परिभ्रमण 5
इतक्यात विहारी खाली उतरला. त्याचा भाता घाईत खाली पडलेला होता. त्याने एक बाण घेतला व अस्वलिणीस मारला, तशी ती कोलमडली. तरीही त्या फांदीत नखे रोवून ती उलटी लोंबकळत होती. विजयकडे पाहून भयंकर ओरडत होती. घूं घूं करीत होती; परंतु त्या अस्वलिणीचे ते लोंबते वजन आणि विजयचे वजन यांनी ती फांदी कडाड मोडली. ती अस्वलीण आणि विजय खाली पडली. अस्वलिणीच्या अंगात बाण घुसलेला होता. तरी ती विहारीच्या अंगावर जोराने धावली. विहारी घाबरला. तो इकडे विजय सावध झाला. त्याने तलवार घेतली व अस्वलिणीवर वार केला. ती उलटली. त्याच्या अंगावर आता ती धावली. मारला तिने पंजा. तो तिकडून विहारीने पुन्हा बाण नेमका मारला. अस्वलीण मेली! पिलाजवळ माताही मरून पडली.
विजय व विहारी मातेच्या त्या बलिदानाकडे बघत होते.
'पाहा हे प्रेम.' विहारी म्हणाला.
'विहारी, मी जंगलातून पळून येत असता माझ्या मुक्ताने असेच प्रेम दाखविले होते. तिने स्वतःचा पाय कापून घेतला. कुत्रा तिच्या रक्ताच्या पाठोपाठ यावा व मी वाचावे म्हणून. कधी बरे मुक्ता पुन्हा भेटेल?'
'विजय, संसारात कशाला पडतोस? तू व मी दोघे असेच हिंडत राहू. तू का मला सोडून जाणार एके दिवशी? मला फार आवडतोस. तुझ्याबरोबर सर्व त्रिभुवनात हिंडावे असे मला वाटते.'
'विहारी, मुक्ता माझ्यासाठी रडत असेल. संसार का वाईट आहे? संसारही चांगला करता येतो. विहारी, तू आमच्याकडे ये. आमचा देश चांगला आहे. कसे पाणी, कशी जमीन! येशील? तू आमच्याकडे राहा.'
'पाहू. परंतु मला एके ठिकाणी राहाणे आवडत नाही. रोज नवीन प्रदेश, नवीन देखावे, परंतु तुझी जखम बांधू ये आधी.' जखम बांधली गेली. बोलत बोलत ते पुन्हा निघाले. अस्वलीण व तिचे पिलू यांची विहारीने कातडी काढून घेतली. एक विजयच्या अंगावर त्याने टाकली. एक स्वतःच्या; परंतु एके ठिकाणी तर मोठा कठीण प्रसंग आला. कोणा राजाचे शिपाई चोरांना पकडण्यासाठी म्हणून धावत होते. त्यांना विजय व विहारी हेच चोर वाटले. कोणाला तरी पकडले म्हणजे झाले.