ईश्वरचंद्र विद्यासागर 1
पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर
बंगालमध्ये ईश्वरचंद्र यांचे नाव लहान मुलांच्या सुद्धा परिचयाचे आहे. आपल्या मुलांसमोर आई-बाप ईश्वरचंद्रांचा आदर्श ठेवतात. जुन्या बाळबोध घराण्यांत, राजनिष्ठ कुटुंबांत, राष्ट्रीय वृत्ती बाळगणार्या गृहस्थांच्या घरांत, सर्वत्र ईश्वरचंद्रांचा कित्ता ठेवलेला असतो. मनुष्याचे चरित्र ईश्वरचंद्रांप्रमाणे असावे, त्यांचा जीवनक्रम डोळ्यांसमोर ठेवून मुलांनी पावले टाकावी व जगाच्या भ्रमभोवर्यात शिरावे आणि उत्तम नावलौकिक संपादावा, अशी आई-बापांची बंगाली बाळांस बालपणापासून शिकवण असते. विद्यासागरांचे नाव तेथे फार घरोब्याचे आहे. आपल्याकडे ‘ज्ञानोबा-तुकाराम’ ज्याप्रमाणे प्रत्येक लहानथोरांस माहीत आहेत, त्याप्रमाणेच बंगालमध्ये ईश्वरचंद्रांसबंधी आहे.
ईश्वरचंद्र म्हणजे अत्यंत आज्ञाधारक, आई-बापास देवाप्रमाणे मानणारा एक सत्पुरुष, अत्यंत उद्योगी, विपन्नावस्थेतून, कष्टदशेतून, स्वपराक्रमाने यशोवैभव संपन्न होणारा, अशा स्वरूपांत त्यांची पुष्कळांस ओळख असते. ईश्वरचंद्र म्हणजे दयेचा सागर हीपण जाणीव सर्वांस असते. परंतु या गुणसमुच्चयाबरोबर ईश्वरचंद्र हे सिंहासारखे शूर, अनंत संकटांशी टकरा देणारे वीर, सतत चिकाटीने ध्येयार्थ सज्ज असणारे नरसिंह, सुखास न लालचावलेले, स्वाभिमानसूर्य सदैव तळपत ठेवणारे, सत्त्वासाठी सर्वस्वावर तिलांजली वाहावयास यत्किंचितही मागे-पुढे न पाहणारे, एक निर्भय पुरुषव्याघ्र होते हे मात्र पुष्कळांस माहीत नाही. पुष्कळ आई-बाप ईश्वरचंद्रांच्या जीवनातील ही गोष्ट आपल्या मुलांच्या मनावर बिंबवीत नाहीत. दुसर्याचे दुःख पाहून ढळढळा रडणारे विद्यासागर, जर कोणी त्यांचा व इतरांचा स्वाभिमान, स्वत्व हिरावून घेण्याचा प्रयत्न केला तर हेच विद्यासागर मेरुपर्वताप्रमाणे धीरवृत्तीने लढण्यास सिद्ध असत; राजा असो राजराजेश्वर असो, त्यांस त्यांची तमा नसे. स्वाभिमानशून्य नरांचे जीवित म्हणजे आंधळे, निःसत्त्व पशूचे जीवन होय. पशूसुद्धा स्वत्वासाठी धडपडतात. सर्पाच्या फणेवर दर्पाने कोणी लगुडप्रहार केला, तर तो सरपटणारा सर्प फुत्कार करतो; अंगावर धावून येतो. विद्यासागरांस अपमान सहन होत नसे. ते मानधन होते. या मृदुकठोरत्वामुळे त्यांच्या जीवनास विशेष शोभा आली आहे. ते फुलासारखे कोमल आहेत, तर व्रजाप्रमाणे कठोरही आहेत. विद्यासागर हे खरोखर विद्येचे-ज्ञानाचे सागर होते. ते मोठे समाजसुधारक होते. समाजामध्ये महत्पद प्राप्त करून त्यांनी घेतले होते. त्यांच्या साह्याची प्रत्येक सामाजिक चळवळीत विशेष जरूर असे. बंगालच्या मुख्य सत्ताधीशापासून तो रस्त्यात रखडणार्या भिकार्यापर्यंत त्यांची सर्वांस सारखीच जरूर भासत असे. प्रत्येक जण त्यांची स्तुती करी, त्यांची पूजा करी. त्यांचे शारीरिक सामर्थ्यही फार मोठे होते. तिघा-चौघा गलेलठ्ठ धटिगणांबरोबर ते एकटे झगडू शकत. मनुष्याने जसे असावे तसे ते होते. ते निर्मळ होते, ते सत्यनिष्ठ होते. एका विनोदी बंगाली माणसाने एकदा सहज उद्गार काढले, ’परमेश्वर पुष्कळ बंगाली निर्माण करीत होता; इतक्यात मध्येच त्याने ईश्वरचंद्र हा पुरुष चुकून निर्माण केला.’ याचा अर्थ म्हणजे भित्र्या, भ्याड, बंगालीबाबूंत पुरुषपदवीस पात्र ईश्वरचंद्र होते. ते पुरुष होते हेच त्यांचे यथार्थ वर्णन. त्यांच्यात पौरुष होते. पौरुषाशिवाय पुरुष कसला? ते पुरुष होते. ते मर्द होते. हे पौरुष, हा मर्दानीपणा, हा स्वाभिमान वाचकांनी विद्यासागरांच्या चरित्रापासून घ्यावा एतदर्थ हे पुढील छोटे चरित्र आम्ही लिहिण्याचे योजिले आहे.