प्रदर्शनार्थ प्रयाण 2
'आज फार थंडी आहे. यांना बाधली वाटते? गारठून का गेले? थांबा हं. मी गवत आणून पेटवतो.' असे म्हणून आपली थैली ठेवून तो गवत उपटून आणण्यासाठी गेला. त्याने गवत आणले. वाळलेल्या काटक्या आणल्या. त्याने आपली चकमक झाडून ठेणगी पाडली. त्याने गवत पेटवले. काटक्या पेटवल्या. म्हातारा आनंदाला. हुशार झाला.
'काही गरम पेय करता येईल का?' त्या मुलीने विचारले.
'हो.' विजय आनंदाने म्हणला.
विजयने थैलीतील एक पातेली काढली. तो पाणी घेऊन आला. त्याने पीठ पातळसर कालवले, त्यात चवीला थोडा गूळ घातला. ती पातेली त्याने
निखार्यावर ठेवली. ते पातळ मिश्रण कढत झाले; परंतु पिणार कसे? विजयला एकदम एक युक्ती सुचली. तो पळत पळत गेला व गवताची एक लांब नळी घेऊन आला. ते एक विशिष्ट प्रकारचे गवत असते. ते पोकळ असते.
'आजोबा, ही नळी तोंडात धरा व ह्या पातेलीतून घ्या वर ओढून. तोंड भाजणार नाही; परंतु गरम गरम पिता येईल.'
म्हातार्याने त्याप्रमाणे केले. त्याने ती पातळ लापशी संपविली. त्याला तरतरी आली. आतबाहेर ऊब आली.
'बाबा, आता चालवेल ना?' मुलीने विचारले.
'हो. चालवेल हो बाळ.' म्हातारा म्हणाला.
'तुम्हाला कोठे जायचे?' विजयने विचारले.
'आम्ही कनोजला प्रदर्शन पाहायला जात आहोत. बाबांना कलावस्तू पाहाण्याचा फार नाद. त्यांच्याने राहावेना; परंतु आम्ही गरीब. पायीच निघालो. कनोजला आमचा एक नातलग आहे. त्याच्या ओळखीने प्रदर्शन पाहायला मिळेल. त्याला निरोप पाठवला आहे.' मुलीने सांगितले.
'मी सुध्द कनोजलाच जात आहे. प्रदर्शनासाठी मी चित्रकलेचे नमुने पाठविले आहेत. मला राजाचे बोलावणे आले आहे. आपण बरोबर जाऊ. मी एकटा जात होता. तुमची संगत होईल.' विजय म्हणाला.
'देवच पावला. आम्हाला तुमचा आधार होईल. बाबा म्हातारे, मी काळजीतच होते. चला, हळुहळू जाऊ. तुमचा रुमाल बांधा.' ती मुलगी म्हणाली.
विजयने आपला रुमाल डोक्याला बांधला. तो जरा नीट आला नाही. ती मुलगी हसली.