परिभ्रमण 2
'परंतु तुम्हाला चालायला कसे येऊ लागले?'
'आधी खायला तर या. खाता खाता सांगतो.'
ते दोघे फराळ करू लागले. तो मनुष्य म्हणाला, 'अहो, पोरांसाठी आम्हाला ही अशी सोंगेढोंगे करावी लागतात. कोणी दिवसा आंधळे होऊन भीक मागतात; परंतु रात्री त्यांना डोळे येतात. घरी येताच ते डोळस असतात. कोण पांगळयाचे सोंग करतात. कोणी हातापायांना फडकी गुंडाळून आपण महारोगी आहोत असे भासवतात. असे करवे लागते. माझी मुलेबाळे तिकडे एका गावी आहेत. माझा मुलगा येतो व येथे जमलेले भिक्षाद्रव्य नेतो. त्याने तिकडे घर बांधले आहे. शेतीवाडी आहे. आता मी पांगळयाचे सोंग करून भीक नाही मागितली तरीही चालेल; परंतु सवय झाली इतक्या वर्षांची. चैन पडत नाही तसे न केले तर.'
असे तो पांगळा सांगत होता. विजय आश्चर्याने सारे ऐकत होता.
'आणि तुम्ही कोठले?' भिकार्याने विचारले.
'मी लांबचा मुशाफिर आहे. परिव्राजक होऊन हिंडत आहे. पुरे पट्टणे पाहात आहे.'
'परंतु वाटेत खाणार काय?'
'तो प्रश्नच आहे. माझ्याजवळ काही नाही.'
'माझ्याबरोबर भिक्षा मागा. मी पांगळा होईन. तुम्ही मला हिंडवा. एका लाकडी गाडीवर घालून तुम्ही मला ओढत न्या. तुम्हाला गाणी येतात का? म्हणा गाणी. लोक भरपूर भीक घालतात. अहिंसेचा येथे धर्म आहे.'
'उद्याचा दिवस बघतो प्रयोग करून; परंतु मला असा देश आवडत नाही. अहिंसा म्हणजे दंभ? तुम्ही उद्योग का करीत नाही? श्रमावे व खावे. लोकांना तुम्ही फसवता आणि हे बावळट लोकही फसतात. धर्माचे पुण्य दोघांनाही नाही.'
'तुमची अशा प्रकारची मते असतील तर जा. माझी नाही तर फजिती कराल आणि तुम्ही तरी आता प्रवासात श्रम करूनच खाणार असाल?'
'मी फसवणार नाही. मला चित्रे काढता येतात. कोणाला चित्र काढून देईन. देईल तो मला काही. मी गाणे म्हणेन. देईल कोणी काही. मी कोठे धर्माचे प्रवचन करीन. मिळेल मला काही. मी फसवणार नाही. मी आपला जातो. रात्रभर येथे झोपू दे.'