Get it on Google Play
Download on the App Store

ईश्वरचंद्र विद्यासागर 22

स्त्री-शिक्षणासंबंधीची कामगिरी

बंगालमध्ये स्त्रीशिक्षणाचा प्रसार करणारे मूळ गृहस्थ बेथून नावाचे युरोपियन होते. हे गृहस्थ फार दयाळू हृदयाचे होते. बंगाल सरकारच्या कार्यकारी मंडळाचे ते सभासद होते. त्यांचा दर्जा फार मोठा होता; त्यांस युरोपियन लोकांत मोठा मान मिळे. बेथून यांच्या पूर्वीही कलकत्त्याच्या काही भागांत मुलींच्या शिक्षणासाठी शाळा स्थापन झाल्या होत्या. परंतु या सर्व अस्तित्वात आल्या आणि लवकरच नामशेष झाल्या. ज्याने स्त्रीशिक्षण भक्कम पायावर उभारले तो पुरुष बेथून हा होय. बेथूनप्रमाणे ज्यांचे हृदय परस्थांसाठी तळमळते असे लोक केव्हाही विरळेच असणार. धर्माने निराळे, भाषेने निराळे, आचाराने निराळे, सर्वतोपरी निराळे अशा पददलित लोकांसाठी, जेत्यांमधील कोण माणूस करुणा दाखवील? बेथून, डेव्हिड हेअर, अण्ड्रयूज, निवेदिता, यांसारखी दुःखित लोकांस आपली समजणारी माणसे पृथ्वीस भूषण होत यात शंका नाही. निरपेक्षपणे निराश्रितांस आश्रय देणारे, त्यांचे डोळे पुसणारे असे उदारधी भूतलावर किती सापडणार! अशा थोर कोटीतील बेथून हे एक गृहस्थ होते. गव्हर्नरच्या खालोखाल त्यांची प्रतिष्ठा होती; परंतु पूर्णपणे निरहंकार व बालकाप्रमाणे सरळ त्यांची मनोवृत्ती होती. परंतु जे कार्य ते हाती घेऊ पाहत होते, त्यात आचारविचारांची पूर्ण ओळख नसल्याकारणाने बंगाली जनतेस बरोबर घेऊन, यश मिळविणे कठीण होते. वजनदार व विद्वान बंगाली गृहस्थांचा पाठिंबा व साहाय्य मिळाल्याविना बेथून यांस आपला उद्देश सिद्धीस नेता आला नसता. परंतु असा गृहस्थ त्यांस मिळाला. निरलसवृत्तीचा, उदार मनाचा महात्मा बेथून यांस भेटला. हे विद्यासागर होते.

बेथून व विद्यासागर यांची पहिली मुलाखत खालीलप्रमाणे घडून आली. संस्कृत महाविद्यालयाचे प्रमुख मायेट हे व फोर्ट वुइल्यमचे प्रमुख मार्शल हे दोघे विद्यासागर यांस प्रत्येक शिक्षणविषयक बाबतीत सल्ला विचारीत. सरकारने प्रांतात कोणतीही शिक्षणविषयक चळवळ केली तर विद्यासागरांचे मत तेथे विचारात घेण्यात येई. एकदा हिंदू कॉलेजमधील वरिष्ठ वर्गातील विद्यार्थ्यांची परीक्षा होती. त्यांस निबंध लिहावयास सांगावयाचे होते. या निबंधाचे परीक्षक विद्यासागर होते. विद्यासागर यांनी ‘स्त्रीशिक्षण’ या विषयावर निबंध लिहावयास सांगितले. ज्या विद्यार्थ्याचा निबंध उत्कृष्ट ठरेल त्यास पारितोषिक द्यावयाचे होते. बक्षीस समारंभास बेथून हे हजर होते. बेथून यांनी एक लहानच पण सुंदर असे भाषण केले. त्यात ‘हिंदुस्थानच्या कोनाकोपर्‍यांतही स्त्रीशिक्षणाचा प्रसार करा’ असे त्यांनी मोठ्या कळकळीने सांगितले. स्त्रीशिक्षणाचा हा कैवारी व स्त्रियांबद्दल निरतिशय सहानुभूती बाळगणारे ईश्वरचंद्र यांची येथे भेट झाली व पुढे वरचेवर विद्यासागर या उदारधीकडे जाऊ-येऊ लागले. बेथून यांच्याकडे शिक्षणखाते होते व त्यामुळेही विद्यासागर यांस वरचेवर त्यांच्याकडे जावे लागे. दोघांमध्ये मोठी मैत्री जमून आली. दोन थोर महात्म्यांची मैत्री म्हणजे एक आनंदाचे व विश्रांतीचे स्थान होय.

काही सुशिक्षित एदद्देशीयांच्या मदतीने व साहाय्याने बेथून यांनी मुलींसाठी विद्यालय काढले. विद्यासागर हे या शाळेचे पहिले सूत्रचालक सेक्रेटरी होते. जोपर्यंत बेथून जिवंत होते, तोपर्यंत या दोघां एकनिष्ठ कार्यकर्त्यांनी अहर्निश परिश्रम करून या शाळेची जोपासना चालविली. परंतु बेथून इहलोक सोडून गेल्यावर या शाळेची संपूर्ण जबाबदारी विद्यासागर यांच्या अंगावर पडली. स्त्रीशिक्षणास विरोध करणार्‍यांनी ही वेळ साधली व या संस्थेस मूठमाती देण्यासाठी ते तयार झाले. शाळा सुरक्षित राहावी म्हणून कोणी तरी मोठा वजनदार पुरस्कर्ता पाहिजे होता. सुदैवेकरून विद्यासागर यांस लेडी कॅनिंग यांची जोड मिळाली. दयाळू कॅनिंग म्हणून जो गव्हर्नर जनरल प्रसिद्ध आहे, त्याची ही पत्‍नी. लागेल ती मदत आपण या संस्थेस करू असे श्रीमती कॅनिंग यांनी अभिवचन दिले. बेथून व लेडी कॅनिंग या दोघांच्या नावांचा पुरस्कार करून या मोडणा-या शाळेस त्यांनी उचलून धरिले; कोसळणा-या डोला-यास सांभाळले. पुढे पुढे इतर अधिकार्‍यांजवळ फार मतभेद होऊ लागला म्हणून या संस्थेचा अधिकारसंबंध त्यांनी सोडून दला. प्रत्यक्ष संबंध सोडला, तरी अप्रत्यक्षपणे संस्थेच्या समुन्नतीसाठी जेवढे करता येणे शक्य तेवढे विद्यासागर करीत असत. या विद्यालयाचे पुढे महाविद्यालयही सुरू करण्यात आले.

ईश्वरचंद्र विद्यासागर

पांडुरंग सदाशिव साने
Chapters
ईश्वरचंद्र विद्यासागर 1 ईश्वरचंद्र विद्यासागर 2 ईश्वरचंद्र विद्यासागर 3 ईश्वरचंद्र विद्यासागर 4 ईश्वरचंद्र विद्यासागर 5 ईश्वरचंद्र विद्यासागर 6 ईश्वरचंद्र विद्यासागर 7 ईश्वरचंद्र विद्यासागर 8 ईश्वरचंद्र विद्यासागर 9 ईश्वरचंद्र विद्यासागर 10 ईश्वरचंद्र विद्यासागर 11 ईश्वरचंद्र विद्यासागर 12 ईश्वरचंद्र विद्यासागर 13 ईश्वरचंद्र विद्यासागर 14 ईश्वरचंद्र विद्यासागर 15 ईश्वरचंद्र विद्यासागर 16 ईश्वरचंद्र विद्यासागर 17 ईश्वरचंद्र विद्यासागर 18 ईश्वरचंद्र विद्यासागर 19 ईश्वरचंद्र विद्यासागर 20 ईश्वरचंद्र विद्यासागर 21 ईश्वरचंद्र विद्यासागर 22 ईश्वरचंद्र विद्यासागर 23 ईश्वरचंद्र विद्यासागर 24 ईश्वरचंद्र विद्यासागर 25 ईश्वरचंद्र विद्यासागर 26 ईश्वरचंद्र विद्यासागर 27 ईश्वरचंद्र विद्यासागर 28 ईश्वरचंद्र विद्यासागर 29 ईश्वरचंद्र विद्यासागर 30 ईश्वरचंद्र विद्यासागर 31 ईश्वरचंद्र विद्यासागर 32 ईश्वरचंद्र विद्यासागर 33 ईश्वरचंद्र विद्यासागर 34 ईश्वरचंद्र विद्यासागर 35 ईश्वरचंद्र विद्यासागर 36 ईश्वरचंद्र विद्यासागर 37 ईश्वरचंद्र विद्यासागर 38 ईश्वरचंद्र विद्यासागर 39 ईश्वरचंद्र विद्यासागर 40 ईश्वरचंद्र विद्यासागर 41 ईश्वरचंद्र विद्यासागर 42 ईश्वरचंद्र विद्यासागर 43 ईश्वरचंद्र विद्यासागर 44 ईश्वरचंद्र विद्यासागर 45 ईश्वरचंद्र विद्यासागर 46 ईश्वरचंद्र विद्यासागर 47 ईश्वरचंद्र विद्यासागर 48 ईश्वरचंद्र विद्यासागर 49 ईश्वरचंद्र विद्यासागर 50 ईश्वरचंद्र विद्यासागर 51 ईश्वरचंद्र विद्यासागर 52 ईश्वरचंद्र विद्यासागर 53 ईश्वरचंद्र विद्यासागर 54 ईश्वरचंद्र विद्यासागर 55 ईश्वरचंद्र विद्यासागर 56 ईश्वरचंद्र विद्यासागर 57 ईश्वरचंद्र विद्यासागर 58 ईश्वरचंद्र विद्यासागर 59 ईश्वरचंद्र विद्यासागर 60 ईश्वरचंद्र विद्यासागर 61 ईश्वरचंद्र विद्यासागर 62 ईश्वरचंद्र विद्यासागर 63 ईश्वरचंद्र विद्यासागर 64 ईश्वरचंद्र विद्यासागर 65 ईश्वरचंद्र विद्यासागर 66 ईश्वरचंद्र विद्यासागर 67 ईश्वरचंद्र विद्यासागर 68 ईश्वरचंद्र विद्यासागर 69 ईश्वरचंद्र विद्यासागर 70