राजगृहात 5
'बरे.' ती म्हणे,
असे दिवस चालले होते. एके दिवशी तर विजय फारच गोंधळला.
'तुमचे चित्र मला कधीही पुरे करता येणार नाही. माझी बोटे चालतच नाहीत.'
'असे का होते?' तिने विचारले.
'तुम्ही रागावाल. कारण सांगेन तर.'
'तुमच्यावर मी रागावणार नाही.'
'ऐका तर. मी तुमचे चित्र काढीत असतो, परंतु तुम्ही सारख्या माझ्याकडे पाहात असता; त्यामुळे मी अस्वस्थ होतो.' तो म्हणाला.
'विजय, तुम्ही ज्याप्रमाणे माझे चित्र काढीत आहात, त्याप्रमाणे तुम्हाला न विचारता तुमचे चित्र मी काढीत असते. माझ्या हृदयाच्या फलकावर भावनांच्या कुंचल्यांनी तुम्हाला मी रंगवीत असते. म्हणून तुमच्याकडे मी सारखे बघते. विजय, तू एकटाच आहेस?'
'म्हणजे?'
'तू माझा हो. या सुलोचनेचे हृदय तू जिंकले आहेस. आजपर्यंत अनेक तरुण आले गेले. या सुलोचनेचे डोळे कोणाकडे ओढले गेले नाहीत; परंतु तू मला जिंकलेस. माझे जीवन तू रंगवलेस. रंगार्या, आता मला सोडून जाऊ नकोस. विजय, बोल. होशील ना तू माझा? माझे न हुंगलेले निर्मळ जीवन तुला मी अर्पण करते. घे माझे प्रेम व मला कृतार्थ कर.'
'अशक्य, अगदी अशक्य.'
'का अशक्य?'
'माझी मुक्ता माझ्यासाठी रडत असेल. मुक्ता माझे दैवत.'