प्रदर्शनार्थ प्रयाण 1
ग्रामाधिकारीही राजधानीस जाणार होता. विजयने त्याच्याबरोबरच जावे असे आईबापांस वाटत होते; परंतु ग्रामाधिकारी आपल्या घोडयावरून जाणार होता. विजय त्याच्याबरोबर कसा जाणार? विजय पायी जाणार होता.
'बाबा, मी पायीच जाईन. पुरे, पट्टणे, वने, उपवने बघत जाईन. मी योग्य वेळी पोचेन. काळजी नका करू.' असे विजयला म्हणला.
'माईजींनी राजघराण्यातील कोणाला तरी एक पत्र लिहून त्याच्याजवळ दिले. विजयची तयारी झाली. त्याने सुंदर पोषाख केला. आईने बरोबर लाडू वगैरे दिले. लाह्यांचे पीठ दिले. गूळ दिला, थैली तयार झाली.'
'विजय, विजयी होऊन ये.' मंजुळा म्हणाली.
'ये हो बाळ.' मायबाप म्हणाले.
'सुमुख, नीट वाग घरात. ताईला व आईला त्रास नको देऊ.' विजय सुमुखला म्हणाला.
'आम्हाला समजते म्हटले. चालते व्हा. निघू दे तुमची धिंडका एकदाची.' सुमुख म्हणाला.
विजय निघाला. बाप गावाच्या सीमेपर्यंत पोचवायला गेला व माघारा आला. एकटा विजय जात होता. आशेचे तेज ज्याच्या चेहर्यावर होते. तो आता भर तारुण्यात होता. एक प्रकारचा कोमल असा तजेला त्याच्या तोंडावर चमकत होता. गाणी गात जात होता. धर्मग्रंथांतील पाठ केलेला भाग म्हणत जात होता.
एके दिवशी वाटेत त्याने एक दृश्य पाहिले. एक म्हातारा मनुष्य जमिनीवर पडला आहे व त्याच्याजवळ एक मुलगी बसली आहे, असे त्याने पाहिले.
'बाबा, फार थंडी वाजते?' ती मुलगी विचारीत होती.
'जीव घुटमळत आहे, पोरी. काही तरी कडकडीत प्यायला दे. काय देशील या रानात?' तो म्हणाला. ती मुलगी दुःखी झाली होती. काय करावे ते तिला सुचत नव्हते. विजय त्यांच्याजवळ गेला.