Get it on Google Play
Download on the App Store

चोरांच्या हातून सुटका 3

मुक्ता, तुझे वृध्द पिताजी कसे आहेत? रुक्माची व त्यांची बुध्दिबळे चालत असतील ना? मी तुमच्यात फिरून कधी बरे येईन? तुला कधी भेटेन? रोज वार्‍यावर मी तुला निरोप पाठवतो. पाखरांबरोबर संदेश देतो. तुला कळतात का? मला पक्षी होता आले असते तर? अशी एखादी जादू येत असती तर? एकदम तुझ्याकडे येऊन तुझ्या खिडकीत बसलो असतो. पाखरांच्या भाषेत तुझ्याजवळ बोललो असतो. तू मला हाकलले असतेस का ग? का तुलाही ते पाखरू आवडले असते?

मुक्ता, तू रडत नको बसू. निराश नको होऊ. आपण लवकरच भेटू. सुखाचा संसार करू. देव पुन्हा आपली ताटातूट करणार नाही. अशी प्रेमळ जीवने सदैव का तो दूर ठेवील? खरे ना? पूस तर मग अश्रू व गोडशी हस बघू. माझ्यासाठी तरी हसत जा.
तुझा विजय

असे पत्र अशोकच्या पत्रात त्याने घातले. व्यापार्‍याचा निरोप घेऊन तो पुढे निघाला. आता पुढे दाट जंगल होते. दुसरेही काही प्रवासी होते, त्यांच्याबरोबर तो निघाला. त्यांना वाटेत आणखी लमाण भेटले. मोठाच तांडा होता; परंतु विजय विचारात रंगला होता. तो मागे राहिला. तांडा गेला पुढे. विजय आता झपाटयाने चालू लागला. तो एके ठिकाणी दोन रस्ते होते. अंधार पडला होता. कोणत्या रस्त्याने जावयाचे? त्याने डाव्या बाजूचा रस्ता घेतला. बराच वेळ झाला तरी त्याला कोणी भेटेना. इतक्यात त्याला दूर एक दिवा दिसला. तो त्या रोखाने आला, तो तेथे एक उंच लाकडी हवेली होती.

''प्रवाशांसाठी खाणावळ'' अशी त्या हवेलीवर पाटी होती.

'या. वाटसरू दिसता.' तेथील मनुष्य म्हणाला.

'मी थकून गेलो आहे; रात्रभर मुक्काम केला तर चालेल ना?'

'हो, दोन दिवस राहिलात तरी चालेल.'

विजय त्या माणसाबरोबर आत शिरला. आत आणखी बरेच इसम होते. कोण होते? तेही वाटसरू होते का? का शेजारचे कोणी होते? दिसत होते उग्र.

ती इमारत फार जुनी होती. जिन्याने विजयला घेऊन तो मनुष्य वर वर चालला. अगदी शेवटच्या मजल्यावरील लहानशा खोलीत त्याने विजयला आणले.

यती की पती

पांडुरंग सदाशिव साने
Chapters
कलवान विजय 1 कलवान विजय 2 कलवान विजय 3 कलवान विजय 4 प्रदर्शनार्थ प्रयाण 1 प्रदर्शनार्थ प्रयाण 2 प्रदर्शनार्थ प्रयाण 3 राजधानीत 1 राजधानीत 2 राजधानीत 3 राजधानीत 4 घरी परत 1 घरी परत 2 घरी परत 3 घरी परत 4 घरी परत 5 घरी परत 6 तुरुंगात 1 तुरुंगात 2 तुरुंगात 3 तुरुंगात 4 तुरुंगात 5 तुरुंगात 6 तुरुंगात 7 तुरुंगात 8 मातृभूमीचा त्याग 1 मातृभूमीचा त्याग 2 मातृभूमीचा त्याग 3 मातृभूमीचा त्याग 4 परिभ्रमण 1 परिभ्रमण 2 परिभ्रमण 3 परिभ्रमण 4 परिभ्रमण 5 परिभ्रमण 6 परिभ्रमण 7 चोरांच्या हातून सुटका 1 चोरांच्या हातून सुटका 2 चोरांच्या हातून सुटका 3 चोरांच्या हातून सुटका 4 चोरांच्या हातून सुटका 5 राजगृहात 1 राजगृहात 2 राजगृहात 3 राजगृहात 4 राजगृहात 5 राजगृहात 6 सर्वनाश 1 सर्वनाश 2 सर्वनाश 3 सर्वनाश 4 सर्वनाश 5 सर्वनाश 6 यतिधर्माची दीक्षा 1 यतिधर्माची दीक्षा 2 यतिधर्माची दीक्षा 3 यतिधर्माची दीक्षा 4 स्वदेशात 1 स्वदेशात 2 स्वदेशात 3 स्वदेशात 4 *शेवट 1 *शेवट 2