राजधानीत 1
राजवाडयाच्या भव्य पटांगणात प्रदर्शन भरले होते. सर्व राज्यांतून नानाविध कलांचे नमुने आले होते. तलम तलम वस्त्रे, नाना रंगांची व प्रकारांची तेथे होती. जरीचे प्रकार होते. रेशमी वस्त्रे होती. लोकरीच्या सुंदर शाली होत्या. गालिचे होते. जणू खरोखरची फुलेच आहेत असे वाटे. तेथे धातूंचे प्रकार होते. सोन्याचांदीचे शेकडो कलात्मक प्रकार. हस्तिदंताच्या वस्तू, शिंगांच्या वस्तू, चंदन मूर्ती, पाषाणांच्या नाना वस्तू, सारे तेथे होते. चित्रकलेचा भागही गजबजलेला होता. हस्तलिखिते एका विभागात हारीने मांडून ठेवलेली होती.
प्रदर्शनमंडप भव्य होता. त्याला सोनेरी झालरी सोडल्या होत्या. मंडपावर उंच ध्वज फडकत होता. राजवाडयाच्या प्रवेशद्वाराशी तुफान गर्दी होती. द्वाररक्षक फक्त प्रवेशपत्रिका ज्यांच्याजवळ असत त्यांनाच आत सोडीत होते. त्या गर्दीत तो पाहा एक म्हातारा व एक मुलगी दरवाजाशी जाऊ पाहात आहे.
'अहो, आमचा एक नातलग आत आहे. आम्हाला जाऊ द्या आत. सोडा आम्हाला आत.' ती मुलगी विनवीत होती.
'दरवाजा आता बंद. कोणासही आता आत घेतले जाणार नाही. गर्दी मोडा. हटा.' ते शिपाई ओरडत होते. इतक्यात विजय तेथे आला. तो गर्दीतून घुसून रस्ता काढीत त्या मुलीजवळ आला.
'अहो, आम्हाला आत सोडा. ही दोघे माझ्याबरोबर आलेली आहेत. मला परवाना आहे. माझे चित्रे प्रदर्शनात आहेत. सोडा.'
'चल, चावट कोठला. त्या मुलीबरोबर आत घुसू पाहातोस वाटते? म्हणे चित्रे आहेत माझी. हो चालता.' द्वाररक्षक म्हणाला.
'अहो, माझ्या खिशात खरोखरच आमंत्रण-पत्र आहे.'
इतक्यात राजाची स्वारी प्रदर्शनमंडपातून बाहेर पडाली. शिपाई सर्वांना, 'शांत राहा, शांत राहा' म्हणू लागले; परंतु विजय का गप्प बसणारा होता? तेजस्वी तडफदार तरुण तो! तो ओरडू लागला, 'हे राजा, हे तुझे जुलमी शिपाई आम्हाला आत सोडीत नाहीत. माझ्याजवळ परवाना आहे. राजा.'