कलवान विजय 4
विजयच्या मनात आले की, आपणही त्या प्रदर्शनासाठी काही पाठवावे. त्याने मंजुळेजवळ ही गोष्ट काढली.
'विजय, खरेच पाठव तू तुझे नमुने. तुला बक्षीस मिळेल. तुझी कीर्ती पसरेल. छान होईल. माझ्याजवळ थोडे पैसे आहेत. ते तू घे. रंग घे. पुठ्ठे घे. कर तयारी.'
मंजुळा विजयला नेहमीच उत्तेजन द्यायची. बहिणीने दिलेली स्फूर्ती घेऊन विजय काम करू लागला. त्याने माईजींच्या देखरेखीखाली सुंदर चित्रे तयार केली. त्याचप्रमाणे स्वतःच्या हस्ताक्षरातील एक सुंदर पोथीही वेलबुट्टी वगैरे बाजूला काढून त्याने तयार केली. त्या वस्तू तयार झाल्या. ग्रामधिकार्याकडे आपले नाव, वय, पत्ता वगैरे घालून विजयने त्या वस्तू नेऊन दिल्या.
'प्रदर्शनामध्ये ज्यांच्या ज्यांच्या वस्तू ठेवण्याच्या लायक ठरतील त्यांना प्रदर्शनार्थ बोलावण्यात येणार होते. राजा त्या सर्वांचा सत्कार करणार होता. त्यांना मेजवानी व बक्षिसे देणार होता. विजय आमंत्रणाची वाट पाहात होता.'
'तुला येणारच नाही बोलावणे. तुला कुत्र्याला कोण बोलावणार? रद्दी तुझी चित्र.' सुमुख मत्सराने म्हणाला.
'सुमुख, असे बोलू नये. आपल्या भावाचा असा पाणउतारा करू नये. त्याचा गौरव झाला तर तो आपला सर्वांचाच आहे.' मंजुळा म्हणाली.
'विजयची चित्रे मी फाडून टाकणार होतो.'
'फाडली असतीस तर तुझे हे दात पाडून टाकले असते.' विजय एकदम येऊन रागाने म्हणला.
'ये रे, पाड. तुझ्या पोटातच घुसवतो माझे दात व ही नखे. तुझ्यासारखा मी उंच नसलो तरी तुला फाडून टाकीन. मी वाघ आहे, अस्वल आहे, समजलास?'
मंजुळाने त्या दोघांना दूर केले. विजय कोठे बाहेर जायला निघाला; परंतु इतक्यात ग्रामाधिकार्याने लखोटा आणून दिला. विजयला आमंत्रण आले होते. राजाच्या सहीचे आमंत्रण! आईबापांस आनंद झाला. मंजुळेला आनंद झाला. विजय ती वार्ता सांगण्यासाठी माईजींकडे गेला. त्याला आज कृतार्थता वाटत होती.