प्रदर्शनार्थ प्रयाण 3
'चांगला नाही वाटतं आला?' विजयने विचारले.
'जरा वाकडा आहे.' ती म्हणाली.
'निघताना नीट बांधला होता. मला सवय नाही.'
'मी देऊ बांधून? करा डोके पुढे.'
'तुम्हाला येतो बांधायला?'
'हो. मी घरी एखादे वेळेस बाबांचा जुना रुमाल माझ्या डोक्याला बांधीत बसते गमंत म्हणून.'
'बांधा माझ्या डोक्याला'
त्या मुलीने विजयच्या डोक्याला रुमाल बांधला.
'आता खरेच तुम्ही छान दिसता.' म्हातारा म्हणाला.
'चला आता निघू.' मुलगी म्हणाली.
ती तिघे चालू लागली. गप्पाविनोद करीत जात होती. मधूनमधून कलेवर, धर्मावर चर्चा होत होत्या.
इतक्यात पाठीमागून घोडयाच्या टापा ऐकू आल्या. कोण येत होते घोडा उधळीत? तो शिरसमणीचा ग्रामाधिकारी होता. त्याने त्या तिघांकडे पाहिले. तो म्हातारा व ती मुलगी यांना तो ओळखीत असावा. त्याने कपाळाला आठया घालून त्यांच्याकडे पाहिले. तो तिरस्काराने भेसूर हसला.
'काय विजय, यांची कोठे ओळख झाली? अशी ओळख बरी नाही. तुझ्या बापाला कळले तर तो रागावेल हो. बाकी तुम्ही तरुण मुले. हा: हा: हा: !'
असे म्हणून त्याने घोडयाला टाच मारली.
'असे काय तो म्हणत होता?' त्या मुलीने विचारले.
'तो फार दुष्ट आहे.' विजय म्हणाला.
'तुम्ही आमच्याबरोबर नका येऊ. तो तुम्हाला त्रास देईल.'
'मला कोणाची भीती नाही.'
'प्रवास चालला होता. वाटेत एके दिवशी म्हातारा फारच दमला. विजयने त्याला पाठुंगळीस घेतले. त्याची थैली त्या मुलीने घेतली. एकदा त्या मुलीच्या पायात एका नदीतून जाताना काटा मोडला; परंतु विजयने तो काटा काढला व त्याने वर भिलावा लावला.'
राजधानी आता जवळ येत होती.
'तुम्ही कोठे जाणार उतरायला?' विजयने विचारले.
'आम्ही त्या आमच्या नातलगाकडे जाऊ. तुम्हाला प्रदर्शनगृहात येऊन भेटू. तेथे तुम्ही असा हां. आम्हाला विसरू नका.' ती मुलगी म्हणाली.
'आपण बरोबरच परत फिरू.' विजय म्हणाला.
'परंतु राजधानीत चुकामूक नाही होता कामा.' ती म्हणाली.
'आपली चुकामूक आता कधीही होणार नाही.' तो म्हणाला.