यतिधर्माची दीक्षा 4
विचार करा. त्या खुनी माणसास मी हृदयाशी धरीन. मी का खुनी नाही? मीही अनेकांचे वाईट चिंतिले असेल. ज्या ज्या वेळेस दुसर्याचे वाईट चिंतितो, त्या त्या वेळेस मी खुनीच असतो. मी कोणाला वाईट म्हणू? सर्वात वाईट आधी मी आहे. येथे जमलेल्या हजारोंपैकी छातीवर हात ठेवून प्रामाणिकपणे कोण म्हणून शकेल की, मी निर्दोष आहे? आपणा सर्वांस शासन करण्याचे जर देवाने ठरविले, तर तुमच्या आमच्या पापांसाठी देवाने कितीही शिक्षा केली तरी ती कमीच ठरेल.
म्हणून मी काय सांगू? मला फार बोलवत नाही. मी तुम्हास सर्वांना प्रणाम करतो व जाऊन त्या बंधूस हृदयाशी धरतो.'
असे म्हणून सेवानंद निघाले. त्यांनी त्या खुनी अपराध्यास भावनांनी उचंबळून हृदयाशी धरले. सेवानंदांचे डोळे पाझरत होते आणि तो खुनी इसम तर वर पाहिना. त्याच्या डोळयांतील अश्रू सेवानंदांच्या चरणाचे प्रक्षालन करीत होते.
'अहिंसाधर्म की जय, प्रेमधर्म की जय, भगवान बुध्ददेव की जय!' असे जयघोष झाले. ती अपूर्व सभा झाली. सेवानंद निघून गेले.
ते मठात आले. मठाधिपतींनी सेवानंदांस हृदयाशी धरले.
'धन्य आहेस तू. प्रेमधर्माचा प्रकाश असाच सर्वत्र पसरव. तुझे जीवन किती अर्थपूर्ण आहे आता?' महंत म्हणाले.
'ही तुमची कृपा.' सेवानंद म्हणाले.
त्या दिवशीचे प्रवचन ऐकून सुलोचना रात्री रडली; परंतु तिला आनंदही झाला. 'माझी निवड किती योग्य होती.' असे ती मनात म्हणाली.