Get it on Google Play
Download on the App Store

सर्वनाश 4

शेवटी तो उठला व घरी आला. घरमालक एकदम त्याच्याकडे आला व म्हणाला, 'तुमचे पत्र आले, हे बघा. घरचे पत्र ना? आनंदी व्हा. हसा.' विजयने पत्र हातात घेतले. त्याने ते वाचले. तो रडू लागला.

'काय झाले विजय?'

'सर्वनाश! अरेरे! सर्वनाश!' एवढेच तो उदगारला. त्याचा शोकावेग पाहून घरमालकही दुःखी झाला. आपण आनंदाचे असेल म्हणून पत्र दिले. तो ते अती दुःखाचे निघावे याचे त्याला वाईट वाटले.

'विजय, काय झाले? नीट सांगा. रडू नका.'

'माझी मुक्ता मेली. जिला भेटण्याच्या आशेने मी अनेक संकटांशी झुंजत आशेने जिवंत राहिलो, ती माझी मुक्ता मेली! असा कसा देव. माझ्या पाठीस लागला आहे हात धुवून! छेः, या जगात अर्थ नाही. न्याय नाही. नीती नाही. हे एक लहरी जग आहे. सारे निरर्थक आहे. कसला धर्म नि कसले काय! अरेरे! मुक्ता! माझी मुक्ता! माझी आठवण काढून झुरून झुरून मेली असेल. माझे दृष्ट बाबा! त्यामुळे हे असे झाले. जाऊ द्या. सारा खेळ खलास. सारे फोल आहे. कशात काही स्वारस्य नाही. माझी श्रध्दा आज मेली. सर्वनाश, सर्वनाश!' असे विजय वेडयासारखे बोलू लागला. मालकाने व त्याच्या पत्नीने विजयचे समाधान केले; परंतु तो बेचैन झाला. घरातून बाहेर पडला. रात्री केव्हा तरी घरी आला. तो ना धड नीट खाई, ना पिई.

'मी आता जातो कोठे तरी, तुमच्याकडे इतके दिवस राहिलो. आता पुरे. तुमचे उपकार आहेत. जातो.' असे सांगून तो बाहेर पडला. काय करावे ते त्याला सुचेना; परंतु हळुहळू तो वाटेल तसा स्वैर वागू लागला. त्याच्या जीवनात आता कशालाच किंमत राहिली नव्हती. तो बेफाम झाला. उच्छृंखल झाला. त्याचा संयम संपला. सारी बंधने तुटली. तो तरुण होता. सुंदर होता. तो वेश्यांकडे जाऊ लागला. वाटेल ते खाऊ लागला. दारू पिऊ लागला. सुखोपभोगात रंगला, दंगला.

परंतु ह्या गोष्टी सुलोचनेच्या कानांवर गेल्या. तिला अत्यंत दुःख झाले. ज्याच्यावर मी प्रेम केले, त्याचा का असा अधःपात व्हावा? त्याचा असा अधःपात नाही होता कामा! माझे मधुर प्रेम त्याला वाचवू शकत नाही; परंतु माझे कठोर प्रेम त्याला वाचवील. तिने मनात एक निश्चय केला. तिने एका मारेकर्‍यास बोलावले.

यती की पती

पांडुरंग सदाशिव साने
Chapters
कलवान विजय 1 कलवान विजय 2 कलवान विजय 3 कलवान विजय 4 प्रदर्शनार्थ प्रयाण 1 प्रदर्शनार्थ प्रयाण 2 प्रदर्शनार्थ प्रयाण 3 राजधानीत 1 राजधानीत 2 राजधानीत 3 राजधानीत 4 घरी परत 1 घरी परत 2 घरी परत 3 घरी परत 4 घरी परत 5 घरी परत 6 तुरुंगात 1 तुरुंगात 2 तुरुंगात 3 तुरुंगात 4 तुरुंगात 5 तुरुंगात 6 तुरुंगात 7 तुरुंगात 8 मातृभूमीचा त्याग 1 मातृभूमीचा त्याग 2 मातृभूमीचा त्याग 3 मातृभूमीचा त्याग 4 परिभ्रमण 1 परिभ्रमण 2 परिभ्रमण 3 परिभ्रमण 4 परिभ्रमण 5 परिभ्रमण 6 परिभ्रमण 7 चोरांच्या हातून सुटका 1 चोरांच्या हातून सुटका 2 चोरांच्या हातून सुटका 3 चोरांच्या हातून सुटका 4 चोरांच्या हातून सुटका 5 राजगृहात 1 राजगृहात 2 राजगृहात 3 राजगृहात 4 राजगृहात 5 राजगृहात 6 सर्वनाश 1 सर्वनाश 2 सर्वनाश 3 सर्वनाश 4 सर्वनाश 5 सर्वनाश 6 यतिधर्माची दीक्षा 1 यतिधर्माची दीक्षा 2 यतिधर्माची दीक्षा 3 यतिधर्माची दीक्षा 4 स्वदेशात 1 स्वदेशात 2 स्वदेशात 3 स्वदेशात 4 *शेवट 1 *शेवट 2