कलवान विजय 3
'जा बाळ. घरी संपत्ती असती तर सारी एकत्र राहाती; परंतु हळुहळू एकेकाला घरटयातून बाहेर पडलेच पाहिजे.' आई म्हणाली.
अशोक निघून गेला आणि त्याच्या पुढच्या वर्षी आनंद व सुव्रत हेही गेले. घरात आता विजय, सुमुख व मंजुळा तिघेच होती.
विजय त्या मठात अभ्यासासाठी जाऊ लागला. शिकू लागला. त्याला हस्तलिखित ग्रंथांच्या प्रती करायला सांगत. विजयचे हस्ताक्षर फारच सुंदर होते. कसे झपझप व वळणदार तो लिही. भिक्षू त्याच्यावर प्रसन्न असत. गावात एक चित्रकार होता. त्याच्याकडेही विजय जायचा. विजयला चित्रकलेची देणगी होती. तो सुंदर चित्रे काढू लागला. तो सुंदर आकृती काढी, मनोहर रंग भरी. फुले, पाखरे, पशू, माणसे सर्वांची तो चित्रे काढी. कधी कधी मोठमोठे प्रसंग रंगवी.
विजय धर्मज्ञान शिकत होता. चित्रकलाही शिकत होता. त्याला चित्रकला शिकण्याची आणखी एक संधी आली. कनोजच्या राजघराण्याशी संबंध असलेली एक पोक्त पावन स्त्री शिरसणी येथे राहायला आली बुध्दभिक्षूकांच्या मठाजवळ एका सुंदरशा पर्णकुटीत ती राहू लागली. तिला माईजी म्हणून संबोधण्यात येई. माईजी चित्रकलेत पारंगत होत्या. एकदा त्या मठात गेल्या असता विजय त्यांच्या दृष्टीस पडला. एका हस्तलिखित ग्रंथाभोवती विजय वेलबुट्टी काढीत होता.
'तुला चित्रकलेचा नाद आहे वाटतं?' माईजींनी विचारले.
'होय माईजी. मला फारसे येत नसले तरी शिकावे असे वाटते.' विजय विनयाने म्हणाला.
'माझ्याकडे येत जा. मी धडे देईन.' त्यांनी सांगितले.
'आपली कृपा, ' तो कृतज्ञतेने म्हणाला.
विजय माईजींकडे जाऊ लागला. त्या त्याला रंग देत. कुंचले देत. चित्रे काढण्यासाठी विशिष्ट असे कापडी पुठ्ठे देत. त्याला चित्रकलेचे तंत्र त्या शिकवीत. चित्रकलेतील छायाप्रकाशाची महती त्याला सांगत. चित्रात चैतन्य कसे आणावे, गतिमान अशी चित्रे कशी काढावी, सारे त्या सांगत.
कनोजचा राजा कलाप्रेमी होता. त्याने आपल्या राज्यातील कलांना उत्तेजन मिळावे म्हणून एक मोठे प्रदर्शन भरविण्याचे ठरविले. राज्यात सर्वत्र दवंडी दिली गेली. शिरसमणी गावातही दवंडी झाली.