी त्यांनी एक मुलगा पाहिला. त्या मुलाच्या पायास एक प्रकारचा विशिष्ट रोग जडला होता. तो रोग अशा प्रकारचा होता की, त्याने असे व्हावयाचे की, पाय आखडत आखडत जावयाचा. विद्यासागर त्या गृहस्थास म्हणाले, “आपण आपल्या मुलास डॉक्टरकडे का नेत नाही?”