ईश्वरचंद्र विद्यासागर 49
याच सुमारास त्यांनी सरकारचे काही पैसे कर्जाऊ म्हणून देऊन टाकले. ४९११-५-१ इतकी रक्कम त्यांनी सरकारात भरली. ही रक्कम कशासाठी विद्यासागरांस देण्यात आली होती, याचा सरकारजवळ जमाखर्च नव्हता, परंतु विद्यासागर म्हणाले, “हे सरकारचे मला देणे आहे. कदाचित् शाळा वगैरे स्थापण्यास सरकारने ही मदत पूर्वी दिली असेल.” यंग साहेबाने शाळांच्या खर्चाचा हिशोब झिडकारला व नामंजूर केला. तर पूर्वी दिलेली तरी सरकारी मदत कशास पाहिजे, हे एक प्रकारचे कर्जच झाले! कदाचित् अशा भावनेने सव्याज रक्कम विद्यासागरांनी परत केली असेल. सरकारजवळ हिशेब नव्हते तरी सरकारने ही रक्कम स्वीकारली. देणाऱ्याने मोठेपणा दाखविला तर घेणा-याने नको का दाखवावयास? परंतु आमच्या सध्याच्या सरकाराला इतका मनाचा मोठेपणा आहे कोठे?
अशा प्रकारचा विद्यासागरांचा आयुष्यक्रम चालला होता. लोककल्याण हा त्यांचा एकमेव व्यवसाय होता. परंतु त्यांची प्रकृती त्यांचे वडील निवर्तल्यापासून चांगली नव्हती, ती दिवसेंदिवस जास्त बिघडत चालली. विद्यासागरांस फार पूज्य मानणारे चंडीदास हे एकदा त्यांना म्हणाले, “आपण कलकत्ता सोडून दुसरीकडे का जाऊन राहत नाही? येथे आपली प्रकृती नीट राहत नाही.” विद्यासागर हा प्रश्न ऐकून एकदम रडू लागले व म्हणू लागले, “अहो, मी गेल्यावर या माझ्या लोकांना मदत कोण करील? शेकडो लोकांस माझी नियमाने मदत मिळते, कोणास चार आणे, कोणास आठ आणे, कोणास रुपया, कोणास पाच रुपये याप्रमाणे महिना माझे ८०० रुपये केवळ यासाठी खर्च होतात. आता कदाचित् मला दुस-याच्या स्वाधीन पैसे करून जाता येईल. एखाद्या गृहस्थास या सर्व लोकांची व्यवस्था लावावी असे पैसे देऊन सांगितले म्हणजे झाले असे तुम्ही म्हणाल, परंतु हा प्रयत्न अगदी फुकट व व्यर्थ आहे असे मला अनुभवांती कळले आहे. मागे मी एकदा परगावास गेलो होतो. एका गृहस्थाजवळ रु. २,५०० या दानधर्मासाठी देऊन ठेविले. परंतु मी जेथे गेलो होतो तेथे तेथील माझ्या लोकांची पत्रांवर पत्रे मदतीसाठी येऊ लागली. माझ्याने तिकडे राहवेना. मी आल्यावर त्या गृहस्थास विचारले, ‘आपणाजवळ मी पैसे देऊन गेलो होतो, तरी आपण ते त्या लोकांस का दिले नाहीत?’ ‘माझ्या कामासाठी मी खर्च केले; माझा नाईलाज झाला. मी मोठ्या आपत्तीत पडलो होतो.’ असे उत्तर त्या गृहस्थाने मला दिले. मी रु. २,५०० कर्जाऊ काढले व माझ्या लोकांस मदत करू लागलो. परंतु त्या गृहस्थाने माझे पैसे अद्याप परत केले नाहीत. अशा प्रकारची आपल्या लोकांची स्थिती. मग मी परगावी कसा जाऊ? यांची दुःखे कोण निवारण करील?” विद्यासागरांचे हे शब्द ऐकून चंडीदास यांस गहिवरून आले व ‘केवढा थोर पुरुष!’ असे शब्द त्यांच्या तोंडावाटे बाहेर पडले.
विद्यासागर कधी कधी खर्माटाड नावाच्या प्रांती आपल्या बंगल्यात राहावयास जात. खर्माटाड हा प्रांत किंवा परगणा बिहारमध्ये आहे. येथे संताळ लोक राहतात. या संताळांस नाना प्रकारची मदत विद्यासागर करावयाचे. आपल्या बंगल्याभोवतालच्या बागेची काळजी घ्यावयास त्यांनी एक नोकर ठेवला होता. हा फार प्रामाणिक होता व विद्यासागर यांचा त्याच्यावर लोभ जडला. विद्यासागरांचा मुलगा नारायण हा त्यास लिहायला-वाचावयास शिकवी. विद्यासागरांनी पुढे त्याचे लग्नसुद्धा स्वतःच्या खर्चाने करून दिले. या संताळ लोकांस जेऊ-खाऊ घालावे, त्यांस कपडेलत्ते द्यावे असा विद्यासागरांचा येथील क्रम होता. यामुळे त्या सर्व संताळ लोकांचे विद्यासागरांवर फार प्रेम व भक्ती जडली. विद्यासागर आले की, हे सर्व संताळ लोक काही ना काही चीज घेऊन त्यांस भेटावयास येत. कोणी सुंदर व सुगंधी रानफुले आणीत. एकदा एका संताळाने एक कोंबडी विद्यासागरांस भेट म्हणून आणली. विद्यासागर कोंबडी कशी घेणार? बंगाली ब्राह्मण मासे सेवन करतात; परंतु इतर मांस ते सेवन करीत नाहीत. जेव्हा विद्यासागर कोंबडी घेईतना. तेव्हा तो संताळ रडू लागला. “महाराज, आपण आलात व माझ्याजवळ दुसरे-तिसरे काही नव्हते; म्हणून ही एक कोंबडी मात्र होती तेवढी आणली; तिचाही आपण स्वीकार करीत नाही, तेव्हा दुर्दैव माझे. माझे भाग्य नाही आपणास काही अर्पण करण्याचे, दुसरे काय?” हे संताळाचे शब्द ऐकून दयासागर हेलावला व विद्यासागरांनी ती कोंबडी ठेवून घेतली व मग त्या संताळास नकळत ती दुस-यास देऊन टाकिली.