ईश्वरचंद्र विद्यासागर 58
“या गावात डॉक्टर आहेत कोठे? आणि दुस-या मोठ्या शहरात न्यावयाचे, तर फार लांब; तेथे ओळख ना देख; शिवाय तेथे राहावयाचे व डॉक्टरची फी वगैरे फार खर्च येईल.” असे त्या मुलाचा बाप म्हणाला.
विद्यासागर म्हणाले, “समजा, दुस-या कोणी तुमच्या मुलास बरे करण्यासाठी पैसे दिले, जाण्यायेण्याचा खर्च दिला, कलकत्त्यात सर्व सोय केली तर आपण आपला मुलगा तेथे घेऊन जाल का?”
“आपण थट्टा तर करीत नाही? असा पुरुष या कलियुगात दृष्टीस पडता तर काय न होते.” बाप बोलला.
“पण समजा, असा एक गृहस्थ आहे. तर तुम्ही मुलगा पाठवाल का?”
“हो, न पाठवावयास काय झाले? खुशाल मुलास घेऊन येईन. परंतु सर्व प्रकरण मज गरिबाच्या गळ्यांत न येवो म्हणजे झाले.”
“त्याविषयी तुम्ही निश्चिंत असा” असे म्हणून विद्यासागरांनी आपल्या स्वतःच्या घरचा कलकत्त्यातील पत्ता त्या गृहस्थास दिला व सांगितले, “या ठिकाणी जा म्हणजे आपले कार्य होईल.” विद्यासागर निघून गेले. हा गृहस्थ जावे की न जावे याविषयी जरा साशंक होता. त्या गावातील एका गृहस्थास विद्यासागर यांचा कलकत्त्यातील पत्ता माहीत होता. त्या माणसाकडे हा वरील गृहस्थ गेला व म्हणाला, “काय हो, कलकत्त्यात वरील पत्त्यावर कोण गृहस्थ राहतात, तुम्हांस माहीत आहे का?” त्या मनुष्याने तो पत्ता पाहून म्हटले, “अहो, हा पत्ता तर विद्यासागर यांच्या घराचा, खुशाल जा. तेथे तुम्हांस घरातल्याप्रमाणे वागविण्यात येईल.” तो गृहस्थ विद्यासागरांकडे मुलास घेऊन आला. त्या मुलाचा पाय नीट औषधोपचारांनी बरा झाला. ईश्वरचंद्रांनी त्याचा सर्व खर्च केला.
ईश्वरचंद्रांच्या अशा कितीतरी गोष्टी सांगाव्या! परंतु आणखी दोन-तीन गोष्टींचा उल्लेख करून हे परोपकार कथन पुरे करू.
एकदा एक गरीब मुलगा रस्त्यात विद्यासागर यांच्याजवळ आला. “महाराज, मला दोन पैसे द्या; मी उपाशी आहे.” असे तो केविलवाणे तोंड करून म्हणाला.
“बाळ, तुला दोन पैशांऐवजी ४ पैसे दिले, तर तू काय करशील?”
या प्रश्नास मुलाने उत्तर दिले, “दोन पैसे आज खाईन, आणि दोन पैसे उद्यासाठी ठेवीन.”
“बरे तुला दोन आणे दिले तर तू काय करशील?”
“आज दोन आण्यांची भाजी विकत घेईन व तिचे चार आणे करीन; एका आठवड्यात रुपया सुद्धा करीन.”
मुलाचे हे उत्तर ऐकून विद्यासागर प्रसन्न झाले व त्या मुलास म्हणाले, “हे पाहा, मी तुला आज दोन आणे देतो; त्याचा रुपया करून मला एक आठवड्याने दाखव.”
‘बरे’ असे मुलगा म्हणाला. ते दोन आणे घेऊन मुलगा गेला व खरोखर १। रुपया मिळवून आठवे दिवशी विद्यासागरांच्या घरी आला.