ईश्वरचंद्र विद्यासागर 38
वरील चळवळीप्रमाणे दुसरी मोठी चळवळ विद्यासागर यांनी करण्यास मदत केली, ती मद्यपानप्रतिबंधाची चळवळ. ही चळवळ प्यारीचरण सरकार यांनी खरोखर प्रथम सुरू केली. प्यारीचरण सरकार हे कोलूटोला ब्रँच शाळेचे हेडमास्तर होते. हे फार थोर गृहस्थ होते. सुरेंद्रनाथ आपल्या जीवनस्मृतीत लिहितात, ‘I never had the honour of sitting at the feet of Peary Churan Sircar, but he was one of the greatest teachers of youth that Bengal had produced.’ ‘प्यारीचरण सरकार यांच्या पदसरोजाजवळ बसण्याचे माझे भाग्य नव्हते; परंतु त्यांच्यासारखा तरुणांचा शिक्षक व मार्गदर्शक बंगालमध्ये आजपर्यंत कोणी झाला नाही.’ अशा प्यारीचरणांनी ही मद्यपान चळवळ हाणून पाडण्याचे करी कंकण बांधले. इंग्रजी शिक्षणाबरोबर जे काही दोष आपणात शिरले, जी व्यसने आपणास खाली चिखलात ओढू लागली, त्यांत हे मद्यपान एक होते. आपल्या महाराष्ट्रातही नवसुशिक्षित लोकांत हे मद्यपान फार बोकाळले होते. पुण्यातील एक प्रख्यात इंग्रजी शिक्षक गटारात दारू पिऊन धुंद झालेले असावयाचे. त्यांस कोठून तसे हुडकून शाळेत आणावे लागे, एकदा शाळेत आले, म्हणजे मग मात्र हे उत्कृष्ट शिकवावयाचे.
बंगालमध्ये तर यापेक्षा मोठे प्रकार होते. मद्य, मांस, गोमांससुद्धा हे नवसुशिक्षित सेवन करीत. बंगालचे प्रख्यात राष्ट्रीय कवी, ‘मेघनादवध’ हे अप्रतिम महाकाव्य लिहिणारे मायकेल मुधुसूदन दत्त हे दारू पिऊन कसे झिंगलेले असत व इह-लौकिक-विचार-विस्मृती कशी करून घेत ते सुप्रसिद्ध आहे. इंग्रजी शिकले म्हणजे तदनुषंगिक या सर्व गोष्टी आपणास प्राप्त करून घेतल्याच पाहिजेत असे त्या वेळेस सर्वांस वाटे. जो मद्यपान सेवन करणार नाही, जो धूम्रपान करणार नाही तो खरा शिकलाच नाही, त्याच्यात संस्कृती नाही, असे तत्कालीन विद्वान खुशाल बिनदिक्कत समजत. मोठे मोठे लोक या व्यसनास बळी पडले होते. ‘Some of our best men had fallen victims to the curse of drink,’ असे सुरेंद्रनाथ लिहितात. या व्यसनाच्या मगरमिठीपासून बंगालला मुक्त करावे, तरुणांस ताळ्यावर आणावे, म्हणून प्यारीचरण बद्धपरिकर झाले.
प्यारीचरण यांची कृश व छोटी मूर्ती, प्यारीचरण यांचा गोड स्वभाव, त्यांची शांतता, गडबडगुंड्यापासून दूर असण्याची वृत्ती, ही सर्व पाहून प्रथम तर पुष्कळांस असे वाटले की, या शांत मूर्तीच्या हातून हे धडाडीचे, धकाधकीच्या मामल्याचे काम कसे व्हावे? पाठशाळेत शांतपणे विचारामृत पाजणारा, आपल्या खोलीत गहन गोष्टींचे चिंतन करणारा हा साधा पुरुष, समाजातील व्यसनास आळा घालण्याचे काम कसे करणार? परंतु लवकरच लोकांचे वरील समज गैरसमज ठरले. या वामनमूर्तीचा पराक्रम मोठा आहे; मृदू व शांत अशा अंतरंगात निश्चयाची तीव्रता, ध्येयार्थ प्रयत्न करण्याची व तदर्थ कष्ट सोसण्याची अपूर्व तयारी, ही आहेत हे लोकांस दिसून आले. आधीच प्यारीमोहन तरुणांचे प्राण. तरुणांची भक्ती व प्रेम प्यारीमोहन यांवर निस्सीम होती. असा सर्व तरुणांनी पूजिलेला पुरुष या चळवळीस आरंभ करता झाला. सुरेंद्रनाथ लिहितात, ‘No man was better qualified to lead the movement than a teacher of youth so universally respected as Peary Churan Sircar. The outward look and demeanour of the man would, however, produce the impression that he was far more fit to follow than to lead. One so gentle, so quiet so amiable seemed to be hopelessly wanting in the sterner qualities of the leader of great public movement. The result, however, showed that there was the mailed fist concealed under the velvet glove, and that the gentle head master of the Calootota Branch School had been gifted by nature with what are believed to be incompatible qualities, a child-like simplicity and fascinating amiability, combined with the firmness and strength of a leader of men.’