ईश्वरचंद्र विद्यासागर 56
‘ज्या या कष्टद स्थितीत मी येऊन पडलो आहे, त्यातून सोडविणारा तुमच्याशिवाय अन्य मित्र मला दिसत नाही. तुमचा अनंत उत्साह व तुमचे धीरोदात्त अंतःकरण यांस जागे करा व माझ्या बाबतीत आवश्यक ते ताबडतोब करा. एक दिवसही गमावू नका. एक क्षण गमावणे म्हणजे माझे मरण आहे.
‘तुम्हास जी तसदी देणार आहे, त्याबद्दल मी क्षमा मागू का? परंतु असे करावेसे मला वाटत नाही. तुमच्या स्वभावाची मला नीट ओळख आहे. परकीय देशात तुमचा मित्र व देशबंधू अनाथापरी संकटात खितपत पडलेला तुमच्या हृदयास कसा सहन होईल?
‘मी फ्रान्स सोडून तर कोठे जाणे सध्या शक्य नाही; म्हणून मला वरील पत्त्यावरच पत्र लिहा. देव वर आहे; तर मला सहाय्य करा.’
अशा अर्थाचे पत्र विद्यासागरांच्या हातात पडले. विद्यासागर फार विव्हळले. परक्या देशात पोराबाळांनिशी हा मातब्बर घराण्यातील तरुण अशा परिस्थितीत सापडावा, या विचाराने त्यांस चैन पडेना. त्यांनी एक क्षणही फुकट दवडला नाही. ताबडतोब पत्र व रुपये १,५०० विद्यासागर यांनी मायकेल यांस त्यांच्या फ्रान्समधील पत्त्त्यावर पाठविले. मेघाची चातकाने वाट पाहावी, सूर्याची चक्रवाकाने, चंद्राची चकोराने, हरवलेल्या मातेची बालकाने, परमेश्वराची भक्ताने, त्याप्रमाणे येणा-या टपालाकडे दत्तांची दृष्टी लागून राहिली होती. शेवटी आगबोट आली; टपाल आले. पैसे व पत्र सर्व मिळाले. काळोखात रविकिरण मिळाला; तृषार्तास सुधासिंधू लाभला, क्षुधार्तास अन्न मिळाले. मायकेल दत्तांचा आनंद गगनात मावेना. त्यांचे हृदय आनंदाने भरून आले व त्यांनी खालील अर्थाचे सुंदर पत्र विद्यासागर यांस लिहिले.
‘गेल्या रविवारी २८ ऑगस्ट (१८६४) रोजी सकाळी मी माझ्या लहान्या अभ्यासाच्या खोलीत बसलो होतो. माझी पत्नी रडवेले तोंड करून मजकडे आली व डोळ्यांत आसवे आणून म्हणाली, ‘मुलांना जत्रेस जाण्याची इच्छा आहे. परंतु मजजवळ फक्त ३ फ्रँक आहेत. तुमचे हिंदुस्थानांतील लोक इतके कठोर व निष्ठूर कसे?’ मी तिला म्हटले, ‘आज टपाल येईल, आणि ज्या माणसास मी पत्र लिहिले आहे, तो प्राचीन ऋषीसारखा ज्ञानाचा व धैर्याचा, सद्गुणांचा सागर आहे; इंग्लिश माणसाप्रमाणे उत्साहमूर्ती आहे. बंगाली मातेचे त्याचे हृदय आहे. तो खात्रीने उत्तर देईल व ते आज आपणास मिळेल.’ माझे म्हणणे खरे ठरले. एकाच तासाने तुमचे पत्र व पैसे मला मिळाले. हे थोर पुरुषा, हे यशस्विता, हे उदार मित्रा, मी शब्दांनी कसे तुमचे आभार मानू? तुम्ही मला आज तारले आहे.’
अशा प्रकारे विद्यासागर यांनी एका शब्दाने रुपये १,५०० पाठवून दिले. पुढे आणखीही जवळ जवळ तितकीच रक्कम विद्यासागर यांनी पाठविली. एकंदर रुपये ३,००० विद्यासागर यांनी मायकेल यांस दिले.