ईश्वरचंद्र विद्यासागर 2
पूर्वजांची व वडिलांची हकीकत
विद्यासागरांचा जन्म पश्चिम बंगालमध्ये हुगळी जिल्ह्यातील वीरसिंह या गावी झाला. विद्यासागरांच्या आजोबांचा स्वभाव काहीसा तर्हेवाईक होता. ते शरीराने प्रतिभीम होते. फार शूर व हट्टी होते. त्यांस अपमान अल्पही सहन व्हायचा नाही; अगदी क्षुल्लक गोष्टीनेही ते संतापायचे; रागाने लाल व्हावयाचे. प्रतिजमदग्नीच ते! मस्तकाच्या शिरा ताडताड उडू लागायच्या. डोळे खदिरांगासारखे लाल व्हायचे. सर्व शरीर क्रोधाने केवळ कंपायमान व्हावे. परंतु शरीराच्या ठिकाणी आविर्भूत होणारा क्रोध प्रत्यक्ष कृतीत रूपांतर पावत नसे. ज्या व्यक्तीवर ते संतापत, त्या व्यक्तीस कोणत्याही प्रकारे ते उपसर्ग देत नसत, हेही खरे. म्हणजे त्यांचे मन खरे पाहिले तर नवनीतसमच होते, हे निःसंशय होय. एकदा फार विरक्त होऊन ते घरातून बाहेर पडले. नाना तीर्थे त्यांनी केली, सर्व यात्रा केल्या; परंतु आयुष्याचा सायंसमयीचा पडदा पडण्याच्या वेळी, विद्यासागरांचे आजोबा आपल्या मुलाबाळांच्या गोकुळात आले आणि ते घरीच देह ठेवते झाले.
विद्यासागरांची आई एका पंडिताची कन्या होती. विद्यासागरांच्या आईचे वडील त्या वेळी सर्व बंगालमध्ये एक नावाजलेले वैय्याकरणी होते. विद्यासागरांची आई ही हिंदू आर्य स्त्रीचा केवळ आदर्श होती. आपल्या मुलाच्या जीवनक्रमावर तिच्या वर्तनाची विलक्षण छाप पडली हे खरे. दयासागर ही पदवी विद्यासागरांस मिळावयास त्यांच्या मातेचे परोपकारित्वच कारण आहे. तिची भूतदया अभूतपूर्व होती. ती केवळ माऊली होती. ईश्वरचंद्रांची आपल्या आईवर किती श्रद्धा, भक्ती, निष्ठा होती हे सांगितले तर सध्याच्या दिवसांत त्यावर कोणाचा विश्वाससुद्धा बसणार नाही.
ईश्वरचंद्रांच्या वडिलांचे नाव ठाकुरदास वंद्योपाध्याय. दारिद्र्याच्या गारठ्यात हे कसे तरी कुडकुडत वाढले. त्यांचे शिक्षण अर्थातच बेताचे झाले. आपल्या कुटुंबातील विपन्नावस्था पाहून त्यांचे करूण मन वितळले. त्या वेळेस ते १५ वर्षांचे सरासरी झाले असतील. परंतु ठाकुरदास केवढ्या धीराचे! आपले सोन्यासारखे धाकटे भाऊ, आपली कृश माता यांना सुख देता येईल तर पाहावे या विचाराने ठाकुरदास आपल्या घरादारास सोडून कलकत्त्यास आले. या वेळी त्यांचे लहरी वडील दूर यात्रा करीत कोठे तरी भटकत होते.
ठाकुरदास हे उद्योगाचे भगीरथ; स्वभाव प्रामाणिक. या दोन अमौलिक गुणांच्या जोरावर अनेक अडचणींतूनही त्यांनी महिना दोन रुपये वेतनाची नोकरी मिळविली. परंतु ही दोन रुपयांची भली मोठी नोकरी मिळण्यापूर्वी त्यांस किती कष्टाचे दिवस कंठावे लागले. पुष्कळ दिवस त्यांस एकदाच खाऊन राहावे लागे. एका दयाळू सद्गृहस्थाने एकदा त्यांस आचारी म्हणून ठेवले. परंतु ठाकुरदासांचा हा दयाळू यजमानच काही कारणांमुळे अत्यंत गरिबीत आला; तेव्हा ते उभयतां मोठया मिनतवारीने दिवस लोटीत होते.