परिभ्रमण 4
'विहारी. छान नाव. खरेच तुम्ही विहारी आहात. जगात हिंडावे, फिरावे, चिंता ना काळजी. खरे ना विहारी?'
'हां, पण तुम्ही भेटलात, छान झाले. मला एकटयाला हिंडणे जड जात होते. मी राजाच्या सैन्यात होतो; परंतु मी पळून आलो. ते सैन्यागारात नुसते पडून राहणे मला आवडेना. मला मोकळे जीवन आवडते. चला, दोघे हिंडू.'
दोघे जात होते. विहारी मोठा विनोदी होता. तो विजयला हसवी. कितीतरी दिवसांत विजय इतके हसला नव्हता. त्याला मजा वाटली आणि जाता जाता आता एक जंगल लागले. किर्र झाडी. तो ते पाहा येते आहे ते! कोण हे सावज? हे अस्वलाचे पिलू दिसते. त्या सैनिकाने बाण मारला. ते पिलू मेले.
'कशाला मारलेत?' विजय म्हणाला.
'अरे, रानातून जाताना काही खायला न मिळाले तर? आणि अस्वलाचे कातडे पांघरायला छान.' असे म्हणून त्याने ते पिलू खांद्यावर उचलून घेतले. ते निघाले. तो त्यांना एकदम कोणीतरी धावून येत आहे असे दिसले.
'अरे बापरे. त्या पिलाची आई!' विजय भीतीने उदगारला.
'अरे बापरे!' तो विहारी म्हणाला.
आली. ती अस्वलीण जवळ आली.
'पळ, पळ, त्या झाडावर चढ.' विहारी ओरडला.
विहारीही एका झाडावर चढला. विजय चढत होता, तो ती अस्वलीण एकदम विजयच्याच झाडावर चढली. विजयच्या पायाचा ती लचकाच तोडती; परंतु विजय झटकन वर गेला. ती अस्वलीणही येत होती. आता काय करायचे?
'विजय, आडव्या फांदीवर हो.' विहारी ओरडला.
विजय आडव्या फांदीवर वळला. ती आडवी फांदी सरळ गेली होती. विजय अस्वलिणीकडे तोंड करून फांदीला धरून धरून जात होता. तो ती अस्वलीणही थोडया वेळाने येऊ लागली. त्या फांदीवर तोल सांभाळून येणे त्या अस्वलिणीस अवघड जात होते, तरीही ती येत होती. पुढे पुढे येत होती. विजय मागे मागे जात होता. तो फांदी वाकली. दोघांचा भार त्या फांदीस सहन होईल का? आणि खाली जमीनही दूर. इतक्या उंचीवरून पडणे म्हणजेही मरणे होते. त्या अस्वलिणीचे कढत सुस्कारे विजयला भासत होते. जणू मृत्यूच चाटायला, गिळायला येत होता.