ईश्वरचंद्र विद्यासागर 23
बेथूनची प्रेमळ स्मृती, या संस्थेवरील प्रेम या गोष्टी विद्यासागर यांच्या हृदयातून केव्हाही दूर झाल्या नाहीत. विद्यासागर इहलोक सोडून जाण्यापूर्वी एकच वर्ष पुढील गोष्ट घडून आली. बेथून कॉलेजमध्ये आपल्या एका मित्राच्या सुनेस प्रवेश मिळावा म्हणून विद्यासागर या कॉलेजमध्ये गेले होते. शाळेतील विद्यार्थिनी, शिक्षक वगैरे सर्व पाहून ईश्वरचंद्र यांस प्रेमाचे भरते आले. आपला आनंद शब्दांनी कसा व्यक्त करावा हे त्यांस समजेना. महाविद्यालयातील सर्व गुरुजनांस व छात्रगणांस त्यांनी एक चमचमीत मेजवानी दिली; मेजवानी चालू असता कॉलेजच्या आवाराकडे विद्यासागर यांचे लक्ष होते. एकदम घळघळ अश्रुधारा त्यांच्या डोळ्यांवाटे बाहेर येऊ लागल्या. सबंध दिवस ते गंभीर व विचारमग्न होते. त्यांच्या जवळ काय आणि कसे बोलावे हे कोणासच समजेना. ईश्वरचंद्रांस का दुःख होते आहे, हे कसे विचारावे याचाच सर्वांस विचार पडला. शेवटी ईश्वरचंद्रांचे ज्यांनी बंगालीत चरित्र लिहिले आहे, ते चंडीदास विद्यासागर यांच्याकडे त्या दिवशी आले होते. आज विद्यासागर यांचा मुखचंद्रमा का काळवंडलेला दिसतो हे त्यांस समजेना. निरभ्र आकाशात मेघावडंबर का जमले हे त्यांस समजेना. बरे, हा प्रश्न तरी कसा विचारावा हे एक कोडेच. शेवटी सर्व धैर्य एकवटून त्या गृहस्थांनी विद्यासागर यांस त्यांच्या दुःखाचे, चिंतेचे, खिन्नतेचे कारण विचारले. “आपणास आजपर्यंत खिन्न मी कधीच पाहिले नाही. कोणती चिंता आपणास त्रास देते? कोणते दडपण आपल्या मनावर पडले आहे? कोणता विचार आपल्या चित्तास व्यग्र करीत आहे?” असे चंडीदास यांनी विचारले. जो जो विद्यासागरांकडे आज पाहत होता, त्या सर्वांस विद्यासागरांच्या दृष्टीत एक प्रकारचे अभिनव गांभीर्य दिसत होते. त्या दृष्टीत असे काही होते की, जे दुसर्यास मुके व शांत बसवीत होते. विचारलेल्या प्रश्नास विद्यासागर यांनी अगदी अल्प उत्तर दिले; “आज मी बेथून कॉलेजमध्ये गेलो होतो; तेथील सर्व व्यवस्था पाहून मला अत्यानंद झाला.” तरीसुद्धा आज विद्यासागर असे गंभीर व खिन्न का हे चंडीदास यांस समजेना. तेव्हा ते पुनरपि म्हणाले, “आनंद झाला, तर मग आज खिन्न का? आपण रोजच्यासारखे का नाही? मनात व्यग्रता का आहे?” कंपितस्वराने, भावनांनी भरून येऊन विद्यासागर म्हणाले, “आज किती विद्यार्थिंनी शिक्षण घेत आहेत. कित्येक माजी विद्यार्थिंनी आता शिक्षिका आहेत. परंतु ज्या थोर पुरुषाने आपले सर्वस्व या संस्थेच्या उभारणीसाठी दिले तो आज कोठे आहे? हे वैभव पाहावयाला, आपल्या संस्थेची ही भरभराट पाहावयास तो या जगात राहिला नाही. बेथूनचे वर्णन मी काय व कसे करू? किती सरळ वृत्ती, अंगी गर्वाचा लेश नाही; पूर्ण निरहंकार झालले. समाजातील आपला दर्जा व मोठेपणा पार विसरून त्यांनी लहान मुलीस आपल्या पाठीवर घेऊन नाचावे! लहान मुलींनी त्यांस घोडा करावे व त्यांच्यावर स्वार व्हावे. लहान मुलींशी खेळताना त्यांच्याबरोबर ज्याने क्षणोक्षणी, उंच असल्यामुळे वाकावे! लहान मुलींस पालकांकडून शाळेत घेऊन यावे व पुनः त्यांस घरी पोचते करावे-असे ते उदार महात्मे बेथून. ते आज हे सर्व पाहावयास कोठे आहेत? ज्याच्या पाठीवर बसणार्या मुली आज शिकवीत आहेत, त्यांत पाहण्यास बेथून जगले नाहीत, त्यांचे ते भाग्य नव्हते.” एवढे बोलल्यावर त्यांस शोकावेग आवरेना. मूल हरवलेल्या आईप्रमाणे ते रडले. आई हरवलेल्या मुलाप्रमाणे ते रडले. एकीकडे आपल्या धोतराने ते अश्रू पुसत होते. बेथून यांच्या संस्मरणाने ते खिन्न झाले होते. हा वृक्ष लावणारा फळ पाहावयास राहिला नाही म्हणून त्यांस गहिवरून आले होते; पुष्कळ वेळ स्फुंदन झाल्यावर मोठ्या जड अंतःकरणाने एक सुस्कारा सोडून ते म्हणाले, “केवढा मोठा थोर माणूस आपल्या देशात आला!”