*शेवट 2
'अजीर्ण होईल त्याला, विजय.' मुक्ता हसून म्हणाली.
'परंतु माझे पोट नको का भरायला?' विजय म्हणाला.
घरात सर्वांना आनंद झाला. मंजुळाताईच्या जवळ विजय जाऊन बसला. तिच्या डोळयांतून आनंदाचे अश्रू घळघळत होते.
'सुमुख कोठे आहे?' विजयने विचारले.
इतक्यात सुमुख आला.
दोघे भेटले, इतक्यात ग्रामणी आला.
'विजय, मला क्षमा कर. या मुक्ताच्या बापाची इस्टेट मीच लुबाडली होती. तुला त्यांच्याबरोबर जाताना जेव्हा मी प्रथम पाहिले, तेव्हा माज्या मनात शंका आली की, तो म्हातारा तुला सारे सांगेल आणि तू माझ्या विरुध्द जाशील. म्हणून माझा तुझ्यावर राग. तू तुरुंगातून कागद घेऊन पळालास, म्हणून तर माझा संशय दुणावला; परंतु तू परदेशात गेलास. प्रश्न मिटला; परंतु मलाही आता पश्चात्ताप होत आहे. मला क्षमा कर. तू आता मोठा मनुष्य झाला आहेस. तुझी वाणी ऐकून राजे, महाराजे तुझ्या चरणी नमतात. विजय, आम्ही क्षुद्र माणसे. पै पैशाच्या चिखलात बरबटणारी माणसे; परंतु क्षमा कर. ती शेतीवाडी मी परत करतो.' असे म्हणून ग्रामणीने प्रणाम केला.
'बरे, मागचे आपण विसरू या. ते कागदही मी फेकून दिले. जाऊ दे ते. मुक्ताचे वडील तर आता वारले. मुक्ता नि मी त्या शेतीवर राहू. खपू. फुले फुलवू. दाणा पिकवू. श्रमाने खाऊ.' विजय म्हणाला.
विजयने सर्व संसाराची धुरा आता शिरावर घेतली. तो कष्ट करतो. तो आदर्श शेतकरी झाला आहे आणि त्याची कला? ते बुध्दमंदिर त्याने कलेचे माहेरघर केले. भगवान बुध्दांच्या चरित्रातील सुंदर सुंदर प्रसंग त्याने त्या मंदिरात रंगवले आहेत. ते मंदिर म्हणजे गावाचे भूषण आहे. हजारो यात्रेकरू ते पाहायला येतात.
'तू यतीही झालास, पतीही झालास. काही दिवस यती होऊन कीर्ती मिळवून तू पित्याचा संकल्पही पुरा केलास. माझेही नाव राखलेस.' बलदेव एखादे वेळेस हसून म्हणतात.
'विजय, यती होणे बरे, की पती होणे बरे?'
मंजुळा हसून परंतु जरा गंभीरपणे विचारते.
'मंजुळाताई, माझ्यासारख्या ज्यांच्या वृत्ती कोवळया, प्रेमळ व भावनोत्कट आहेत, ज्यांना फार कठोर होता येत नाही. अशांनी पती होऊनच, संसारातच यती होण्याची खटपट करावी. त्यांनी संसारात संन्यास आणावा. संसारातच संयम आणून, होईल ती सेवा करून, निरहंकारपणे राहून त्यांनी आपल्या जीवनाचे सोने करावे. खरे ना मुक्ता? हाच आमचा मुक्ताचा पिपीलिकामार्ग.'