राजगृहात 1
एका मोठया गलबतात बसून विजय जात होता; परंतु काय असेल ते असो. प्रचंड वादळ एकदम सुरू झाले. शांत प्रवाहात प्रचंड लाटा. आता काय करणार? असे वादळ कधी झाले नव्हते. वृक्ष कडाड् कडाड् पडत होते. घरांवरची छपरे उडून जात होती आणि या गलबताचे काय होणार? राजगृह राजधानी जवळ येत होती; परंतु गलबलाचा भरवसा दिसेना. शेवटी ते गलबत उलटले. सारे पाण्यात पडले. अनेक प्रवासी! हलकल्लोळ माजला. कोण कोणाला आधार देणार? परंतु विजय उत्कृष्ट पोहणारा होता. तो मदत करीत होता. ती पाहा एक गरीब बाई. तिच्याजवळ लहान मूल आहे. कशाच्या तरी आधाराने ती बाई आहे. विजय बाणासारखा पाण्यातून धावला. त्याने ते मूल घेतले. एका हाताने ते वर धरून एका हाताने तो पोहत गेला. ते मूल तीरावर ठेवून पुन्हा आला. त्याने त्या बाईलाही तीरावर आणले. त्याने त्या मुलाला जिवंत केले. त्या मातेने कृतज्ञतेने त्याच्याकडे पाहिले.
विजय निघून गेला. तो आता पायी चालत चालत राजधानीला आला. कोठे उतरणार? एके ठिकाणी एक प्रवासी मंदिर होते. तेथे तो गेला. मालक बाहेर आला. बोलणे झाले. विजयला जागा मिळाली. प्रशस्त अशी ती खोली होती. मालक फार सज्जन होता. त्याने विजयची नीट व्यवस्था केली. विजयने भोजन केले. स्वच्छ अशा शय्येवर तो बसला होता.
'आपण कोण? कुठले?' धन्याने विचारले.
'मी कनोजकडचा आहे. अभागी तरुण आहे.'
'तुम्ही राजपुत्रासारखे दिसता. तुम्ही अभागी कसे? राहा आमच्याकडे तुम्हाला पाहून मला आनंद झाला. माणसाच्या मुद्रेवरून मी परीक्षा करतो. तुम्ही फार थोर असे तरुण आहात, असे मला वाटते. तुम्ही कलावान् आहात का?'
'चित्रकला मला येते.'
'वा! या राजधानीत तुम्ही लवकरच नाव मिळवाल.'
'पाहू या.'
'मी तुमच्या ओळखी करून देईन. तुमचे नमुने नेऊन दाखवीन. तुम्ही चित्रे तयार करा. मी रंग, पुठ्ठे वगैरे आणून देईन.'
तो धनी गेला. विजय शांतपणे झोपी गेला.
दुसर्या दिवशी तो राजधानीत हिंडला. त्याला आनंद झाला. त्याला रंग, कुंचले वगैरे सारे सामान मिळाले. त्याने एकदोन सुंदर चित्रे तयार केली.