चोरांच्या हातून सुटका 1
हिंडत हिंडत विजय एका मोठया शहरी आला. तेथे त्याची काही व्यापार्याशी गाठ पडली. त्यांतील एक व्यापारी त्याच्या मोठया भावाच्या ओळखीचा निघाला. विजयचा मोठा भाऊ अशोक एका व्यापार्याकडे होता. अशोकची व त्या व्यापार्याची ओळख होती. ते व्यापारी परत जाणार होते.
'तुम्ही माझ्या भावाला पत्र द्याल?' विजयने विचारले.
'हो. अवश्य देईन.' तो व्यापारी म्हणाला.
विजयने अशोकला एक पत्र लिहिले आणि दुसरे एक मोठे पत्र मुक्ताला लिहिले. ते मुक्तासाठी लिहिलेले पत्र त्याने अशोकच्या पत्रात घातले व ते मुक्ताकडे पोचते करण्याविषयी भावाला कळकळीने सांगितले होते. त्या पत्रात काय काय होते ते तुम्हाला जाणण्याची इच्छा आहे का? हे घ्या ते पत्र.
प्रियतम मुक्ता,
तू व रुक्मा परत गेलात आणि मी ती नदी ओलांडून पलीकडे आलो. मातृभूमीकडे किती तरी वेळ शेवटचे पाहात होतो; परंतु शेवटी निघालो. निरनिराळया देशांतून जात होतो. भिकार्याचे विचित्र प्रकार पाहिले. कोणी आंधळे नसून आंधळे झालेले. पांगळे नसून पांगळे झालेले. मी त्यांच्या संगतीत राहिलो नाही. एके ठिकाणी चोर पाठीस लागल्यामुळे गाईच्या गोठयात लपलो. गवाणीतील गवतात झोपलो; परंतु माझे धोतरच गाईने चघळले; परंतु मी तिचे दूध भरपूर पिऊन नुकसानभरपाई करून घेतली आणि पुढे विहारी नावाचा एक प्रवासी मित्र भेटला. फार प्रेमळ, उदार व शूर. विनोदी त्याचा स्वभाव. रुक्माची मला आठवण झाली; परंतु रुक्माच्या इतका हा वृध्द नव्हता. विहारी सैनिक होता. सैन्यातून तो पळाला होता. आम्ही दोघे एकदा जंगलातून जात होतो. विहारीने अस्वलिणीचे एक पिलू मारले आणि त्या पिलाची आई मग खवळून आली. कोण तारांबळ आमची. आम्ही झाडांवर चढलो. मी ज्या झाडावर चढलो त्या झाडावर ती अस्वलीण आली. तिने उडी मारून पायावर पंजा मारला. मी पटकन वर गेलो. आडव्या फांदीवर गेलो. आडव्या फांदीवर वाघ, अस्वल यांना पटकन जाता येत नाही. हळुहळू अस्वलीण येऊ लागली. मी अस्वलिणीकडे तोंड करून सरकत सरकत फांदीच्या टोकाला गेलो. खाली पडतो तरी मरतो. अस्वलिणीचा श्वास मला लागत होता. इतकी ती जवळ आली. तुझी आठवण झाली. मी मरणार असे वाटले; परंतु इतक्यात नवीन मित्र खाली उतरला. त्याने बाण मारला. अस्वलीण लोंबकळली. तरीही ती सरकत येत होती; परंतु कडाडू. एकदम फांदी मोडली.