मातृभूमीचा त्याग 4
'चला जाऊ माघारे. जाऊ दे पळून त्या पळपुटयांना देशाच्या बाहेर. पीडा गेली म्हणजे झाले.' ते सारे माघारे वळले. रुक्माने एक बाण मारला. ग्रामणीस जरा चाटून गेला. ग्रामणी पळत सुटला. आता संकट नाही असे रुक्माला वाटले. तो विजय व मुक्ता यांना शोधीत आला. तिघांची गाठ पडली. रुक्मा रस्ता दाखवीत होता. तो मुक्ताच्या पायाकडे एकदम विजयचे लक्ष गेले.
'मुक्ता, काटा का ग लागला? किती रक्त गळत आहे. पाहू दे.' तो पाहू लागला. 'ही तर तलवारीची जखम. येथे कशी जखम झाली?'
'अरे, तुझ्यासाठी तिने पाय कापून घेतला. तिच्या रक्ताच्या वासाने कुत्र्याने यावे म्हणून. मुक्ता, किती तुझे विजयवर प्रेम! परंतु तुमची आज ताटातूट होणार. मला वाईट वाटत आहे; परंतु तुम्ही पुन्हा भेटाल. मी राजाकडे जाईन. मी जुना शिपाई आहे. राजाजवळून तुझ्यासाठी माफीपत्र आणीन हो, विजय.' रुक्मा मनापासून सांगत होता.
विजयने मुक्ताची जखम बांधली. विजयच्या खांद्यावर हात ठेवून ती जात होती आणि आता जंगल संपले. समोर अफाट मैदान होते. कनोजच्या राज्याची हद्द थोडया अंतरावर असलेल्या नदीजवळ संपत होती. त्या नदीपलीकडे दुसरे राज्य. मग धोका नव्हता. ती तिघे तेथे बसली.
'विजय, जा आता. वेळ दवडण्यात अर्थ नाही. काळजी नको करू. मी आहे तुझ्या मुक्ताला.' रुक्मा म्हणाला.
विजय व मुक्ता! त्यांना एकमेकांस सोडवेना, दोघे सदगदित झाली होती.
'विजय, पुन्हा कधी रे तू भेटशील? कधी तुझे गोड बोलणे, गोड हसणे पुन्हा मिळेल? कसे हे दुर्दैव! लग्न होऊन चार दिवसही आपण सुखाने एकत्र राहिलो नाही. का बरे ताटातूट? कोणते पाप आपण केले?'
'मुक्ता, रडू नको. सारे चांगले होईल. मी तुला विसरणार नाही. तू माझ्या हृदयात आहेस. तेथे तुला भावनांच्या रंगांनी रंगवीन. आपण पुन्हा लौकरच भेटू हो.'
'चला आटपा.' रुक्मा म्हणाला.
हातात तलवार घेऊन विजय निघाला. मुक्ता त्याच्याकडे पाहात होती. विजयही मागे पाहात होता. शेवटी तो दूर गेला. रुक्मा व मुक्ता माघारी आली. विजय त्या नदीतीरी आला. नदीचे पाणी प्याला. मातृभूमीचे शेवटचे दर्शन! तिला त्याने प्रणाम केला. ते पलीकडचे तीर! आणि तो परराज्यात शिरणार! जा, विजय, जा. शूराने डगमगू नये. जा.