परिभ्रमण 1
विजयने त्या नदीचे पाणी पिऊन, मातृभूमीला प्रणाम करून परतीरावर पाऊल ठेवले. तो एकदम गेला होता. तेथे तो बसला; परंतु त्याला झोप येत होती. थोडया अंतरावर एक उंच झाड होते. त्या झाडाच्या शीतल छायेखाली तो झोपला. त्याला गाढ झोप लागली. बर्याच वेळाने तो जागा झाला. तो उठला आणि निघाला.
हिंडता हिंडता एका शहराजवळ आला. अंधार पडू लागला होता. तेथे त्याला हालता चालता येत नाही असा, एक कसा तरी सरपटत येणारा मनुष्य आढळला.
'मला नेतोस का रे दादा उचलून?' त्याने विजयला विचारले.
'कोठे नेऊ?'
'ती पलीकडे एक झोपडी आहे तेथे ने.'
विजयने त्या माणसाला उचलून त्याच्या झोपडीत नेले. तेथे एक घोंगडी होती. तीवर त्याने त्याला ठेवले.
'दार लावा.' तो म्हणाला.
विजयने दार लावले. तो काय आश्चर्य? तो मनुष्य नीट हिंडू फिरू लागला. त्याने कपडे बदलले. आता अगदी छान दिसू लागला.
'तुम्ही येथे थांबा. मी काही खायला आणतो.' असे म्हणून तो मनुष्य गेला.
विजय आश्चर्य करू लागला, असा कसा हा मनुष्य? मघा याला चालता येत नव्हते, आता तर नीट चालतो. मघा घाणेरडा दिसत होता, आता झक्क दिसतो. हा लफंगा आहे की काय?
तो मनुष्य फळफळावळ, मेवामिठाई घेऊन आला.
'या, खायला या. मला घरी उचलून आणलेत. आता खायलाही मदत करा.' तो मनुष्य हसून म्हणाला.