राजगृहात 6
'कोण मुक्ता?'
'माझी प्रिय पत्नी.'
'तू एकटा ना आहेस?'
'दुर्दैवाने एकटा आहे, असे मी म्हटले होते.'
'विजय, तू तेव्हाच स्पष्ट सांगतास, तर माझे मन मी आवरले असते परंतु मला खरेच वाटले की, तू एकटा आहेस. म्हणून मी तुला मनाने वरले. तू गरीब का श्रीमंत याची मी चौकशीही केली नाही. मी तुला सर्वस्वाने वरले; परंतु आता काय? तुझा शेवटचा नकार ना?'
'होय.'
'तर मग एक तरी कर. या शहरातून तू लौकर चालता हो. तू या शहरात असून माझ्याजवळ नाहीस, हा विचार मला सहन होणार नाही. जा. या शहरातून जा. मी तुझी मानसपूजा करीत राहीन. आपले हे स्वप्न मी मनात अमर करीन.'
विजय प्रणाम करून निघाला.
'शेवटचा फलाहार घेऊन जा.' ती म्हणाली.
त्याने दोन द्राक्षे खाल्ली.
'क्षमा करा. माझा निरुपाय आहे.' असे म्हणून तो गेला.
घोडयाच्या गाडीतून घरी आला.
तो आज बोलला नाही. जेवायला नको म्हणाला. कपाळ दुखते असे सांगून, तो आपल्या अंथरूणावर पडला. जगातील काय ही गुंतागुंत असे त्याच्या मनात येत होते; परंतु त्याला स्वतःचा अभिमानही वाटत होता. सुलोचनेसारखी सुंदर रमणी, अपार संपत्ती, मानमान्यता, कीर्ती, या सर्वांना त्याने मुक्तासाठी झुगारले होते. माझ्यावर मुक्ताची सत्ता आहे. इतर कोणाची नाही. 'मुक्ता, मी तुझा आहे हो, तुझा.' असे म्हणत तो झोपी गेला.