Get it on Google Play
Download on the App Store

चोरांच्या हातून सुटका 5

'पडा आता थंडगार विहिरीत. आगीत जळा किंवा पाण्यात मरा.' तो खालून ओरडला.

ती इमारत लाकडी होती. जुनी होती. भराभर पेटली. त्या चोरांना उडी टाकवेना. एकाने हिय्या केला व खाली उडी मारली, परंतु आता खाली गवत नव्हते. त्याचा पाय मोडला; परंतु तरीही तो विजयचा सूड घेण्यासाठी तसाच धावला; परंतु विजय काही कमी शूर नव्हता. त्याचे मुंडकेच विजयने उडविले. बाकीचे आगीत भस्म झाले. त्या हवेलीच्या ज्वाळा जंगलभर पसरल्या. प्रचंड होळी. विजय आता चालू लागला. तो त्याला तो तांडा भेटला. त्या ज्वाळा पाहून तो तांडा इकडेच येत होता.

'कोणी पेटवली ही खाणावळ?' त्यांनी विचारले.

'मी. सारे चोर भस्म झाले. एक येथे लढाईत मरून पडला.' असे म्हणून विजयने सारी हकीगत सांगितली.

'विजय, तू फार थोर कृत्य केलेस. अनेक व्यापार्‍यांना या चोरांनी आजपर्यंत मारले. तू हे जंगल आता निरुपद्रवी केले आहेस. व्यापार्‍यावर, जाणारायेणारांवर तुझे उपकार आहेत. तुझे नाव सारे घेतील. तुझी कीर्ती सर्वत्र जाईल.' असे तांडयातील लोक म्हणाले.

त्यांच्याबरोबर विजय निघाला. त्याचे आता सारे कौतुक करीत. रस्त्यात त्याला चांगले अंथरूण करून देत. त्याला चांगले जेवायला देत. तो जणू त्यांचा देव झाला.

पुढे त्या तांडयाचा नायक त्याला म्हणाला, 'तुम्हाला राजगृहाला जायचे ना? आता हा रस्ता घ्या. पुढे मग गंगा नदी लागेल. गलबते जात येत असतात. एखाद्या गलबतात बसा व राजगृहाला जा. तुमचा उत्कर्ष होईल. तुमच्या चित्रकलेची तेथे तारीफ होईल. त्या राजधानीत कुबेरासारखे व्यापारी आहेत. मोठमोठे अमीर उमराव आहेत. त्यांचा तुम्हाला आश्रय मिळेल. प्रभू तुम्हास यश देवो व एक दिवस तुमच्या पत्नीची व तुमची भेट होवो.'

विजय त्या मित्रांचा निरोप घेऊन एकटाच निघाला. 'या सर्व संकटांतून कोण मला तारीत आहे? कोण माझा सांभाळ करीत आहे? मुक्ता! माझी मुक्ताच जणू माझा सांभाळ करीत आहे. तिचे अपार प्रेम माझे रक्षण करीत आहे. मुक्ता! तू कधी भेटशील? सर्वांचे मला आशीर्वाद मिळत आहेत. ते का खोटे होतील? तू भेटशील मला.' असे मनात म्हणत तो निघाला.

यती की पती

पांडुरंग सदाशिव साने
Chapters
कलवान विजय 1 कलवान विजय 2 कलवान विजय 3 कलवान विजय 4 प्रदर्शनार्थ प्रयाण 1 प्रदर्शनार्थ प्रयाण 2 प्रदर्शनार्थ प्रयाण 3 राजधानीत 1 राजधानीत 2 राजधानीत 3 राजधानीत 4 घरी परत 1 घरी परत 2 घरी परत 3 घरी परत 4 घरी परत 5 घरी परत 6 तुरुंगात 1 तुरुंगात 2 तुरुंगात 3 तुरुंगात 4 तुरुंगात 5 तुरुंगात 6 तुरुंगात 7 तुरुंगात 8 मातृभूमीचा त्याग 1 मातृभूमीचा त्याग 2 मातृभूमीचा त्याग 3 मातृभूमीचा त्याग 4 परिभ्रमण 1 परिभ्रमण 2 परिभ्रमण 3 परिभ्रमण 4 परिभ्रमण 5 परिभ्रमण 6 परिभ्रमण 7 चोरांच्या हातून सुटका 1 चोरांच्या हातून सुटका 2 चोरांच्या हातून सुटका 3 चोरांच्या हातून सुटका 4 चोरांच्या हातून सुटका 5 राजगृहात 1 राजगृहात 2 राजगृहात 3 राजगृहात 4 राजगृहात 5 राजगृहात 6 सर्वनाश 1 सर्वनाश 2 सर्वनाश 3 सर्वनाश 4 सर्वनाश 5 सर्वनाश 6 यतिधर्माची दीक्षा 1 यतिधर्माची दीक्षा 2 यतिधर्माची दीक्षा 3 यतिधर्माची दीक्षा 4 स्वदेशात 1 स्वदेशात 2 स्वदेशात 3 स्वदेशात 4 *शेवट 1 *शेवट 2