सर्वनाश 6
'तुम्ही एका बाईचे व मुलाचे प्राण वाचवलेत?' मारेकर्याने लाटांवर हेलकावत विचारले.
'हो, या गंगेचीच शपथ.'
'तर मग तू माझा उपकारकर्ता आहेस. ती माझीच बायको. तो माझाच मुलगा; परंतु मी गरीब आहे. पोटासाठी आज मारेकरी बनलो. पुन्हा नाही हा धंदा करणार. क्षमा करा. जातो मी.' तो मारेकरी म्हणाला.
'तुझ्या बायकोला प्रणाम. मुलास आशीर्वाद. जा. लोकांचे प्राण वाचव. घेऊ नको.'
'परंतु घरच्यांचे प्राण कसे वाचवू?'
'काही प्रामाणिक उद्योग कर. सुलोचना म्हणून सरदाराची कन्या आहे. तिला सांग की, विजयने मला पाठवले आहे, ती तुला मदत करील.'
'परंतु तिनेच तर माला पाठविले आहे.'
'सुलोचनेने?'
'होय.'
'तरीही माझा निरोप तिला सांग, जर तुला योग्य वाटले तर.'
'तुमची झुलपे मजजवळ आहेत. ती मी तिला दाखवीन व तुम्हाला मारले असे सांगेने. ती बक्षीस देईल.'
'ठीक तर. मी मेलो असेच सांग. कारण, मी जिवंत असून खरोखर मेलेलाच आहे. जो निराश झाला तो मेलाच. ज्याला आशा आहे तोच खरोखर जिवंत आहे.'
'प्रणाम. क्षमा करा.'
'प्रणाम. तो परमेश्वर सर्वांना क्षमा करील.'
मारेकरी गेला. गंगेच्या लाटांवर विजय नाचत होता. तो आणखी वरून अपरंपार पुराचे पाणी आले. पाऊस जरा ओसरला होता, परंतु पुन्हा पडू लागला. विजय, कसा रे तू वाचवणार? का गंगामाई आज तुला पोटाशी धरणार?