ईश्वरचंद्र विद्यासागर 4
जन्म व बालपण
आता ठाकुरदास यांनी विवाह केला. त्यांची बायको एका नावाजलेल्या विद्वानाची सुशील कन्या होती. या सुशील दांपत्यापासून ईश्वरचंद्रांचा इ.स. १८२० साली जन्म झाला. मातृपक्षाकडून ईश्वरचंद्र यास विद्या, शील यांची जोड मिळाली, तर पितृपक्षाकडून निरपेक्ष स्वाधीनता, संकटास तोंड देण्याची हिंमत या गोष्टी लाभल्या. कितीही संकटे आली तरी दुसर्यासमोर मान वाकवावयाची नाही हा पितामहाचा गुण, कष्ट करण्याचा पित्याचा गुण, विद्वता व बुद्धिमत्ता हा मातामहांचा गुण, तर शीलाची व सौजन्याची आईची जोड, या सर्व गुणांची ईश्वरचंद्रांस प्राप्ती झाली होती.
लहान असता विद्यासागर खोडकर होते. देवासारखे शांत मुनी ते नव्हते. एखाद्या बाईने आपली वस्त्रे स्वच्छ धुवून उन्हात वाळत घालून ठेवावीत आणि विद्यासागराने येऊन त्यांच्यावर शेणमातीचा सडा करावा. असल्या खोड्या जरी ते करीत, तरी अभ्यासाच्या बाबतीत मात्र ते सदैव तत्पर व सावधान असायचे. विद्यासागर पाच वर्षांचे झाले तेव्हा त्यास त्यांच्या गावातील पाठशाळेत घालण्यात आले. त्यांच्या पाठशाळेतील ते उत्कृष्ट विद्यार्थी म्हणून नावाजलेले. विद्यासागर यांची ग्रहणशक्ती, धारणशक्ती, अलौकिक स्मरणसामर्थ्य, विलक्षण उद्योग हे पाहून विद्यासागरांचे गुरुजन प्रसन्न व्हायचे. ‘हा बालक पुढे खात्रीने कीर्तिमान होणार’ असे आशीर्वचन व भविष्यवचन त्यांच्या मुखावाटे सहज बाहेर पडायचे. विद्यासागरांचे भटकणारे आजोबा आता तरी घरी आलेले होते. त्यांनीसुद्धा अशाच प्रकारचे भविष्य केले होते.
अडीच वर्षांमध्ये त्या पाठशाळेतील अभ्यासक्रम, शिक्षणक्रम विद्यासागर यांनी समाप्त केला. शिक्षकांनी विद्यासागरांच्या वडिलांस भेटून सांगितले, ‘तुमचा मुलगा फार अलौकिक बुद्धीचा आहे. देवाने त्यास बुद्धीचे व उद्योगाचे देणे दिले आहे. तर यास तुम्ही पुढील विद्याभ्यासासाठी कलकत्त्यास घेऊन जा. त्याच्या शिक्षणाची आबाळ करू नका.’ अत्यंत दारिद्र्यामुळे ठाकुरदास यांस विद्याभ्यास करावयास संधी मिळाली नाही. जी संधी आपणास मिळाली नाही, ती आपल्या मुलांबाळांस सदैव द्यावयाची हा मात्र त्यांनी आपल्या मनाशी निश्चय केला. मी शिकलो नाही तर नाही, परंतु माझ्या मुलांस मात्र मी शिकविणार अशी आणभाक आपल्या मनाशी ठाकुरदास यांनी केली.
कलकत्त्यास विद्याभ्यासार्थ प्रयाण
याच सुमारास ठाकुरदास यांचे वृद्ध वडील ७६ व्या वर्षी दिवंगत झाले. और्ध्वदेहिक कामे करण्यासाठी ठाकुरदास कलकत्त्याहून घरी आले होते. सर्व क्रिया सांग संपल्यावर ते कलकत्त्यास जावयास निघाले. यावेळेस ठाकुरदास यांनी आठ वर्षांच्या विद्यासागरासही बरोबर घेतले. कलकत्त्यास नेऊन मुलाच्या शिक्षणाची काही सोय लावता येते का, हे ते पाहणार होते. त्या वेळेस आगगाड्या वगैरे नव्हत्या. गाडी रस्त्याने कलकत्त्यास जावे लागे. “बाबा, तो रस्त्याच्या बाजूला कसला मोठा दगड आहे हो?” असे विद्यासागरांनी विचारले. “अरे, तो मैलाचा दगड आहे. मोठ्या सडकांवर अंतर दाखविणारे असे दगड बसविलेले असतात. त्या दगडावर येथून कलकत्त्याचे अंतर दर्शविले आहे. प्रत्येक मैलामैलावर असे दगड असतात, आणि त्यांच्यावर हे अंतर जसजसे कमी-जास्त होईल तसे लिहिलेले असते.” असे ठाकुरदासांनी उत्तर दिले. हे आकडे इंग्रजी होते. त्यामुळे विद्यासागरास ते समजेना. “तो आकडा किती आहे हो बाबा?” विद्यासागर यांनी कुतूहलपूर्ण प्रश्न विचारला. “१९” असे बाबांनी उत्तर दिले.