Get it on Google Play
Download on the App Store

चोरांच्या हातून सुटका 2

मी व ती अस्वलीण दोघे खाली पडलो. ती अस्वलीण त्या मित्रावर धावली, इतक्यात मी सावध होऊन तलवार घेऊन धावलो. त्या संतापलेल्या पशूवर केला प्रहार! ती माझ्याकडे वळली. घोंघूं करीत आली; परंतु विहारीने पुन्हा नेमका बाण मारला. ती माता मरून पडली. तुझा विजय वाचला. तुझे प्रेम मला सांभाळीत आहे. मंजुळाताईचे प्रेम मला सांभाळीत असेल.

आम्ही पुढे निघालो. तो आम्हालाच चोर समजून शिपाई पकडण्यासाठी पाठोपाठ येत होते. विहारी व मी दोघांनी प्रचंड नदीत उडया घेतल्या. आम्ही पैलतीरी आलो. दोघे निघालो. विहारी पूर्वी ज्या पथकात होता, ते पथक जात होते. विहारीला त्यांनी लढाईसाठी म्हणून नेले. त्याला वाईट वाटले. तो माझ्यावर फार प्रेम करी. मला धीर देई. त्या विनोदी शूर शिपायाच्या डोळयांतही निरोप घेताना पाणी आले. गेला. माझ्या  जीवनात कायमची वस्ती करून तो गेला.

पुन्हा मी एकटा. या शहरात आलो. येथे अशोकच्या ओळखीचा एक व्यापारी भेटला. त्याच्याबरोबर हे पत्र पाठवित आहे. अशोक हे तुझ्याकडे रवाना करील. अशोकचे माझ्यावर प्रेम आहे.

मुक्ता, मी येथून राजगृहाला जाणार आहे. तेथे कलेला उत्तेजन आहे. तेथे मी कीर्ती मिळवीन. तेथे नाना देशचे व्यापारी येतात. मी तेथे गेलो म्हणजे तुला पत्र पाठवीन. मी तिकडे येणे सुरक्षित आहे की नाही ते कळव. तुझ्या भेटीसाठी मी तळमळत आहे. मुक्ता, माझ्या घरी तू कधी गेली होतीस का? माझ्या बाबांचा अद्याप माझ्यावर राग आहे का? परंतु माझी सुटका करण्यासाठी त्या रात्री तोही आला होता आणि प्रेमळ पंगू मंजुळाताई! माझ्यासाठी त्या दरीत ती आली. सुमुखला घेऊन आली. कुबडयांच्या आधाराने आली. माझ्यावर तिचा किती लोभ! आमच्या घरातील ती कर्तव्यमूर्ती आहे, प्रेमदेवता आहे. ती सर्वांना सांभाळते, भांडणे मिटवते. तिला कधी तू भेटली होतीस का? हे पत्र माझ्या घरी जाऊन वाचून दाखव. सर्वांना माझे सप्रेम प्रणाम सांग. सर्वांच्या आशीर्वादाने व प्रेमाने मी जिवंत आहे. तुमची माझी गाठ पडावयाची आहे, म्हणून तर मी सर्व संकटांतून आतापर्यंत वाचलो व पुढेही वाचेन. नाही का?

मुक्ता, माईजींनाही माझे पत्र दाखव. त्यांनी मला कला दिली. कलेचे अंतरंग दाखविले. हे त्यांचे उपकार. त्यांचे आपल्या लग्नाला आशीर्वाद होते. मी त्यांना विचारले होते. बाबांचे करणे माईजींना पसंत नव्हते. राजाकडून त्या पत्रही मागवणार होत्या. त्यांना सांग की, विजय राजगृह येथे जाऊन कलेची अधिक उपासना करणार आहे. तुमचा, म्हणावे, आशीर्वाद द्या.

यती की पती

पांडुरंग सदाशिव साने
Chapters
कलवान विजय 1 कलवान विजय 2 कलवान विजय 3 कलवान विजय 4 प्रदर्शनार्थ प्रयाण 1 प्रदर्शनार्थ प्रयाण 2 प्रदर्शनार्थ प्रयाण 3 राजधानीत 1 राजधानीत 2 राजधानीत 3 राजधानीत 4 घरी परत 1 घरी परत 2 घरी परत 3 घरी परत 4 घरी परत 5 घरी परत 6 तुरुंगात 1 तुरुंगात 2 तुरुंगात 3 तुरुंगात 4 तुरुंगात 5 तुरुंगात 6 तुरुंगात 7 तुरुंगात 8 मातृभूमीचा त्याग 1 मातृभूमीचा त्याग 2 मातृभूमीचा त्याग 3 मातृभूमीचा त्याग 4 परिभ्रमण 1 परिभ्रमण 2 परिभ्रमण 3 परिभ्रमण 4 परिभ्रमण 5 परिभ्रमण 6 परिभ्रमण 7 चोरांच्या हातून सुटका 1 चोरांच्या हातून सुटका 2 चोरांच्या हातून सुटका 3 चोरांच्या हातून सुटका 4 चोरांच्या हातून सुटका 5 राजगृहात 1 राजगृहात 2 राजगृहात 3 राजगृहात 4 राजगृहात 5 राजगृहात 6 सर्वनाश 1 सर्वनाश 2 सर्वनाश 3 सर्वनाश 4 सर्वनाश 5 सर्वनाश 6 यतिधर्माची दीक्षा 1 यतिधर्माची दीक्षा 2 यतिधर्माची दीक्षा 3 यतिधर्माची दीक्षा 4 स्वदेशात 1 स्वदेशात 2 स्वदेशात 3 स्वदेशात 4 *शेवट 1 *शेवट 2